भारत-चीन एकमेकांशी भिडतात त्याचं एक कारण पैंगोंग तलावसुद्धा आहे

सध्या भारत आणि चीन दरम्यान लष्करी चर्चेची १४ वी फेरी सुरू आहे. जवळपास २० महिन्यांपासून चाललेल्या लष्करी अडथळ्याचे निराकरण करण्यासाठी ही चर्चेची फेरी पुन्हा एकदा सुरू झाली आहे. लष्करी कमांडर स्तरावरील या संवादामध्ये, पूर्व लडाखमधील संघर्षाच्या उर्वरित ठिकाणांहून दोन्ही देशांच्या सैनिकांना मागे घेण्याच्या प्रक्रियेवर चर्चा केली जाणार आहे.

पण लडाखमध्ये अशी एक जागा आहे ज्यावरून भारत आणि चीन नेहमी एकमेकांशी भांडत असतात. ती जागा म्हणजे पैंगोंग तलाव. लडाखमधील पैंगोंग तलावाच्या किनाऱ्यावर भारत आणि चीनचे सैनिक अनेकदा समोरासमोर येतात. वास्तविक नियंत्रण रेषेजवळील (LAC) हॉट स्प्रिंग्स, गोग्रा आणि डेपसांग भागात वारंवार तणाव निर्माण होत असतो. गेल्या वर्षी ५ मे रोजी पैंगोंग तलावाच्या परिसरात दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर लष्करी वाद निर्माण झाला होता.

भारत आणि चीनमध्ये नेहमी वादाचं कारण ठरणारा पैंगोंग तलाव आहे काय?

या तलावाला ‘पँगॉन्ग त्सो’ असेही म्हणतात. हिमालयात वसलेले हे सरोवर सुमारे ४५०० मीटर उंचीवर आहे. १३५ किमी लांबीचं हे सरोवर ६०४ चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापतं. या खाऱ्या पाण्याच्या तलावाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिवाळ्यात ते पूर्णपणे गोठतं, त्यानंतर तुम्ही त्यावर गाडी चालवू शकता किंवा आइस स्केटिंग किंवा पोलोपण खेळू शकता. पण त्यासाठी तशी परवानगी काढणं गरजेचं आहे.

थंडीत गोठणारे हे खाऱ्या पाण्याचे सरोवर जवळपास बुमरँगच्या आकाराचे आहे. या सरोवराचं पाणी इतकं खारट आहे की त्यात मासे किंवा इतर कोणतेही जलचर नाहीत. पण तरीही अनेक स्थलांतरित पक्ष्यांसाठी हे एक महत्त्वाचं प्रजनन स्थळ आहे. या सरोवराचं सरासरी तापमान उणे १८ अंश ते उणे ४० अंशांदरम्यान राहतं. असं मानलं जातं की हा तलाव दिवसातून अनेक वेळा आपला रंग बदलतो, यामागचं कारण म्हणजे सरोवराच्या पाण्यात असलेलं लोहाचं प्रमाण.

तसंच असंही म्हटलं जातं की १९६२ च्या युद्धादरम्यान हे ते ठिकाण होतं जिथून चीननं मुख्य आक्रमण सुरू केलं होतं. त्यावेळी चुशुल व्हॅलीच्या दक्षिण-पूर्व टोकाला असलेल्या ‘रेझांग ला’ या पर्वतीय खिंडीतूनही भारतीय सैन्याने युद्ध केले होतं.

पैंगोंग तलावावरून भारत चीन नेहमी एकमेकांशी का भिडतात?

याचं उत्तर या तलावाच्या एकूण क्षेत्रफळाच्या विभाजनात सापडतं. या सरोवराचे ४५ किमी क्षेत्र भारतात (लडाख) आहे, तर त्याचे ९० किमी क्षेत्र तिबेट (चीन) मध्ये येते. वास्तविक नियंत्रण रेषा (LAC) या सरोवराच्या मध्यातून जाते असं मानलं जातं. मात्र, त्याच्या नेमक्या स्थानाबाबत भारत आणि चीनमध्ये  अनेकदा संभ्रम निर्माण होतो. यामुळेच कधी चीनचे सैन्य पुढे सरकतं तर कधी भारताचं. आणि अशाने सुरु होतात वाद.

जेव्हा दोन्ही देशांचे सैन्य गस्त घालत असताना समोरासमोर येतात, तेव्हा सामान्यत: एक बॅनर लावला जातो ज्यामध्ये दुसऱ्या बाजूने आपला प्रदेश साफ करण्यास सांगितलं जातं आणि तेव्हाच तणाव निर्माण होतो. गेल्या काही वर्षांत चिनने पैंगोंग त्सो सरोवराच्या काठावर रस्ते बांधले आहेत, त्यामुळे वाद अजूनच वाढला आहे. या रस्त्यांद्वारे चीनची स्थिती भौगोलिकदृष्ट्या पैंगोंग सरोवराच्या उत्तरेकडील टोकावर असलेल्या भारतीय स्थानांपेक्षा मजबूत झाली आहे.

सरोवराच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर असलेल्या उंच डोंगरावर प्रत्येकाला आपला हक्क हवा आहे. पैंगोंग  तलावाजवळ ८ टेकड्या आहेत ज्या हाताच्या बोटांच्या आकाराच्या आहेत. म्हणूनच या पर्वतांना सैन्य ८ फिंगरच्या नावाने संबोधित करते. LAC फिंगर ८ शी जोडलेला असल्याचा भारताचा दावा आहे पण भारताचं नियंत्रण फक्त ४ फिंगरपर्यंत आहे. आणि चीनने फिंगर ८ वर आपले सैन्य तैनात केलं आहे. तर LAC फिंगर २ मधून जातो असा चीनचा दावा आहे. 

भारताची कायमस्वरूपी पोस्ट फिंगर ३ च्या जवळ आहे. सीमेचा वाद फिंगर ४ ते फिंगर ८ पर्यंत आहे कारण फिंगर ४ ते फिंगर ८ पर्यंतचा भाग भारतीय लष्कराच्या ताब्यात आहे. पण फिंगर ४ ते फिंगर ८ पर्यंतचा भाग दोन्ही सैन्याच्या पेट्रोलिंगचं म्हणजेच गस्तीचे क्षेत्र आहे. भारत ८ व्या फिंगरपर्यंत पायी गस्त  घालतो. काही वर्षांपूर्वी चीनने फिंगर ४ वर कंस्‍ट्रक्‍शन करण्याचा प्रयत्न केला होता, जो भारताच्या तीव्र आक्षेपानंतर हटवण्यात आला होता.

इतकंच नाही तर पाण्याच्या प्रश्नावरून गेल्या काही वर्षांपासून संघर्ष होत असल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. दोन्ही देश आता गस्तीसाठी बोटींचाही वापर करतात. हायस्पीड बोटींच्या समावेशामुळे चिनी सैन्य अधिक आक्रमक झाले आहे, परंतु तरीही गेल्या ७ वर्षांत भारतानेही चीनच्या सीमेवर आपली स्थिती मजबूत केली आहे.

असा हा पैंगोंग तलाव भारत आणि चीन मधील संघर्षाचा अतिशय संवेदनशील मुद्दा आहे. ज्यावरून गेली वर्षानुवर्षे भारत आणि चीन एकमेकांशी भिडत असतात. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.