कर्नाटकातील प्रचार सभेदरम्यानच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘ऐतिहासिक’ घोडचूका…!!!

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शिक्षण नेमकं किती आणि कुठपर्यंत झालंय याबाबतीत  बरीच गोंधळाची स्थिती असली तरी, त्यांचा इतिहासाचा अभ्यास फारसा चांगला नसावा यासंदर्भातले अनेक पुरावे उपलब्ध आहेत. आपल्या अनेक भाषणांमध्ये ऐतिहासिक घटनांचे संदर्भ देताना प्रधानसेवकांनी खोटी माहिती दिल्याचंही आपण यापूर्वी अनेक वेळा बघितलंय.आता परत एकदा कर्नाटकातील आपल्या प्रचार सभेदरम्यान इतिहासासंदर्भातील अशाच घोडचूका प्रधानसेवक नरेंद्र मोदी यांनी केल्या आहेत.

किस्सा असा घडलाय की, प्रधानसेवक नरेंद्र मोदी कर्नाटकातील एका प्रचार सभेत भाषण करत होते.आपल्या भाषणात प्रधानसेवक म्हणाले की, “१९४८ साली  भारताने  जनरल थिमय्या यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानविरुद्धचं युद्ध जिंकलं. या पराक्रमानंतर देखील पाकिस्तानपासून काश्मीरला वाचविणाऱ्या जनरल थिमय्या यांचा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि संरक्षणमंत्री कृष्ण मेनन यांनी वारंवार अपमान केला. याच कारणास्तव आत्मसन्मानार्थ जनरल थिमय्या यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. ही गोष्ट मला कर्नाटकातील नवीन पिढीला सांगावीशी वाटते.”

nehru with thimayya and cariappa
जवाहरलाल नेहरू, फिल्ड मार्शल करिअप्पा आणि जनरल थिमय्या

प्रधानसेवक प्रचार सभेत बोलून तर गेले पण भाषणात सांगितलेली माहिती धाधांत खोटी निघाली. आम्ही ज्यावेळी ही माहिती क्रॉसचेक केली त्यावेळी जे तथ्य समोर आलं ते पुढीलप्रमाणे-

१) १९४८ साली जनरल थिमय्या हे भारतीय सैन्याच्या प्रमुखपदी  नव्हते. त्यावेळी भारतीय सैन्याचे प्रमुख होते ‘जनरल रॉय बुशर’. जनरल रॉय बुशर हे ब्रिटीश अधिकारी होते. जनरल थिमय्या यांनी  १९५७ ते १९६१ या चार वर्षांच्या कालावधीत भारतीय सैन्यदलाचे प्रमुख म्हणून काम पाहिलं.

२) १९४८ साली जनरल थिमय्या सैन्यप्रमुख म्हणून कार्यरतच नव्हते, त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. १९५९ साली जनरल थिमय्या सैन्यप्रमुख असताना, तत्कालीन संरक्षण मंत्री कृष्ण मेनन यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर आपला राजीनामा सादर केला होता. परंतु पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनीच हा राजीनामा न स्वीकारता आपल्या पदावर कार्यरत राहण्यासाठी जनरल थिमय्या यांची मनधरणी केली. जनरल थिमय्या यांनी देखील पंतप्रधानांच्या शब्दाचा मान ठेवत आपली सेवा पूर्ववत सुरु ठेवली. पुढची  दोन वर्षे ते सैन्यप्रमुख म्हणून कार्यरत होते.

४) जनरल थिमय्या आणि तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यातील संबंध  मोठ्या प्रमाणात विकोपाला गेल्याची किंवा नेहरूंनी थिमय्या यांचा अपमान केल्यासंबंधीची कुठलीही माहिती उपलब्ध नाही, उलट १९४८ च्या समरप्रसंगात थिमय्या यांनी बजावलेल्या कामगिरीबद्दल नेहरूंनी त्यांचं कौतुकच केलं होतं. जनरल थिमय्या यांचा पद्म भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता.

५) १९४८ साली कृष्ण मेनन हे देशाचे संरक्षण मंत्री नव्हते, तर सरदार बलदेव सिंग हे होते.

पुढे बोलताना प्रधानसेवकांनी १९६२  साली  चीन बरोबर झालेल्या युद्धाचा संदर्भ दिला. प्रधानसेवकांना या युद्धातील फिल्ड मार्शल करिअप्पा यांच्या शौर्याची आठवण झाली आणि त्यांना देखील काँग्रेसने अपमानास्पद वागणूक दिल्याचा जावईशोध आदरणीय प्रधानसेवकांनी लावला. आता आम्ही ही माहिती देखील क्रॉसचेक केली. त्यात असं समजलं की-

६) जनरल करिअप्पा आणि १९६२च्या ‘भारत-चीन’ युद्धाचा अर्था-अर्थी संबंध नाही. जनरल करीअप्पा या युद्धाच्या दशकभरापूर्वी म्हणजेच १९५३ सालीच भारतीय सैन्यातून निवृत्त झाले होते.

७) १९५१ साली जवाहरलाल नेहरू आणि जनरल करिअप्पा यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या, पण ते केवळ मतभेद या पातळीवर होतं. नेहरूंनी करिअप्पा यांचा अपमान केल्याचा कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही.

८) १९८६ साली राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारनेच जनरल करिअप्पा यांना ‘फिल्ड मार्शल’ या भारतीय सैन्यातील सर्वोच्च रँकने सन्मानित केलं होतं.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.