काँग्रेस १४९ वरुन १८ वर आणि भाजप ११ वरुन १५६ वर : असं आहे गुजरातचं ‘मोदी मॅजिक’

सोशल मीडिया स्क्रोल करताना एक मीम दिसलं, गुजरातचं बॅकग्राऊंड, समोर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुढं लिहिलेलं ‘में नही तो कौन बे ?’ गुजरातमध्ये सलग सातव्यांदा भाजपनं सत्ता मिळवली आहे. २०१७ मध्ये पाटीदार आंदोलनानंतर भाजपला ९९ जागांवर समाधान मानावं लागलं होतं.

 मात्र यंदाच्या निवडणुकीत हा बॅकलॉग भरुन काढत भाजपनं १५० पेक्षा जास्त जागांवर बाजी मारली.

१८२ पैकी १५६ जागा जिंकत भाजपनं रेकॉर्डब्रेक यश मिळवलंय आणि या यशाचं श्रेय जसं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना दिलं जातंय, तशीच चर्चा होतीये ती

गुजरातमधल्या मोदी मॅजिकची.

मोदी सक्रिय राजकारणात आले तेव्हा गुजरातमध्ये भाजपच्या किती जागा होत्या, त्या तुलनेत काँग्रेस कुठं होतं आणि आजच्या घडीला काय परिस्थिती आहे ते पाहुयात.

सुरुवात होते १९८५ पासून

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते असणाऱ्या नरेंद्र मोदींनी १९८५ मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला, असं सांगण्यात येतं. १९८५ मध्येच गुजरातमध्ये निवडणूका झाल्या. ज्यात काँग्रेसनं सत्ता राखत एकहाती बाजी मारली. तब्बल १४९ जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. तर भाजपला ११ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. जनता पार्टीला १४ तर अपक्षांना ८ जागांवर विजय मिळाला होता.

१९९० च्या निवडणुका

पाचच वर्षात भाजपनं मोठी झेप घेतली आणि ११ आमदारांचा आकडा झाला ६७, हेच काँग्रेसला फक्त ३३ च जागा मिळाल्या. सगळ्यात मोठा पक्ष ठरला ७० जागा जिंकणारं जनता दल. कुणालाच स्पष्ट बहुमत मिळालं नाही आणि भाजप आणि जनता दलानं एकत्र येत सत्ता स्थापन केली. जनता दलाचे चिमणभाई पटेल गुजरातचे मुख्यमंत्री झाले. पहिल्यांदा भाजप गुजरातमध्ये सत्तेचा भाग झाली. त्याच वर्षी नरेंद्र मोदींची भाजपच्या राष्ट्रीय निवडणूक समितीवर निवड झाली. लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेच्या आयोजनाचा कामही मोदींकडे देण्यात आलं होतं.

१९९५ च्या निवडणुका

१९९२ मध्ये मोदी आणि शंकरसिंह वाघेला या दोघांमधलं वितुष्ट विकोपाला गेलं. याचा परिणाम म्हणून मोदी सक्रिय राजकारणातून बाजूला झाले, पण १९९४ मध्ये ते पुन्हा सक्रिय राजकारणात परतले आणि त्यांनी १९९५ च्या विधानसभा निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी पुढाकार घेतला.

त्याचा परिणाम निकालांमध्ये दिसून आला. भाजपनं पहिल्यांदा गुजरातमध्ये एकहाती सत्ता मिळवली. काँग्रेस ४५ जागांवर मर्यादित राहिलं, तर भाजपनं जिंकल्या १२१ जागा. या विजयामुळं भाजपमधलं नरेंद्र मोदींचं महत्व अधोरेखित झालं होतं. केशूभाई पटेल गुजरातचे मुख्यमंत्री झाले, तर मोदींना भाजपचे राष्ट्रीय सचिव म्हणून दिल्लीत बढती मिळाली.

गुजरात विधानसभेचा हा कार्यकाळ भाजपमध्ये पडलेली फूट आणि शंकरसिंह वाघेला यांनी केलेल्या खेळी यामुळं गाजला होता.

१९९८ च्या निवडणुका

यावेळी मात्र नरेंद्र मोदींनी आपली ताकद खऱ्या अर्थानं दाखवून दिली. तिकीट वाटपात त्यांच्याकडे बरेच अधिकार आले होते, त्यामुळं त्यांनी वाघेला समर्थकांना बाजूला सारत केशूभाई पटेल समर्थकांना बळ दिलं. भाजपनं पुन्हा एकदा सत्ता राखत १८२ पैकी ११७ जागा जिंकल्या, तर काँग्रेसला ५३ जागांवर यश मिळालं. मुख्यमंत्रीपदाची माळ पुन्हा एकदा केशूभाई पटेलांच्या गळ्यात पडली. मात्र आरोपांचा धुरळा आणि तब्येतीच्या कारणामुळं त्यांना पदावरुन पायउतार व्हावं लागलं आणि ऑक्टोबर २००१ मध्ये नरेंद्र मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. १४९ जागांवर असलेलं काँग्रेस थोडक्यात पन्नाशीच्या पुढं होतं तर भाजपनं मात्र सलग तिसऱ्यांदा गुजरातची सत्ता मिळवली होती.

२००२ च्या निवडणुका

नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्यापुढचं सगळ्यात मोठं आव्हान होतं डिसेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणूक जिंकण्याचं. शंकरसिंह वाघेला यांच्या रूपात मोठं आव्हान समोर होतं, पण मोदींची जादू पुन्हा एकदा चालली आणि भाजपनं १२७ जागा जिंकल्या. एकीकडं भाजपच्या जागांमध्ये १२ ने वाढ झाली आणि दुसरीकडे काँग्रेसच्या जागा दोननं कमी झाल्या.

डिसेंबरमध्ये निवडणुका झाल्या आणि फेब्रुवारी महिन्यात गुजरातमध्ये गोध्रा कांड घडलं. त्यानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या दंगलीसाठी नरेंद्र मोदींना जबाबदार धरण्यात आलं आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली.

त्यांनी दिलेला राजीनामा स्वीकारण्यात आला नाही आणि पुढची पाच वर्ष मोदीच मुख्यमंत्रीपदी कायम राहिले.

२००७ च्या निवडणुका

गुजरात दंगल आणि त्यानंतर झालेल्या घडामोडींचा परिणाम निवडणुकीत दिसेल असा अनेकांचा अंदाज होता. मात्र तो खोटा ठरवत भाजपनं पुन्हा एकदा बाजी मारली. यावेळी भाजपच्या आमदारांची संख्या १२७ वरुन ११७ झाली, तर काँग्रेसचे आमदार ५१ वरुन ५९ झाले. पण तरीही कॉंग्रेसला फार मोठी मुसंडी मारता आली नाही. मोदींनी सलग तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली.

२०१२ च्या निवडणुका

गुजरात मॉडेल देशभरात लोकप्रिय होत होतं आणि २०१२ मध्ये पुन्हा एकदा मोदींनी गुजरात राखलं. त्यांच्या जागा दोननं कमी होऊन ११५ झाल्या, तर काँग्रेसच्या दोननं वाढून ६१ झाल्या. या दोन्ही पक्षांसोबतच इतर पक्षांनीही गुजरातमध्ये थोडंफार यश मिळवलं. २०१४ मध्ये मोदी देशाचे पंतप्रधान म्हणून निवडून आले आणि मुख्यमंत्री पदाची कमान त्यांनी आनंदीबेन पटेल यांच्याकडे सोपवली. त्यांच्यानंतर विजय रुपानी गुजरातचे मुख्यमंत्री झाले. थोडक्यात मोदी पंतप्रधानपदी गेल्यावर भाजपनं सुरुवातीलाच दोन मुख्यमंत्री बदलले.

२०१७ च्या निवडणुका

देशभरात मोदी लाट कायम होती, तिथं मोदींच्या होम ग्राऊंडवर भाजपनं बॅकफूटवर जाण्याचा प्रश्नच नव्हता. पण राज्यात उसळलेलं पाटीदार आंदोलन, त्यावरुन भाजपला झालेला विरोध यामुळं काँग्रेसला चांगली संधी चालून आली होती. मात्र भाजपला या आंदोलनांचा आणि पाटीदार समाजात असलेल्या असंतोषाचा फार मोठा फटका बसला नाही आणि त्यांनी पुन्हा एकदा गुजरातची सत्ता मिळवली.

भाजपच्या जागांमध्ये मात्र मोठी घट बघायला मिळाली. १९९५ नंतर पहिल्यांदाच भाजपच्या दोन आकडी जागा निवडून आल्या. त्यांना ९९ जागांवरच यश मिळालं. तिकडं काँग्रेस सत्तेत आलं नसलं तरी त्यांनी ७८ जागा मिळवत जोरदार टक्करही दिली होती.

भाजपनं पुन्हा एकदा विजय रुपानी यांना मुख्यमंत्री बनवलं, तर २०२१ मध्ये पाटीदार समाजाच्या भूपेंद्र पटेल यांना मुख्यमंत्री बनवलं.

आता जर २००२ पासून भाजपच्या आमदारांची संख्या बघितली तर एक पॅटर्न बघायला मिळतो, की आमदारांची संख्या कमी होत गेली आणि हेच काँग्रेसची संख्या वाढत गेली (आमदारांची संख्या आणि कंसात साल)

भाजप – १२७ (२००२), ११७ (२००७), ११५ (२०१२), ९९ (२०१७)
काँग्रेस – ५१ (२००२), ५९ (२००७), ६१ (२०१२), ७८ (२०१७)

मागच्या ४ निवडणूक बघितल्या, तर टप्प्याटप्प्यानं भाजपच्या जागा कमी होतायत हे स्पष्ट होत होतं. म्हणूनच २०२२ च्या निवडणुकांमध्ये काय होतंय, यावर सगळ्यांचं लक्ष होतं. त्यात पारंपारिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या काँग्रेससोबतच आपनंही या निवडणुकीत भाजप विरोधात शड्डू ठोकला होता. पण असं असलं तरी, मोदींनी सभा, रोड शो यांच्या माध्यमातून प्रचार गाजवला.

 ‘आ गुजरात में बनाव्यू छे’ म्हणजेच हे गुजरात मी बनवलंय अशी घोषणा मोदींनी केंद्रस्थानी ठेवली. 

आपचा जोरदार प्रचार, काँग्रेसची भारत जोडो यात्रा, अंतर्गत खदखद असे अनेक मुद्दे विरोधात असतानाही भाजपनं मोदी मॅजिकच्या जोरावर बाजी मारली.

भाजपच्या जागा कमी होणार का ? आप मुसंडी मारणार का ? या सगळ्या शक्यता खोट्या ठरवत भाजपनं रेकॉर्डब्रेक १५६ जागा जिंकल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘मॅजिक’ पुन्हा एकदा दिसून आलीये, एवढं नक्की.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.