गेल्यावर्षी महाराष्ट्र दिनाला गाव साफ करण्याचा निर्णय घेतला, आजही ते चालू आहे.

स्वच्छ भारत मोहिमेच्या वेळी अनेकजण हातात झाडू घेऊन कचरा साफ करताना फोटोसेशन करत होते. सोशल मीडियावर फोटो टाकून चमकोगिरी करत होते. आज मागे वळून पाहिलं की ही लोकं कुठं गायब झाली हाच प्रश्न पडतो. परंतु अशा चमकोगिरीला फाटा देऊन काही लोकं आजही केवळ स्वच्छतेचा ध्यास घेऊन शहर व समाज परिवर्तनासाठी झटत आहेत,

त्यापैकीच एक नाव म्हणजे राकेश दड्डाणावार.

सागंलीतील राकेश दड्डाणावार हा महाविद्यालयीन युवक स्वच्छतेचा ध्यास घेऊन गेली १ वर्ष म्हणजे तब्बल ३६५ दिवस कोणताही खंड पडू न देता सांगली शहर स्वच्छ करण्यासाठी आपल्या काही सवंगड्यांना सोबत घेऊन ध़डपडत आहे. गेल्या वर्षभरात त्याने आपल्या स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून सांगली शहराचा कायापालट करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.

राकेशला मी सोशल मीडियाच्या माध्यमातून गेल्या तीन-चार वर्षापासून ओळखतोय. सुरुवातीला तो विविध सामाजिक उपक्रम व उपोषण वगैरे यातून धडपडताना दिसायचा. परंतु अचानक गेल्या वर्षी १ मे रोजीपासून राकेशने सांगली शहर स्वच्छ करण्यासाठी त्याच्या निर्धार संघटनेच्या माध्यमातून मोहिम हाती घेतल्याचे दिसले. सुरुवातीला वाटलं की हा देखील इतरांसारखीच चमकोगिरी करु पाहतोय की काय.

त्यामुळे एखाद्या आठवड्यात, किंवा फारतर एखाद्या महिन्या भरात त्याचं हे शहर स्वच्छतेचं अंगातील ज्वर उतरुन जाईल, परंतु पठ्ठ्याने सर्वांचाच अंदाज चुकवत गेली एक वर्षापासून कोणत्याही दिवशी खंड पडू न देता, त्याने हाती घेतलेली स्वच्छतेची मोहिम सुरु ठेवली आहे. राकेशने गेल्या वर्षभरात स्वच्छतेच्या माध्यमातून शहराचा कायापालट करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. गेली वर्षभर तो शहर स्वच्छ करण्यासोबतच विविध शाळा, महाविद्यातील विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व सांगून त्याविषयी जागृती करीत आहे.

या शहर स्वच्छतेच्या या मोहिमेत राकेशने सोशल मीडियाचा पुरेपूर चांगला वापर करुन घेतला आहे. या मुळे अनेकजण या मोहिमेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी होत आहेत. राकेशने तरुणाईला स्वच्छतेचे महत्व कळावे यासाठी घाणीचे साम्राज्य असलेल्या जागेची स्वच्छता करुन त्याठिकाणी सागंली शहरातील पहिला सेल्फिपॉईंट उभारला, सांगली महापालिकेचे आयुक्त जगदीश खेबूडकर यांच्याहस्ते या सेल्फिपॉईंटचे उद्घाटन केले, तरुणाईने देखील या ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी गर्दी सुरु केली. स्वच्छतेचा हाती घेतलेला वसा न टाकता त्याने तो सुरु ठेवला,

बघता-बघता शहरातील अनेक कचऱ्याची व घाणीचे साम्राज्य असणारी ठिकाणे स्वच्छ होत गेली.

सकाळी उठल्यानंतर मोबाईल वरती फेसबुक, व्हॉट्सअप किंवा इन्स्टाग्रामला राकेशचा मॅसेच हमखास असतो. परंतु त्याचे हे मॅसेज इतरांसारखे कधीच इरेटेड वाटत नाही, तो करत असलेले काम जाणून घ्यायला देखील वेगळाच आनंद वाटतो.

आज समाजात कोणतंही कर्तृत्व नसताना केवळ मीडियामध्ये चमकोगिरी करणारे अनेक लोक आहेत, नाही म्हटलं तरी अशाच लोकांना वेगवेगळे पुरस्कार, जाहीर होत असतात, परंतु प्रत्यक्ष ग्राऊंडलेवल काम करणारी लोकं मात्र दुर्लक्षित राहतात. स्वच्छ भारत मोहिमच्या वेळी देखील अनेक चमको लोकांनी हातात झाडू घेऊन फोटोसेशन केले आणि स्वच्छ भारत मोहिमेचे झाडू तिथेच कचरा म्हणून टाकून दिले. परंतु राकेश सारखे तरुण स्वच्छतेचा ध्यास घेऊन, झोकून देऊन काम करत राहिले. आज अशा रिअल हिरो असलेल्या लोकांच्या कामांची दखल सर्वांनीच घण्याची गरज आहे.

१ मे रोजी राकेशच्या या स्वच्छता मोहिमेला १ वर्षपूर्ण होत आहे, सांगली शहर स्वच्छ करण्यासाठी राकेशने दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल त्याला मनापासून सलाम आणि त्याच्या पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा.

  • अभिजीत झांबरे. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.