२० जानेवारीशी कनेक्शन असलेल्या भारतातल्या या दोन सुपरस्पायनी भल्याभल्यांना घाम फोडलाय

आपल्यापैकी कित्येक जणांना इतिहासाची आवड असेल. पार चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकापासून आतापर्यंत आपण लय पुस्तकं वाचली असतील. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी घडवलेला इतिहास तर आपल्यापैकी कित्येक जणांना तोंडपाठ आहे. फक्त शिवरायांचाच नाही, तर मुगल, राजपूत, हिटलर, अमेरिकेचा स्वातंत्र्यलढा अशा लय गोष्टींबद्दल आपण वाचलं असेल. पण एक इस्त्राईल सोडलं, तर प्रत्येक इतिहासात गूढ असणारी व्यक्तिमत्व म्हणजे हेर.

कितीही अफाट उत्सुकता असली, तरी आपल्याला हेरांबद्दल फार कमी माहिती समजते आणि जितकीच समजते तितकी त्यांना जगाला दाखवायची असते. भारताबद्दल बोलायचं झालं, तर दोन गुप्तहेरांबद्दल आजही लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. भारतचे सुपरस्पाय म्हणून ओळखले जाणारे हे दोन जण म्हणजे, ‘रॉ’ चे संस्थापक रामेश्वर नाथ काव आणि भारताचे सध्याचे नॅशनल सिक्युरिटी ॲडव्हायझर अजित डोवाल.

या दोन्ही सुपरस्पायनी गाजवलेल्या मोहिमा आणि त्यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकुयात-

दिवंगत रामेश्वर नाथ काव हे रॉ चे संस्थापक. देश स्वतंत्र झाला तेव्हा लष्करासोबतच हेरगिरीचं काम सांभाळण्यासाठी ‘इंटेलिजन्स ब्युरो’ होतं. मात्र कुठली स्वतंत्र संस्था नव्हती. कालांतरानं तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारताच्या घोषित-अघोषित शत्रूंची माहिती ठेवण्यासाठी, त्यांच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी एक वेगळं युनिट असावं असं वाटू लागलं आणि तिथून झाली सुरुवात रिसर्च अँड नालिसिस विंगची अर्थात सगळ्या भारताचा अभिमान असलेल्या ‘रॉ’ ची.

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या सुरक्षा यंत्रणेची जबाबदारी सांभाळलेले आयबी ऑफिसर रामेश्वर नाथ काव यांना इंदिरा गांधींनी भारताच्या या हेरखात्याचं प्रमुख नेमलं. काव यांनी आपलं कौशल्य पणाला लावलं आणि त्यातून उभी राहिली ‘रॉ.’ जगभरातल्या कित्येक देशांमध्ये, महत्त्वाच्या कार्यालयांमध्ये रॉ चे एजंट नेमले गेले. काव यांनी केलेली त्यांची निवड आणि नेमणूक यामुळे ही पहिली बॅच ओळखली गेली, ती ‘कावबॉईज’ या नावानं.

काव यांनी आपल्या कारकिर्दित कित्येक मिशन्स गाजवली असतील. पण सगळ्या जगाला माहीत असलेली दोन महत्त्वाची मिशन्स म्हणजे, पाकिस्तानवर केलेला प्रतिहल्ला आणि बांगलादेशची फाळणी. जेव्हा पाकिस्तानमध्ये भारतावर हल्ला करण्याचा कट शिजत होता, तेव्हा ‘रॉ’ च्या एका माणसानं काव यांना टीप दिली. त्यानुसार काव यांनी सर्व यंत्रणांना अलर्ट ठेवलं आणि भारतीय एअर फोर्स सुसज्ज राहिला. पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्याला भारतानं दमदार प्रत्युत्तर दिलं. बांगलादेशच्या फाळणीवेळीही त्यांनी मोलाची भूमिका निभावली.

सोबतच काळाच्या पडद्यात आणि इतिहासाच्या पानांत लुप्त झालेली अनेक मिशन्स काव यांनी सार्थकी लावली आणि देशाला ‘रॉ’ सारखी महत्त्वाची आणि कणखर संस्था दिली.

काव यांनी सुरू केलेला हा बॅटन पुढे नेणारं परिचित व्यक्तीमत्त्व म्हणजे अजित डोवाल.

भारताचे जेम्स बॉंड म्हणून फेमस असणाऱ्या डोवाल यांचा जन्म झाला उत्तराखंडमध्ये. सैनिकी शाळेत शिकलेल्या डोवाल यांनी देशप्रेमाचे बाळकडू तिथूनच गिरवले असतील. पुढे त्यांनी इकोनॉमिक्समध्ये टॉप मारलं. १९६८ च्या बॅचचे ते आयपीएस ऑफिसर. त्यांनी काही वर्षातच इंटेलिजन्स ब्युरोमध्ये प्रवेश केला आणि काही वर्षांनी ते रॉ चे महत्त्वाचे सदस्य बनले.

जेवढ्या चर्चा बॉलिवूड स्टार्स किंवा क्रिकेटर्सच्या होत नाहीत, तितक्या डोवाल यांच्या होतात. त्यांनी भारतानं पाकिस्तानमध्ये केलेला सर्जिकल स्ट्राईकची आखणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचसोबत सुवर्ण मंदिराला धोका असताना राबवल्या गेलेल्या ऑपरेशन ब्लॅक थंडरमध्ये त्यांचा अत्यंत महत्त्वाचा वाटा होता. कंदहार अपहरणात भारतीय प्रवाशांची सुटका करण्यासाठी त्यांनी अतिरेक्यांसोबत मसलत केली.

आजही देश संकटात असताना, डोवाल क्शनमध्ये येतात आणि भारतीयांना काही प्रमाणात दिलासा मिळतोच. एक मात्र आहे, काव असतील किंवा डोवाल या दोन्ही सुपरस्पायबद्दल कुठल्या गोष्टी अफवा, कुठली माहिती खरी हे कुणालाच सांगता येत नाही आणि हेच त्यांचं यश आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.