लोकांनी त्याला किरकोळीत घेतलं, पण हाशिम आमला आफ्रिकेचा द्रविड निघाला…
राहुल द्रविडचं नाव घेतलं की आपल्याला भिंत आठवते. द्रविड काय भिंतीसारखा ढिम्म नव्हता, पण एकदा का क्रीझला चिकटला की अजिबात हलायचा नाही. द्रविडचा खेळ बघून कित्येक लोकांना प्रश्न पडायचा, हा काय वनडे क्रिकेटमध्ये चालायचा नाही. पण द्रविडनं सगळ्यांना खोटं ठरवलं आणि वनडेतही कडक बॅटिंग केली.
द्रविडसारखाच एक डिट्टो क्रिकेटर साऊथ आफ्रिकेकडे होता. त्याच्या बॅटिंगमध्ये दम होता, त्याचा स्वभाव प्रचंड निवांत होता, त्याला चिडलेलं, रागावलेलं कुणी आयुष्यात पाहिलं नसेल, तो क्रीझला चिकटला की दिवसभर हलायचा नाही आणि सगळ्यात भारी विषय म्हणजे… तो माणूस म्हणून आणि क्रिकेटर म्हणून लय बाप होता.
त्याचं नाव हाशिम आमला…
छातीपर्यंत येणारी दाढी, चेहऱ्यावर काय हसू आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हाशिम आमलाचे निम्म्याहून जास्त फोटो बॅटिंग करतानाचे आहेत. कारण हा गडी सगळा दिवस म्हणलं, तरी फक्त बॅटिंगच करत असायचा.
ही हाशिम आमलाच्या दोन गुणांची गोष्ट… तो सामोऱ्या गेलेल्या आव्हानांची आणि त्याच्या बॅटिंगची.
हाशिम आमला हा साऊथ आफ्रिकेकडून खेळणारा पहिला भारतीय वंशाचा क्रिकेटर. झालं असं की ब्रिटिशांनी भारतातून अनेक मजूर आफ्रिकेत नेले होते, मजूर नेल्यानंतर व्यापारी, पुजारी आणि काही हुशार लोकंही भारतातून आफ्रिकेत गेली. आमलाचे पूर्वज या दुसऱ्या गटातले होते.
पण म्हणून आमलाला आणि त्याच्या कुटुंबियांना आफ्रिकेत सन्मानाची वागणूक मिळाली असं नाही.
हाशिम आमलाचा भाऊही क्रिकेट खेळायचा, पण त्याच्या काळात वर्णभेद इतका खोलवर रुजला होता, की शाळेत गोऱ्या मुलांना वेगळी आणि काळ्या मुलांना वेगळी परीक्षा असायची. त्यांच्या क्रिकेट टीम्सही वेगळ्या असायच्या. सुदैवानं हाशिम अशा शाळेत आणि क्रिकेट क्लब होता, जिथं वर्णभेद नव्हता.
एक पायरी चढणं सोपं झालं असलं, तरी दुसरी पायरी चढणं अवघड होतं. कारण, क्लब क्रिकेट, डोमेस्टिक क्रिकेट खेळून स्वतःला सिद्ध केल्यानंतर आमला जेव्हा इंटरनॅशनल क्रिकेट खेळू लागला, तेव्हा त्याला दुर्दैवानं आणखी एक गोष्ट सिद्ध करावी लागली.
त्याचं साऊथ आफ्रिकन असणं…
तिकडची लोकं आणि मीडिया त्याला बाहेरचा म्हणून, भारतीय म्हणून टोमणे मारायची. त्यानं कडक बॅटिंग केली, मोठ्ठा स्कोअर लावला की, लोकांना उगाच धक्का बसायचा. लोकं सरप्राईज व्हायची. पण हाशिम आमला लोकांना सातत्यानं सरप्राईज करायला लागला. त्याच्या बॅटिंगमधली ताकद इतकी होती की मीडियाला फाट्यावर मारत तिकडची लोकं, आमलाची फॅन बनली.
रंगांवरुन तर त्याला गोष्टी सहन करायला लागल्याच, पण धर्मावरुन बोलणाऱ्यांची संख्याही कमी नव्हती.
कॉमेंटेटर डीन जोन्स एकदा आमलाला ‘आतंकवादी’ म्हणाला होता. एवढंच नाही, तर हाशिम आमला कधी दारुची जाहिरात करायचा नाही. साऊथ आफ्रिकेला स्पॉन्सर करणाऱ्या ‘Castle’ या दारु बनवणाऱ्या कंपनीचा लोगो आमलाच्या जर्सीवर कधीच दिसला नाही.
काऊंटी क्रिकेट खेळताना, त्याचे टीममेट्स त्यानं दारू प्यावी म्हणून फोर्स करायचे. पण गडी अजिबात तटला नाही, त्यानं आयुष्यात कधीच दारुची जाहिरात केली नाही.
बरं हे झालं, मैदानाबाहेरच्या गोष्टींचं… मैदानातला आमला जितका धीरगंभीर होता… तितकाच डेंजरही.
सुरुवातीला क्रिकेट पंडितांनी त्यांची मापं काढली होती. त्याची बॅकलिफ्ट, खेळण्याची टेकनिक या गोष्टी लोकांना अनऑर्थोडॉक्स आणि रटाळ वाटलेल्या. पण भावाचं नाणं खणखणीत वाजलं. आमलानं कसोटी क्रिकेटमध्ये तर कहर केला होता. किरकोळ विक्रम सोडा, आफ्रिकेकडून पहिलं कसोटी त्रिशतक आमलाच्या बॅटमधून झळकलंय. कसोटी क्रिकेटमध्ये लागणारी तंत्रशुद्धता हे त्याचं बलस्थान होतंच.
त्यामुळं हा काय वनडेमध्ये चालत नसतोय, असं कित्येकांनी छाती ठोकून सांगितलं होतं. आमला यातल्या एकालाही तोंडानं उत्तर देत बसला नाही, त्यानं निवांत खेळणं सुरू ठेवलं. हळूहळू गडी वनडे क्रिकेटमधला नंबर वन बॅट्समन ठरला. कधी आरडाओरडा नाही आणि कधी वांड वाटणारं सेलिब्रेशन नाही. आता आकडेवारी बघायची झालीच, तर वनडे क्रिकेटमध्ये आमलानं ८११३ रन्स केलेत आणि सेंच्युरी मारल्यात २७. कसोटी क्रिकेटमधले हेच आकडे ९२८२ आणि २८ असे आहेत.
विषय निघालाच आहे, तर आमलाच्या एका इनिंगबद्दल बोलू. आफ्रिका विरुद्ध इंग्लंड टेस्ट मॅच सुरू होती, तेही आफ्रिकेत. आफ्रिकेला होम ग्राऊंडवर इंग्लंडनं ६२९ रन्स चोपले होते. तिसऱ्याच ओव्हरमध्ये आफ्रिकेनं एक विकेट गमावली.
आमला क्रीझवर आला, पुढचे तीन दिवस आणि साडेसातशे मिनिटं क्रीझवरुन हलला नाही. जेव्हा हलला तेव्हा नावापुढं २०१ रन्स होते.
एकदा भारताविरुद्ध खेळताना त्यानं २४४ बॉल्समध्ये २५ रन्स केले होते. आपली जनता बॉलिंग टाकून दमली, पण या भिंतीला पाझर काय फुटला नाही. हाशिम आमलाचा ग्रेटनेस त्यादिवशी सगळ्या जगानं पाहिला.
आमलानं आपल्या क्रिकेट करिअरमध्ये अनेक रेकॉर्ड्स केले, साऊथ आफ्रिकेला अशक्य वाटणाऱ्या मॅचेस जिंकवून दिल्या, कित्येक लोकांना कसोटी क्रिकेटचं वेड लावलं. अनेक तास न थकता बॅटिंग केली, पण या सगळ्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट त्यानं केली…
गोरे खेळाडू म्हणजे मेरीट आणि काळे खेळाडू म्हणजे कोटा सिस्टीम, हा कित्येकांचा गैरसमज आमलाच्या बॅटमधून निघालेल्या प्रत्येक शतकानं, प्रत्येक रननं आणि आफ्रिकेला जिंकवून दिलेल्या प्रत्येक मॅचनं खोडून टाकला…
कायमचाच!
हे ही वाच भिडू:
- या दोन इनिंग्समुळं समजतं, एबी डिव्हीलियर्सला एलियन का म्हणतात
- दारुच्या नशेत बॅटिंग करणाऱ्या हर्शेल गिब्जनं ऑस्ट्रेलियन बॉलिंगची पिसं काढली होती
- बाऊचरच्या वर्ल्डकपमध्ये चुकलेल्या गणितामुळं आफ्रिका पुन्हा एकदा रांझनामधली कुंदन ठरली…