राजकारणी ज्यांच्यावर आहेत घोटाळ्यांचे आरोप पण ED कडून होत नाही चौकशी !!

१) येदीयुरप्पा :-

खाण घोटाळ्याच्या आरोपांवर २०११ साली कर्नाटक लोकायुक्तांच्या चौकशीवरून जेलमध्ये जावे लागले. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला, राजीनामा दिल्यावर त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. कर्नाटक जनता पक्ष नावाचा स्वतःचा वेगळा पक्ष काढला, पुढे २०१३ ला ते परत भाजप पक्षात आले. केंद्रात भाजप सरकार आल्यापासून त्यांच्यावरच्या आरोपांची चौकशी हवेत जिरली.

२) रेड्डी ब्रदर्स :-

रेड्डी ब्रदर्स कर्नाटकाचे, भाजपचे खासदार. खाणमाफिया, अवैधरित्या खाण उत्खननातून १६,५०० कोटी रुपयांचा यांचा घोटाळा फॉरेस्ट अधिकारी, १९९१ बॅचचे IFS अधिकारी कलोल बिस्वास यांनी उजेडात आणला अन् यांच्या खाणीवर बंदी आणली, पुढे मोदी सरकार आल्यावर या प्रामाणिक अधिकाऱ्याला सेवेतून कमी करण्यात आले.

कर्नाटक “ऑपरेशन कमळ” मध्ये रेड्डी बंधूंचा मोलाचा वाटा असतो अशा बातम्या प्रसिद्धी माध्यमात येत असतात.

३) शिवराज सिंग चौहान :-

व्यापम घोटाळ्याचा यांच्यावर ठपका ठेवला जातो. काय आहे नेमका व्यापम घोटाळा ? आपल्या MPSC सारखे मध्यप्रदेश बोर्डाचे VYAPAM नावाचे बोर्ड आहे. त्या माध्यमातून घेतलेल्या १३ सरकारी विभागाच्या डमी बसवून, परीक्षेत कोऱ्या उत्तरपत्रिका सोडणाऱ्या मुलांना पण सरकारी सेवेत कोट्यावधीचा घोटाळा करून शामिल करून घेतले.

हे प्रकरण उघडकीस केव्हा आले ?

२०१३ साली इंदोर पोलिसांनी परीक्षेला डमी बसलेल्या २० जणांना जेव्हा अटक केली. तेव्हा यांचे एक रॅकेट समोर आले. जगदीश सागर या रॅकेटचा प्रमुख अटकेत आला. त्याचे राजकारणी, अधिकारी वर्ग यांच्याशी  अत्यंत जवळचे संबध. तो मुलांना उत्तरपत्रिका पुरवत असे. त्यांच्या जागी डमी उमेदवार बसवत असे. पोलिसांना या प्रकरणाची पूर्ण खोलात जाऊन चौकशीला सुरवात केली अनेक धागेदोरे समोर आले, २०१५ पर्यत २००० जणांना अटक केली. यात तत्कालीन शिक्षणमंत्री लक्ष्मीकांत शर्मा सहित छोटे मोठे १०० राजकारणी होते. २०१५ ला ही केस सुप्रीम कोर्टाने CBI कडे सोपवण्याचे आदेश दिले. जशी जशी चौकशी पुढे जात गेली तशी तशी नवीन माहिती हाती लागले.

तपास करताना संशयाची सुई ज्यांच्यावर फिरेल अशा अनेक आरोपींचा रहस्यमयरित्या मृत्यू झाले, यामध्ये माजी गव्हर्नर राम नरेश यादव यांच्या मुलाचा झालेला अपघाती मृत्यू. या घटनेवर स्टोरी करणाऱ्या अक्षय सिंग नावाच्या आज तकच्या पत्रकाराचा पण मृत्यू झाला. नम्रता दामोर या परीक्षार्थी मुलीचा मृतदेह रेल्वेच्या पटरीवर आढळून आला. अशे दोन-तीन नव्हे तर  या केसशी निगडित असणाऱ्या तब्बल ३६ जणांचे लोकांचे संशयास्पदरित्या मृत्यू झाले. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान असल्याने, केंद्रात मोदी सरकार असल्याने या सर्व प्रकाराला “क्लीन चिट” देण्यात आली.

४) मुकुल रॉय :-

२८०० कोटी रुपयांचा शारदा चिटफंड घोटाळा, पश्चिम बंगालचे पूर्वाश्रमीचे ममता बॅनर्जी यांचे सहकारी असणाऱ्या मुकुल रॉय यांच्यावर शारदा ग्रुपच्या चिटफंड घोटाळ्यात लोकांचे पैसे बुडवल्याचा आरोप झाले, याविरोधात भाजपने रान पेटवले होते, त्या विरोधानंतर तृणमूल काँग्रेस पक्षातून त्यांची हाकालपट्टी करण्यात आली. २०१७ साली त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला अन् घोटाळ्याच्या आरोपांपासून मुक्ती मिळवली…

५) हिमांता बिस्वा शर्मा :-

हे आसामचे नेते आहे, पूर्वाश्रमीचे आसाम काँग्रेसचे मंत्री होते. गुवाहाटी येथे पाणी पुरवठा योजनेत घोटाळा केला म्हणून आसाम भाजपने त्यांच्यावर एक पुस्तिका लिहली होती. यात अमेरिकेन कंत्राट कंपनीचा सहभाग आहे. त्या कंपनीने या मंत्र्याला पैसे दिले असे भाजपने त्यांच्यावर आरोप केले. भाजपने ही केस CBI/ED कडे सोपवावी अशी मागणी केली होती. वर्षं २०१५ साली त्यांनी भाजपात प्रवेश केला अन या मागण्या पण धुवून गेल्या. सध्या ते आसाम भाजपच्या मंत्रीमंडळमध्ये मंत्री आहेत.

६) रमेश पोखरियाल “निशांक” :-

हे भाजपकडून उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांच्यावर दोन मोठ्या घोटाळ्याचे आरोप झाले. पहिला हायड्रो-इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आणि दुसरा अनधिकृत जमिनीचा. आरोपामुळे सन २०११ साली भाजपने त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडले. पुढे CBI/ED चौकशीची मागणी झाली पण पहिल्या उदाहरणाप्रमाणे यांनाही सूट मिळाली. सध्या ते खासदार म्हणून निवडून आलेले आहेत अन मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री सुद्धा आहेत..

ED/CBI हे सत्ताधारी पक्षांचे पोपट आहेत असे आरोप भाजपने विरोधात असताना काँग्रेसवर केले होते. आता काँग्रेस विरोधात आहे तर त्यांच्यावर करत आहेत. पण हे मात्र खरे आहे की या संस्था म्हणायला जरी स्वायत्त असल्या तरी त्यांचे काम हे राजकिय नेत्यांच्या आदेशावरच चालत असल्याचा संशय येतो.

  • वैभव कोकाट

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.