व्यक्तीवेध – नीरव मोदी.

नीरव मोदीबद्दल सारं काही एका क्लिकवर…

सध्या भारतासोबतच जागतिक पटलावर चमकणारे नाव म्हणजे नीरव दिपक मोदी. या माणसाची एकंदरीत कामगिरी पाहता त्याच्या अचाट बुद्धींमत्तेच कौतुक नोटाबंदीच्या काळात लाईनमध्ये उभा राहणाऱ्याकडून होत आहे. म्हणूनच या सदरात आम्ही तुम्हांला सांगतोय नीरव मोदींबद्दल सारं काही….

सुरवात होते ती भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात. ज्या काळात नोटाबंदीत उभे असणाऱ्यांचे पुर्वज स्वातंत्र्यासाठी भांडत होते, त्याचं काळात नीरव यांचे आजोबा सुरत शहरातून सिंगापूरच्या दिशेने कुच केली आणि तिथे स्थायिक झाले. तिथे हिऱ्यांचा व्यापार करू लागले. पण म्हणतात ना, मोठ्या माणसांच्या मुलांच्या आकांक्षा पण मोठ्या असतात. त्याप्रमाणे केशवलाल यांचे सुपूत्र दिपक मोदी हिऱ्यांचा व्यापार घेऊन बेल्जिअमला स्थलांतरीत झाले. साल होतं १९७० च. याचवेळी नोटबंदीच्या काळात लाईनला उभा राहणाऱ्यांचे पुर्वज गेवराईहून बीडला स्थलांतर करत होते.

आता सुरवात होते नीरव मोदी प्रकरणाची. १९७० साली बेल्जिअममध्ये हिऱ्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलं हे बाळ, १९८९ साली अमेरिकेतल्या पेनिसेल्विया विद्यापीठात शिक्षणासाठी दाखल झालं. दरम्यानच्या काळात दिपक मोदींच्या बिझनेसचा बाजार उठल्याने नीरव मोदी भारतात आला आणि महिन्याला फक्त ३४०० रुपये घेत आपल्याच काकांकडे काम करु लागला. गोष्ट इथून पुढे इंटरेस्टिंग होत जाते.

१९९९ साली नीरवने स्वतःची हिऱ्यांची कंपनी सुरु केली. कंपनीचं नाव फायर स्टार. या कंपनीच्या उभारणीसाठी म्हणे त्याने दहा वर्षे साडेतीन हजार रुपये कमावून, वाचवलेल्या पैशातून पन्नास लाख रुपये उभारले. जगातल्या ९० टक्के हिऱ्यांना पॉलिश करुन देण्याचं काम भारतातच चालतं. नीरवची कंपनी तेच काम करू लागली. पण सदैव एक पाऊल पुढंच असणाऱ्या मोदींना लवकरच लक्षात आलं की, या कामाने काय आपण ‘हिरेकिंग’ होत नसतो. मग त्यांनी मार्केटमध्ये नविन स्किम आणली. स्किम अशी की, आम्ही तुम्हाला हिरे पॉलिश करून देणार, तुम्ही ते हिरे कट करणार आणि मग ते ज्वेलरीत घालून विकणार. त्यापेक्षा सरळ असंच करा की, द्या तो हिरा आम्हाला आम्ही थेट ज्वेलरीत घालूनच देतो. तुमचा खर्च पण वाचला आणि वेळ पण.

 

scopN3hffjafe 1
PTI

 

नीरवच्या अचाट बुद्धीमत्तेतून आलेल्या कल्पनेने रंग दाखवायला सुरुवात केली अन काम इतकं फायदा मिळवून देणारं ठरलं की लगोलग नीरव मोदींनी ‘फ्रेडरिक गोल्डमैन’ नावाची कंपनी ताब्यात घेतली. खरं तर इथचं डाळीतलं काळं लक्षात यायला पाहिजे होतं कारण विकत घेतलेली कंपनी, नीरवच्या कंपनीपेक्षा सातपट अधिक मोठ्ठी होती.

आता नीरवची गाडी इतकी सुसाट सुटली की, २००७ साली त्यांनी ‘सैंडबर्ग एंड सिकोर्सकी’ ही कंपनी तब्बल ३ अब्ज २० कोटी रुपयांना खरेदी केली. याच काळात जागतिक मंदी आली. २००८ हे वर्ष. हे तेच वर्ष जेव्हा आपण BCA ला स्कोप असल्याचं सांगू लागलो. तर अशा या वर्षात नीरवने हिरे खरेदीचा सपाटा लावला. त्याने हिरे खरेदी केले आणि मंदी संपल्यानंतर ज्वेलरीतून विकले. ‘डुगना लगान’ टाईपमध्ये हा सगळा प्रकार चालू होता, बसला तर सिक्सर !!! नीरवच्या नशिबानं तो बसला.

यश मिळायला लागलं की, महत्वाचं काम असतं ते सामाजिक सुधारणांचं. आता नीरव NGO मार्फत समाजसुधारणा करु लागला. मोठ्ठ-मोठ्या मासिकांना मुलाखती देऊ लागला. नेमकं याच वर्षी गोवळकोंड्याच्या खाणीतून १२ कॅरेटचा हिरा मिळाला. नीरवने तोही विकत घेतला अन त्यापासून लोटस नेकलेस तयार केला. इतकं सगळंआपण केलं असतं तर, नेकलेस बायकोला दिला असता. पण नाही, नीरवं पक्का बनिया. त्याने नेकलेसचा हॉगकॉंगमध्ये लिलाव केला. लिलावात नेकलेसला किंमत मिळाली तब्बल २३ करोड. आता तयार झाला नीरव मोदी नावाचा ब्रॅण्ड. २०१४ साली ‘नीरव मोदी’ ब्रॅण्डचं पहिलं दुकानं दिल्लीत उघडलं गेलं. त्यानंतर मुंबई आणि मकाऊ असं करत-करत निरव ग्लोबल झाला.

आता क्लायमॅक्स,

१६ जानेवारी २०१८. नीरवच्या कंपनीमार्फत ‘पंजाब नॅशनल बॅकेशी’ संपर्क साधला गेला. कंपनीला हॉन्गकॉन्गमधून काही वस्तू विकत घ्यायच्या होत्या, पण त्यांच्याकडे पैसे नव्हते. (या माणसाकडे कंपन्या विकत घ्यायला पैसै आहेत, पण सामान घ्यायला कसे नाहीत असा साधा प्रश्न कोणी विचारला नाही.) हे लोकं बॅकेत गेले आणि सांगितलं की आम्हाला ‘लेटर ऑफ अंडरटेकिंग’ पाहीजे. ‘लेटर ऑफ अंडरटेकिंग’ म्हणजे थोडक्यात बॅंक तुमचे पेसै द्यायला तयार आहे, असं पुढच्या कंपनीला सांगणारं पत्र. बँकेनं सांगितलं की, ‘आधी अडीचशे कोट जमा करा आणि लेटर घेवून जा’. तेव्हा यांनी उत्तर दिलं की, काय राव पहिल्यांदा करतोय का..? बघा की तेवढं, घ्या जमवून. आता मॅटर असा झाला की इथला अधिकारी निघाला  “तुकाराम मुंढे” टाईप. त्याला लगेच आला संशय. त्यानं दिले चौकशीचे आदेश, अन बोलावलं CBI ला. आणि मग समोर आलं या सगळ्या कांडाचं कारण. नीरवचंच काय पण त्याची बायको-भाउ, त्याचा डावा-उजवा हात यांपैकी कुणाचंच, साध अकाउंट पण बॅंकेत नव्हतं.

यापुर्वी देखील अशाच पद्धतीने बॅंक अधिकाऱ्यांशी संगनमत करुन हा बँकेला गंडा घालत होता. आता मात्र नीरवचा घोटाळा नागडा झालाय. आता तरी तो साडे अकरा हजार कोटींचा दिसतोय. पुढे नीरवने अजून कुणा-कुणाला किती गंडा घातलाय ते कळेलच.

सध्या तरी नीरव आपल्या ब्लफमास्टर टीमसह भारतातून बेपत्ता आहे. त्याचा काही आतापत्ता मिळालाच तर आम्ही तुम्हाला कळवूच.

Leave A Reply

Your email address will not be published.