या दोन इनिंग्समुळं समजतं, एबी डिव्हीलियर्सला एलियन का म्हणतात

साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया किंवा भारतात जगाच्या पाठीवर कुठंही मॅच असली आणि हा गडी बॅटिंगसाठी उतरला, की प्रेक्षकांमध्ये आनंदाची लाट यायची. हा क्रीझवर आला की आपल्या टीमला फिक्स धुणार हे माहीत असूनही याची बॅटिंग बघायला मिळणार याचा लय आनंद असायचा. हा जगातला एकमेव प्लेअर असेल, जो आऊट झाला की दोन्हीकडच्या चाहत्यांना दुःख व्हायचं. सेहवाग, विराट, रिचर्ड्स, पॉन्टिंग, गावसकर यांच्यापैकी कुणाशीच त्याची तुलना होऊ शकत नाही. कारण चाहत्यांच्या मते ही सगळी माणसं आहेत आणि हा बादशहा मात्र एलियन.

विषय अर्थातच अब्राहम बेंजामिन डिव्हिलियर्सचा म्हणजेच एबीडीचा सुरु आहे.

भारतीय चाहत्यांसाठी क्रिकेट म्हणजे धर्म, जिव्हाळ्याचा विषय. इकडची जनता आपल्याला दिलेल्या शिव्या गप ऐकून घेईल, पण आवडत्या प्लेअरला कोण काय बोललेलं अजिबात नाही. आधी आवडते क्रिकेटर्स बऱ्यापैकी भारतीयच असायचे, पण एबीडी आला आणि सगळी दुनियाच बदलली. पोरं जितकं विराटवर प्रेम करतात तितकंच एबीडीवरही.

भारतीयांना एबीडी सगळ्यात आधी माहीत पडला तो व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमुळं. एबीडीचं नाव क्रिकेट जगतात गाजत होतं. टेस्ट, वनडे, टी२० आणि बोनस म्हणून आयपीएल सगळीकडे एबीडीची मजबूत हवा होती. हा असली एवढी वाढीव बॅटिंग कशी काय करू शकतो. असा प्रश्न सगळ्या जगाला पडायचा. त्याचवेळी आपल्याकडं व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये एक मेसेज फिरू लागला की एबीडी साऊथ आफ्रिकेकडून हॉकी, टेनिस, फुटबॉल असे सगळे खेळ आंतरराष्ट्रीय लेव्हलला खेळलाय. लोकांना हा मेसेज खरा वाटायचा आणि एबीडीचा आणखी उदोउदो व्हायचा.

एबीडी हा मेसेज खरा आहे म्हणला असता, तरी पण कुणी चेक करायला गेलं नसतं. पण भाऊनं प्रामाणिकपणे सांगितलं की, ‘असं काय नाहीये. मी आंतरराष्ट्रीय पातळीवर फक्त क्रिकेट खेळलोय.’

एबीडीनी आपल्या कारकीर्दीत अनेक भारी इनिंग्स खेळल्या. त्याची सगळ्यात बेस्ट स्पेशालिटी होती, ती म्हणजे मैदानाच्या सगळ्या कोपऱ्यात फटकेबाजी करणं. म्हणून सगळं क्रिकेटविश्व त्याला मिस्टर ३६० डिग्री म्हणून ओळखू लागलं. याचीच झलक त्यानं जोहान्सबर्गमध्ये दाखवून दिली होती.

वेस्ट इंडिज विरुद्ध साऊथ आफ्रिका, वर्ल्डकप २०१५. साहजिकच प्रेशरची मॅच. पण आफ्रिकन भिडू त्यादिवशी वेगळ्याच मूडमध्ये होते. हाशिम आमला आणि रिले रॉसौनं पहिल्या विकेटसाठी २४७ रन्सची पार्टनरशिप केली, ३९ व्या ओव्हरमध्ये रॉसौ आऊट झाला. बऱ्याचदा असं होतं, की मोठी पार्टनरशिप झाली आणि विकेट पडली की स्कोअरला ब्रेक लागतो.

पुढचा फलंदाज क्रीझवर आला आणि मैदानावर झालं तांडव. शेवटच्या ११ ओव्हर हातात होत्या, बॉल मोजून ६६. पण तेवढ्या बॉलमध्ये त्या फलंदाजानं विंडीज बॉलर्सचा घाम काढला. सुरुवात काहीशी हळू केली आणि त्यानंतर मात्र कुणालाच सुट्टी दिली नाही. त्यानं फक्त ३१ बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. फक्त ३१ बॉल्स. बरं एवढं करुन गडी शांत बसला नाही. पुढच्या १३ बॉल्समध्ये त्यानं ४९ रन्स मारले. ४४ बॉल्समध्ये ९ फोर आणि सहा सिक्स मारणाऱ्या त्या फलंदाजाचं नाव होतं, एबी डिव्हिलिअर्स. खऱ्या अर्थानं एलियन.

या इनिंगमध्ये फास्टेस्ट फिफ्टी आणि फास्टेस्ट सेंच्युरी करत फटकेबाजीचा कहर करणारा एबीडी, बचाव करण्यातही तितकाच भारी होता.

दिल्लीच्या मैदानावर भारत विरुद्ध आफ्रिका टेस्ट मॅच सुरू होती. आफ्रिकन फलंदाज आऊट होण्याच्या घाईत होते. त्यांच्या पहिल्या इनिंगमध्ये एबीडीचे ४२ रन्स सोडले, तर एकाही फलंदाजाला लय सापडली नाही. दुसऱ्या इनिंगमध्ये आफ्रिकेला जिंकण्यासाठी ४८१ रन्स हवे होते. पहिल्या दोन विकेट्स पडल्यावर भारत किरकोळीत जिंकेल असं वाटत होतं. हाशिम आमलानं आपल्या नेहमीच्या स्टाईलनं क्रीझवर नांगर टाकला. पण त्याला समोरुन तशी साथ मिळणंही गरजेचं होतं. दुसऱ्या बाजूला डिव्हिलिअर्स उभा राहिला आणि बघता बघता त्यांनी बचावाचा बुरुज बांधला.

एबीडीनं २९७ बॉल्स खेळत फक्त ४३ रन्स केले. उमेश यादव, इशांत शर्मा, अश्विन, जडेजा एवढंच नाही, तर शिखर धवन, मुरली विजय, विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनीही बॉलिंग टाकली. पण एबीडीची भिंत बराच वेळ तुटली नाही. शेवटी अश्विननं मोहीम फत्ते केली. एबीडी आऊट झाल्यावर गड जिंकायला भारताला वेळ लागला नाही. एबीडीनं फक्त टीमच नाही सगळ्या देशाला घाम फोडला होता हे नक्की.

आता क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली असली, तरी कितीही जोरात आलेला बॉल मैदानाच्या कुठल्याही कोपऱ्यात मारण्याची क्षमता एबीडीमध्ये होती. त्याचाच सहकारी डेल स्टेन सांगतो, ‘फक्त बॉल लांब मारायचंच टॅलेंट त्याच्याकडे होतं असं नाही. तुम्ही कितीही जोरात बॉल टाकला तरी तो इतक्या हळू प्लेट करायचा की बॉल त्याच्या पायापाशीच थांबायचा. मी माझ्या आयुष्यात दुसऱ्या कुठल्याच फलंदाजाला हे करताना पाहिलेलं नाही.’

बॉल लांब मारणं, डिफेन्स करणं, गरज पडल्यावर २९७ बॉलमध्ये ४३ रन्स करणं आणि ४४ बॉलमध्ये १४९ रन्स करणं, विकेटकिपींग आणि फिल्डिंगचा बोनस.. एबी डिव्हलियर्स.. खऱ्या अर्थानं एलियन!

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.