मनोज जरांगे आणि मराठा आरक्षण आंदोलन

 

 

मनोज जरांगे नी दिलेली ४० दिवसांची मुदत संपून ते पुन्हा आमरण उपोषणाला बसले आहेत. काय आहे जरांगे पाटीलांच्या मागे असलेल्या लाखो लोकांची मानसिकता? जरांगेच्या १४ तारखेच्या सभेल उपस्थित असलेल्या मला या संपूर्ण प्रवासात सभेत काय बघायला ऐकायला मिळालं. ते असं.

 

सभेआधी चार दिवस अंतरवाली सराटी आणि आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन, लोकांशी बोलून, मनोज जरांगे यांच्याशी बोलून ‘ग्राऊंड’ वर नेमकं काय घडतंय… मनोज जरांगेंवर फुलं उधळणारे जेसीबी कुणाचे… पहाटे पाच वाजता सभा झाल्या तरी वाट पाहणारी लाखोंची गर्दी  लोक कोण यासाठी ‘थेट मैदानातून’ ही सिरीज केली.

 

चार दिवस आधीच नगर मार्गे छत्रपती संभाजीनगरीत पोचलो. रात्री क्रांती चौकात जरांगे यांची होंर्डिंग बघायला मिळाली. आम्ही रात्री नऊला पोचलो पण तत्पूर्वीच छत्रपती संभाजी नगरात जरांगे यांची सभा पार पडली होती. मनोज जरांगे यांच्या सभा, गाठीभेटी आहेत त्या प्रत्येक गावात जायचं. काही गावांमध्ये ते पोचायच्या आधी, काही गावांमध्ये ते येऊन गेल्यानंतर आणि काही गावांमध्ये प्रत्यक्ष सभेच्या वेळी असं चार दिवसांचं नियोजन ठरलं!

 

पहिल्याच दिवशी आडगाव सरककडे निघालो. चहा घेण्यासाठी थांबलो तेव्हा वृत्तपत्र विक्रेत्याशी बोलताना ‘गरिबाचं काय खरं नाही!’ एवढं एकच वाक्य बोलून त्यानं हात जोडले. लोकांचा मूड कळायला इथूनच सुरुवात झाली. चौका चौकात रांगोळ्यांचा पायघड्या, जेसीबी, फुलांनी भरलेली पोती, जरांगेंचे फोटो असलेले टी शर्ट घालून घोषणा देणारे तरुणांचे घोळके हे चित्र साधारण सगळीकडे होतं! ‘एकच मिशन मराठा आरक्षण’ ही नवी घोषणा ऐकत ऐकत प्रवास चालू होता.

 

या आंदोलनात सहभागी लोकांशी इनफॉर्मल गप्पा करत माहिती घेत होतो. त्यावेळी पळशी किंवा आडगावला शाळा, जुनियर कॅालेजचे मुलं मुली स्वतः हुन संवाद साधत होते. या मुलांचे आई वडील शेतीत राबतायत. शेती कमी कमी होत गेलीय. कधी ओला दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ. शेती परवडत नाही. आम्हाला शेती करायची नाही शिकून नर्स, डॉक्टर, पोलीस अधिकारी व्हायचंय..

 

म्हणजे नोकरी मिळेल, त्याकरता आरक्षणाची गरज आहे. फी परवडत नाही पण शिक्षणात सवलत मिळेल, नोकरीत आरक्षण मिळेल. खेळण्या बागडण्याच्या वयात ही मुलं भविष्यातल्या नोकरीची  करताना दिसत होता. आरक्षणच त्यांची स्वप्न पूर्ण करू शकतं ही पक्की धारणा त्यांची आहे आणि मनोज जरांगेच हे करू शकतील हा ठाम विश्वासही! 

 

जरांगेंच्या सभा गाठीभेटी यामध्या सर्व वयोगटातले लोक सहभागी होतं होते. गंगापूर, बिडकीन, पैठण, आपेगाव सगळीकडे  शिस्तबद्ध नियोजन होतं. जरांगेना सभांना यायला ५-६ तास उशिर झाला तरी लोक थांबून राहिले होते. जेसीबीतून फुलं उधळून होणारं स्वागत, औक्षण, फटाके, काही ठिकाणी तर डॅाल्बी यात कुठे खंड पडला नाही.  ‘माझा नेता येतोय मग डॉल्बी वाजवून स्वागत केलं, जेसीबीतून फुलं उधळली तर काय चुकलं? आम्ही पदरमोड करून करतोय…’ हा सूर गावकऱ्यांचा होता. हळू हळू मनोज जरांगे पाटील यांची ताकद, नेटवर्क उलगडू लागलं.

 

ऑक्टोबर हीटमुळे सगळीकडे कोरडं शुष्क वातावरण होतं. सगळीकडे विकतच्या बाटलीबंद पाण्याची चोख व्यवस्था होती. गंगापूरलाच्या ठिकाणी मुस्लिम युवकांकडून सभेला येणाऱ्या मराठा समाजातील कार्यकर्त्यांसाठी पाणी वाटप करण्यात येत होतं. याशिवाय आम्ही ज्या गावात फिरत होतो तिथे लोक म्हणत होते की,  पाऊस नाहीये. सोयाबीन, तूर, कापूस हातचा गेला, ऊसाचं काही खरं नाही. आता पाऊस थेट आठ महिन्यांनी, त्यामुळे कसं होणार, सरकार नुकसान भरपाई, अनुदान देईल की नाही याची माहिती नाही, पीक विम्याची हमी नाही. आमच्या भागात लोकप्रतिनिधी फिरकत नाहीत. एक ना दोन तक्रारी च तक्रारी! आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे मग काहीतरी होईल. आम्हाला आरक्षण मिळणारच हा विश्वासही आहे!

 

बिडकीनमध्ये सभेवेळी शाळकरी मुली भेटल्या. कुणाला आयपीएस व्हायचंय. एकीला क्रिकेटर व्हायचंय. आठवीतली मुलगी बोलत होती. कष्ट करायची तयारी आहे, शिकायचं आहे. विराट, रोहितचा खेळ तिला आवडतो. आयपीएलमुळे आता संधी आहेतच. बहुसंख्य मुलींना शिकायचंय. आवडत्या क्षेत्रात करियर करायचंय. नुसतं चूल मूल नकोय हा बदल सुखावह आहे. पण पुन्हा तेच… आई वडील गरीब शेतकरी आहेत. शिकायचं तर फी परवडत नाही. नोकरीची हमी नाही. त्यामुळे त्यांना आरक्षण हक्काचं वाटतंय. सगळीकडेच हे ऐकून ऐकून धक्का बसेनासा झाला. प्रश्न बिनतोड वाटू लागला पण उत्तर मात्र सापडत नव्हतं.

 

एका गावात टपरीवर चहा पिताना गावातल्या ज्येष्ठांबरोबर गप्पा झाल्या. त्यांचं म्हणणं, सरकार कडून कसली अपेक्षा ठेवायची? सरकार टिकेल का याची गॅरंटी नाही. कोण कुणाबरोबर ते कळत नाही. सगळा विचका झालाय.

 

आमच्या गावात वयाची चाळिशी आली तरी लग्न न झालेली दोनअडीचशे मुलं आहेत. मुलींना नोकरी करणारा नवरा हवा. शेतकरी नको. त्यात ही सगळी मुलं बेरोजगार. एमआयडीसी आहे पण उद्योग नाहीत. कुठे आशा, कुठे निराशा… सगळं बघत पुढे जात राहिलो.

 

सभांच्या ठिकाणी मनोज जरांगेंचं जल्लोषात स्वागत होतं होतं हॅास्पिटलमधून बाहेर पडलेले जरांगे सलाईनची सुई हातावर तशीच ठेवून सभा घेतात, लोकांना भेटतात, भाषणं करतात याचं अप्रूप सामान्य माणसांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. जरांगे सभेच्या ठिकाणी व्यासपीठावर आल्यानंतर आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॅा. बाबासाहेब आंबेडकराच्या पुतळ्यांना पुष्पहार घालतात… मग जनतेला झुकून अभिवादन करतात आणि नंतर आपल्यातलाच एक जण बोलतोय अशी भावना जागवणारं साधंसोपं भाषण करतात! ‘माझं आणि इंग्लिशचं जमत नाही, मी आरक्षण घेतल्या शिवाय कुणाला सुट्टी देत नाही, छाताडावर बसून आरक्षण घेणार, सरकारचं डोकं थांबतं तिथं मराठ्यांचं सुरू होतं’ वगैरे अस्सल गावरान शैली आणि नर्मविनोद! यासगळ्याला लोक रिलेट होताना दिसत होते आणि टाळ्या, शिट्ट्या, घोषणा असा जोरदार माहोल तयार होतं होता!

 

मनोज जरांगेंची ‘आरक्षण योद्धा’ ही ‘इमेज’ तयार करणं आणि ठसवणं, बिंबवणं प्रयत्नपूर्वक केलं जातंय. हातावरच्या सलाईनच्या सुईसकट त्यांचं बाहेर फिरणं, आजारी असून आरक्षणासाठी लढणं… हे निवेदकाकडूनही आवर्जून सांगितलं जातं. भाषणात तेच तेच मुद्दे रिपीट होत असले तरी उपास्थित लोक बोअर होत नाहीत हे विशेष!  प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना बाईट्स, मुलाखती देत प्रवास सुरु राहतो. आम्हीही गाडीत बसून मुलाखत घेतली. पैठण ते आपेगाव जरांगेशी गप्पा-मुलाखत झाली. पुन्हा चौकात जेसीबीने फुलांची उधळण होताना जरांगे गाडीतून वर टपावर गेले. आणि यामध्ये मीही फुलांच्या वर्षावात न्हाऊन गेलो. यावेळी जरांगेंचा १२३ गावांत दबदबा बघायला मिळतो. ते सगळ्यांना भेटतात, हात मिळवतात, कुणालाही नाराज करत नाहीत.

 

मनोज जरांगेंची ‘आरक्षण योद्धा’ ही ‘इमेज’ तयार करणं आणि ठसवणं, बिंबवणं प्रयत्नपूर्वक केलं जातंय. हातावरच्या सलाईनच्या सुईसकट त्यांचं बाहेर फिरणं, आजारी असून आरक्षणासाठी लढणं… हे निवेदकाकडूनही आवर्जून सांगितलं जातं. भाषणात तेच तेच मुद्दे रिपीट होत असले तरी उपास्थित लोक बोअर होत नाहीत हे विशेष!

 

तिसऱ्या दिवशी अंतरवाली सराटीकडे जाताना वडीगुद्री गावात सोयाबीन काढणीची लगबग बघायला मिळाली. बाया काढणी करत होत्या. शेतकरी दादा सांगत होता, पावसाअभावी करपून गेलं पीक. रोग पडला. पीक आलं तर सरकार पामतेल आयात करतं. मग भाव मिळत नाही. आता तर पीक करपून गेलं. तूर, कापूस, ऊस पण जाणार… आमचं यंदा कसं व्हायचं? पण चला आता शेत रिकामं केली तर सभेला येणाऱ्या लोकांची वाहनं पार्क होतील. दुःखाला आनंदाची किनार म्हणतात ती हीच! काढणीला आलेल्या बायापण पूर्वी ३०० रुपये असलेली हजेरी आता २०० रुपये झाली हे सांगत होत्या. तरी दुसऱ्या दिवशी ‘हाजरी’ बुडवून त्या सभेला जाणार म्हणून खुशीत होत्या.

 

आमची शेती मुख्यमंत्री शिंदेंच्या नावावर करून देतो, पण आरक्षण द्या म्हणणारा शेतकरी… आयटीमध्ये नोकरी करणारा, पण सभेसाठी स्वयंसेवक म्हणून सुट्टी घेऊन आलेला युवकही इथे भेटला!

 

उपोषण स्थळपाशी असलेल्या कट्ट्यावर टेकलो. तर पलीकडे कीर्तन रंगात आलं होतं. गावातले इतर समाज बांधवही भेटले. त्यांनी स्पष्ट सांगितलं आरक्षणाला विरोध नाही गावात ओबीसी ३० टक्के आहेत पण आता हे बास करा दोन महिने झाले. दिवसभर स्पीकर… कर्कश्श आवाज, मीडियाचे लोक, पत्रकार परिषदा, साखळी उपोषण, भेटायला येणारे नेते… त्रास होतोय. विद्यार्थ्यांच्या परिक्षा आहेत. आजारी माणसं आहेत. ज्येष्ठ नागरिक आहेत. १४ तारखेची सभा झाली की सरपंचाना पत्र देणार म्हणाले. या धाडसाचं कौतुक वाटलं मला. आमची दखल मिडिया घेईल असं वाटत नाही असा टोलाही त्यानं मारला, पण तो निराशेतून आलेला कळत होता.

 

हे सगळं बघताना पिपली लाईव्हची आठवण झाली. २०११ च्या राळेगण सिद्धीतल्या अण्णा आंदोलनाचा सिक्वेल घडतोय असं वाटलं.

 

प्रत्यक्ष सभेच्या ठिकाणी पोचलो. १००/१५० एकरचा परिसर शेतकऱ्यांनी उभी पिकं कापून जरांगेंच्या सभेसाठी मैदान म्हणून तयार करुन दिला. जरांगेही सभेत, पत्रकार परिषदेत – १२३ गावांचा पुढाकार, सहकार्य, २२ गावांनी जमा केलेले २१ लाख रुपये याबद्दल आवर्जून सांगत होते. सभेच्या ठिकाणी दोन दिवस आधीच काम सुरु झालं होतं. सपाटीकरण, स्टेज, जरांगेंना चालत येण्यासाठी रॅम्प, त्यावर फुलांचा गालिचा, त्यावर इतर कुणी चढू नये म्हणून पहारा… एरवी मॅाडेल्स रॅम्पवर कॅट वॅाक करतात. इथे रोल मॅाडेलचा रॅम्पवॅाक होता! त्यामुळे या रॅम्पबद्दल आकर्षण होतं. इथेही घरचं कार्य असल्यासारखी तयारी होती. कुणी २५० स्क्रीनचा खर्च उचलला. कुणी ४०० भोंगे, स्पीकर्सचा. कुणी एक लाख पाण्याच्या बाटल्या वाटणार होतं. समाजातले लोक उत्स्फूर्तपणे पुढं येतायत खर्च उचलतायेत हे सांगून सात कोटींचे दावे खोडले जात होते. पडद्यामागून कोण खर्च करतंय या आरोपांना उत्तर दिलं जात होतं. आता हे सगळं कोटीत होतंय हे दिसत होतंच मात्र  लोकवर्गणीतून, उत्स्फूर्तपणे होतंय असं जरांगे आणि समर्थकांचं म्हणणं… तर अदृश्य महाशक्तीच्या वळचणीला गेलेल्या भुजबळांसारख्याचा दावा असा की यामागे अदृश्य हात असणार !

 

सभेसाठी दणकट स्टेज बांधलं होतं. स्टेज वर सभेदिवशी शिवरायांचा अश्वारुढ पुतळा आणि मनोज जरांगे दोघेच असणार होते. स्टेजच्या दोन्ही बाजूला प्रेक्षकांसाठी बैठक व्यवस्था होती. मीडियासाठी तब्बल २० कॅमेरे मावतील एवढं मोठं मचाण बांधलं होतं. नेटवर्कची समस्या येऊ नये यासाठी फायबर ऑप्टिकस केबल, राऊटरची सुविधा पुरवण्यात आली होती. ओबी व्हॅन्ससाठी स्टेज जवळ पार्किंग होतं. ऑक्टोबर हिटचा चटका बसला तर डॉक्टर, स्टाफ, यांनी सुसज्ज रुग्णवाहिका होत्या.

 

गावात चिंता आरक्षणाची नव्हती, शेतीची, पोटाची होती. सभेकरता टँकर आला तर विहिरीत पाणी कमी असलं तरी टँकर भरून द्यायची तयारी होती. पुढं कापूस काढणी सुरू होती. मुस्लिम शेतकरी कुटुंब होतं. किती पिश्या (पिशव्या ) बी लावलं, किती पिक मिळणार याचा मेळ लागत नव्हता. बोंडं पुरेशी आली नव्हती. तुरीत फुलोरा नव्हता, शेंगा लागणार कशा? पाऊस नाही. विहिरीत पाणी नाही. शेततळं कसं भरणार… मोसंबीची बाग जळून जाणार होती. एसबीआय कडून कर्ज घेतलं होतं. खाजगी सावकाराकडूनपण घेतलं होतं. पण त्याचा उल्लेख नको कारण अडचणीत येऊ, कर्ज  मिळणार नाही भविष्यात अशी भीती पण होती.

 

एप्रिलमध्ये झालेला अवकाळी पाऊस, मग जूनमधला झिमझिम पाऊस आणि नंतर पाऊसच नाही. आधी उभं राहून कापूस काढायचो आता बसून काढावा लागतो, यावरून उत्पादन किती कमी होईल याचा अंदाज  शेतकरी व्यक्त करत होते.

 

कुणाला पंतप्रधान शेतकरी योजनेचे पैसे मिळाले कुणाला नाही… शिंदे सरकारची नमो योजनाच माहीत नव्हती. शासन  आपल्या दारी येईल यावर विश्वास नव्हता. एकाकडे दुभती जनावरं होती पण हिरवा चारा नव्हता. ऊस विकत घेऊन खाद्य म्हणून घालावा लागणार होता. दुधाच्या जोडधंद्याचा थोडा आधार असतो पण दुष्काळात जनावरांच्या चोऱ्या वाढतात त्याची धास्तीही होती. एकीकडे हे असं विदारक चित्र…

 

सभेच्या दिवशी पहाटे उठून आवरून निघालो.  6 किलोमीटर चालायचं होतं. हायवेवर वाहनांच्या, चालत निघालेल्या लोकांच्या रांगा… अक्षरशः जनसागर उसळलेला! कुणी विश्रांतीसाठी हायवेवरच बाजूला झोपलंय. कुणी शेतात आडोसा धरून अंघोळ करतंय. कपडे बदलतंय. कुणी सोबत आणलेली भाजी भाकरी खातंय.

 

हायवे वरून सभेच्या मैदानाकडे  जाणारा एकच अरुंद रस्ता दोन दिवसात बनवलेला. आम्ही पोचलो तर सकाळी साडेआठ नऊ वाजताच मैदान भरून गेलं होतं. १५-१५ किलोमीटर अंतरावर वाहनं लावून लोक चालत येत होते.

 

सोलापूर, बारामती, नगर, परभणी, बीड, गेवराई, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र इथून मुख्यतः ओघ सुरू होता.

 

सभेच्या वेळे आधी अर्धा तास जरांगे यांचं रॅम्पवरून चालत स्टेजवर आगमन झालं. तुफान घोषणा… जनतेसमोर नतमस्तक होत शिवाजी महाराजांना वंदन करत भाषण… भाषणातून आरक्षणाचा गजर… टीका करणाऱ्या नेत्यांचा समाचार… सरकारला निर्वाणीचा इशारा… सगळं झालं! एक तर आरक्षणाची विजयी यात्रा निघेल नाहीतर जरांगेची अंत्ययात्रा असा एक प्रकारे अल्टीमेटमही देऊन झाला. ५० मिनिटं  हे भाषण चाललं. लोकांचा तुडुंब प्रतिसाद होता. व्यवस्थाही चोख होती. आठ प्रवेशद्वारांवर तीस हजार स्वयंसेवक होते. बिस्कीट पुडे, पाणी ,रुमाल वाटप, फिरती टॉयलेट्स, ॲंब्युलन्स… महिलांसाठी विशेष सुरक्षा व्यवस्था, सगळं कसं शांततेत… अजिबात गडबड गोंधळ नाही! अखेर दुपारी अडीच तीन वाजता सभा संपली. मैदान रिकामं व्हायला चार वाजले होते.

 

हे सर्व दिवस जरांगेना बघताना एवढं जाणवलं की, मनोज जरांगे पाटील हा साधा फाटका माणूस या आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व करतोय. आंदोलनातून या आधी अण्णा, कन्हय्या, केजरीवाल, टिकैत असे नेते जन्मले. आता आणखी एक नेता उदयाला आलाय.

 

आरक्षण मिळणार का मिळालं तर टिकणार का? मराठा विरूद्ध ओबीसी वादाला तोंड फुटणार का? कंत्राटीकरण रद्द झालं असलं तरी पुरेशा नोकऱ्या कुठं आहेत? परीक्षा वेळेवर कुठं होत आहेत?  असे अनेक प्रश्न आहेत. पण जरांगे आणि लोक ठाम आहेत. आश्वस्त आहेत. मागणी मान्य झाली नाही तर शांततेत आंदोलन सुरू राहील पण सरकारला ते पेलणार नाही, झेपणार नाही असं जरांगे म्हणतायत.

 

वादळापूर्वीची शांतता अनुभवत आम्ही पुन्हा पुण्याकडे निघालो होतो. पण डोक्यात असंख्य विचारांचं, प्रश्नाचं काहूर माजलं होतं. ते अद्याप शांत व्हायला तयार नाही.

 

– अद्वैत मेहता

हे ही वाच भिडू: 

मराठा आरक्षणाचं आंदोलन पुन्हा जिवंत करणारे मनोज जरांगे पाटील कोण आहेत?

न्यायालयाने पुन्हा स्पष्ट केलं कि मराठा आरक्षण हे फक्त केंद्र सरकारच्या हातात आहे.

सरकारच्या निर्णया अगोदर मनोज जरांगे यांनी दौरा काढला कारण..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.