भाजपच्या पराभवामागे आहे वाजपेयींची पुतणी

आज निवडणुकीचे निकाल. सगळ्याचं लक्ष मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या हाय व्होल्टेज मॅच कडे लागले आहे. यामुळे छत्तीसगड मिझोरम या छोट्या राज्याकडे मिडियाचे दुर्लक्ष झाले . विशेष करून छत्तीसगड. काय कारण होते याचे?? 


उत्तर आहे डॉ.रमणसिंग. भाजपातर्फे सर्वात विक्रमी काळ मुख्यमंत्रीपदी राहिलेला माणूस.

७ डिसेंबर २००३ पासूनचे छत्तीसगडचे मुख्यमंत्री. गेली पंधरा वर्ष रमणसिंग यांच्या मुळेच छत्तीसगड भाजपाचा बालेकिल्ला राहिला आहे. चावलवाले बाबा म्हणून ओळखले जाणारया रमणसिंग यांना या वेळच्या निवडणुकीनंतरही एक्झिट पोल मध्ये पसंती देण्यात आली होती.

काँग्रेसकडे आव्हान उभा करण्यासाठी नेतृत्वही नाही अशी स्थिती होती. तरीही निकाल हाती आले तेव्हा मिडीयावर चर्चेत आलेल्या सगळ्या चाणक्यपंडिताचे डोळे फिरले. नेतृत्वहीन काँग्रेसने जवळपास ६०जागा जिंकून एकहाती विजय मिळवला आहे. 

रमणसिंग हे जनसंघ काळापासून भाजपचे नेते राहिले आहेत. २००३साली एका स्टिंग ऑपरेशनच्या कृपेने त्यांना अनपेक्षितपणे मुख्यमंत्रीपद मिळाले. भाजपाचे छत्तीसगडचे नेते दिलीपसिंह जुदेव “पैसा खुदा तो नही मगर खुदा से कम भी नही” हे वक्तव्य करून विजनवासात गेले.

कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री मोतीलाल व्होरा यांना हरवणारा जायंट किलर नेता म्हणून फेमस झालेल्या रमणसिंग यांच्या झोळीत भाजपचे नेतृत्व आले.


रमणसिंग राजकारणातून वेळ काढून दर शनिवारी फ्री क्लिनिक उघडून गरीब रुग्णांवर मोफत उपचार करणारे म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या क्लीन इमेजबद्दल छातीठोक पणे सांगितलं जायचं.

२००८सालच्या निवडणुकीवेळी तर अजित जोगी सोडले तर अख्खीच्या अख्खी छत्तीसगड प्रदेश काँग्रेस कमिटी नक्षलवाद्यांनी उडवली. ही निवडणूकसुद्धा रमणसिंगनी सहज खिशात टाकली.  त्यानंतर त्यांनी आणली चावल योजना. गरिबांना २ रुपयात तांदूळ देणाऱ्या योजनेमुळे त्यांना चावलवाले बाबा नाव पडले. 


२०१३च्या निवडणुकीला मोदीलाट आणि रमणसिंग यांच काम यामुळे भाजपला विशेष प्रचारसुद्धा करावा लागला नाही. मग या निवडणुकीत असं काय घडलं.


गेल्या पाच वर्षात छत्तीसगड भाजप मध्ये सगळ काही आलबेल नव्हत. रमणसिंगच्या क्लीन इमेज ला वेगवेगळ्या घोटाळ्यामुळे तडे गेले होते. नक्षलवाद रोखण्यात आलेले अपयश हा सुद्धा त्यांच्या विरुद्धचा मुख्य मुद्दा होता. गेल्या १५ वर्षाची अॅन्टी इन्कम्बन्सी सुद्धा होती.

एवढे असून सुद्धा निवडणूकपूर्व जनमत रमणसिंगच्या विरोधात दिसत नव्हते. भाजप तर्फे त्यांच्या विरुद्ध त्यांच्या राजनंदगाव या मतदारसंघात लढायलाही काँग्रेसतर्फे कोणी तयार नव्हते.


अशा वेळी संकटमोचक म्हणून धावून आल्या करुणा शुक्ला. अटलबिहारी वाजपेयी यांची पुतणी.


२०१३ साली मोदींना खुले आव्हान देत त्या भाजपासोडून काँग्रेसमध्ये आल्या होत्या. नरेंद्र मोदीचा वाजपेयींच्याप्रती आदर हा खरा तर बुरखा आहे आणि ते भाजपला वाजपेयींच्या रस्त्यावरून दूर न्यायचं काम करत आहेत हे त्यांचे आरोप होते. २०१४ साली लोकसभा निवडणुकीवेळी छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या त्या एकमेव विजयी खासदार होत्या. 


अशा या करुणा शुक्ला यांनी जायन्ट किलर  रमणसिंगच्या विरुद्ध राजनंदगाव येथून निवडणूक लढवली. कधी नव्हे ते रमणसिंगना आपल्या गावी प्रचारासाठी रस्त्यावर यावे लावले.

सकाळपासून मतमोजणी सुरु असताना करुणा शुक्ला अनेक फेऱ्यामध्ये रमणसिंग यांच्या पुढे होत्या. अखेर रमणसिंग यांनी कशीबशी आपली सिट राखली. पण त्यांचे छत्तीसगड वरचे १५ वर्षाचे राज्य मोडून काढले.

छत्तीसगडवर अनपेक्षितपणे काँग्रेसचा झेंडा लागला आहे.  आता वाजपेयींच्या पुतणीला रमणसिंगना घाम फोडण्याचे बक्षीस म्हणून मुख्यमंत्रीपद मिळते का हे पाहणे interesting ठरणार आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.