दारुच्या नशेत बॅटिंग करणाऱ्या हर्शेल गिब्जनं ऑस्ट्रेलियन बॉलिंगची पिसं काढली होती

भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच म्हणजे फुल थरार, ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड म्हणजे ॲशेसची शिस्त, भारत विरुद्ध श्रीलंका म्हणलं की नुसतीच हाणामारी. प्रत्येक संघाच्या मॅचेसच्या आपल्या स्पेशल आणि बऱ्याच आठवणी असतात. पण ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका म्हणलं, की एकच मॅच डोळ्यासमोर येते, दी 438 मॅच.

रेकॉर्ड्सचा पाऊस पडलेली ही मॅच, आपल्यापैकी कित्येक लोकांनी टीव्हीसमोर बसून पाहिलीये. ही मॅच गाजली ती धावांच्या पावसामुळं, पॉन्टिंगमुळं, ग्रॅमी स्मिथमुळं आणि महत्त्वाचं म्हणजे हर्शेल गिब्जमुळं.

क्रिकेट हा रेकॉर्डचा खेळ समजला जातो. पण जवळपास प्रत्येक रेकॉर्ड बनतो, तो तुटण्यासाठीच. काही काही रेकॉर्ड असे असतात जे तुटो किंवा न तुटो, पण फॅन्सच्या लक्षात अगदी शेवटपर्यंत राहतात. असाच एक रेकॉर्ड झाला होता, १२ मार्च २००६ या दिवशी, आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये. वनडे सिरीजमधली पाचवी मॅच. ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका दोघांनी दोन दोन मॅचेस जिंकलेल्या, त्यामुळे या पाचव्या मॅचचा थरार शिगेला पोहोचला होता.

वनडे क्रिकेटच्या इतिहासातली ही सगळ्यात खतरनाक मॅच. ज्या ज्या लोकांनी या मॅचची तिकीटं काढली, त्या त्या लोकांना पैसा वसुल मॅच काय असतं याचा अनुभव आला होता.

पहिल्यांदा बॅटिंगला आली ऑस्ट्रेलिया. त्यांनी आफ्रिकन बॉलिंगची भयंकर धुलाई केली. टॉप ऑर्डरमध्ये ॲडम गिलख्रिस्ट ५५, सायमन कॅटीच ७९, मायकल हसी ८१ आणि स्वतः कॅप्टन रिकी पॉंटिंग १६४. एवढ्या बाजारामुळं ऑस्ट्रेलियानं ४३४ रनांचा डोंगर उभारला. इथंच अर्धे लोकं समजून गेले होते, की ही मॅच आता ऑस्ट्रेलिया मारणार. वनडे क्रिकेटमध्ये डावात ४०० पेक्षा जास्त रन्स करणारी ऑस्ट्रेलिया ही पहिली टीम ठरली.

कॅलिसचं मोटिव्हेशन

पण हा फक्त ट्रेलर होता, आफ्रिकन संघ इतका स्कोअर बघून आधीच कोमात गेला होता. त्यांना जवळपास कळलंच होतं की, एवढा स्कोअर आपण काय चेस करु शकत नाही. बाजार उठलेल्या त्यांच्या ड्रेसिंग रुममध्ये भयाण शांतता होती, मात्र ऑलराउंडर कॅलिस भाऊ म्हणाले, ‘आपण मस्त खेळलो. मला वाटतंय त्यांनी १५ रन्स कमीच केलेत.’ काहीजण कॅलिसचं बोलणं ऐकूनच हँग झाले, पण जे होईल ते होईल म्हणत टीम बॅटिंगला उतरली.

दुसऱ्याच ओव्हरमध्ये डिपानेर आऊट झाला आणि आफ्रिका आता गंटागळ्या खाणार असं वाटू लागलं. मग क्रीझवर आला हर्शेल गिब्ज. ऑस्ट्रेलियाचे बॉलर्स काय साधे नव्हते, पण गिब्जचा इरादाही पक्का होता. त्यानं कॅप्टन ग्रॅम स्मिथच्या सोबत १८७ रन्सची पार्टनरशिप केली.

स्मिथ ऑस्ट्रेलियन बॉलर्सला हाणत होताच, पण गिब्जची तार लागली होते. त्यानं ऑस्ट्रेलियाच्या एकाही बॉलरला सुट्टी दिली नाही आणि १११ बॉलमध्ये १७५ रन ठोकले. तेव्हा ऑस्ट्रेलियन बॉलर्सला एवढं कुणी हाणू शकतं, यावर विश्वास बसणंही कठीण होतं. गिब्जच्या राड्यामुळं आफ्रिकेनं ३१ ओव्हर्समध्येच तीनशेच्या जवळपास रन्स चोपले होते.

तो आऊट झाल्यावर, पुढची कामगिरी करायला घेतली ती मार्क बाऊचर आणि वॅन डर वॅथनं. आव्हान खडतर होत जाण्याऐवजी सोपं होत गेलं, आफ्रिकन बॅटर्सनं  कांगारूंचा किस पाडत ४३८ रन्स बोर्डावर लावले, त्यांनी विक्रम तर मोडलाच पण अशक्य वाटणारी मॅचही जिंकली.

ऑस्ट्रेलिया न आवडणाऱ्या प्रत्येक घरात आनंद साजरा झाला. 

गिब्जची नशा आणि हसीचा चुकलेला अंदाज

त्या मॅचमध्ये सगळ्यात मोठा धिंगाणा गिब्जचाच होता. पण त्याच्या या बॅटिंगमागे एक वाढीव किस्सा आहे. गिब्जनं ही बॅटिंग केली दारूच्या नशेत असताना. हे गुपित मायकल हसीनं त्याच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे. ज्यावेळी प्लेअर्स जेवण करायला गेले तेव्हा लिटिल लिटिल दारू पिण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे सगळे प्लेअर्स खाऊन पिऊन निघाले, पण गिब्ज मात्र मस्तपैकी कोपऱ्यात बसून दारू पीत होता.

मायकल हसीनं त्याला पाहिलं, पण तो काही बोलला नाही. त्यानं विचार केला की, ‘हा एवढी दारू पितोय म्हणल्यावर बॅटींगमध्ये काय करत नसतोय.’ पण भाऊ नशेतच बॅटिंगला आला आणि सगळ्या ऑस्ट्रेलियन बॉलिंगचा बाजार उठवून गेला.

गिब्ज फक्त मधल्या ब्रेकमध्येच दारु पिला असं पण नाही, साहेब मॅचच्या आधी पण फकाट होऊन आले होते. त्यामुळं कॅप्टन ग्रॅमी स्मिथ त्याच्यावर नाराज होता. कारण गडी इतकी दारू पिलेला होता की, टीम मिटिंगच्या वेळीही तो शुद्धीत नव्हता. पण ऑस्ट्रेलियाच्या ४३४ धावांचा पाठलाग करून गिब्जनं आणि आफ्रिकन टीमनं मॅच मारुन दिली होती. ही मॅच जिंकल्यानंतर स्मिथनं स्वतः बियरची बॉटल गिब्जला भेट दिली. गिब्जची नशा ऑस्ट्रेलियाला चांगलीच महाग पडली होती. त्यादिवशी गिब्जकडे बघून कळलं, नशेत माणूस काय काय करू शकतो. ऑस्ट्रेलियन बॉलर्सला धुवू शकतो आणि काही तासांपूर्वी झालेला वर्ल्ड रेकॉर्ड मोडूही शकतो.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.