शप्पथ सांगतो रश्मिकाच्या प्रत्येक फोटोखाली आमचं काळीज अशी कमेंट करावी वाटते…

आमचं मित्र मंडळ थिएटरात पुष्पा बघायला गेलेलं. आजूबाजूला सगळा क्राऊड साऊथ इंडियन. खुर्च्यांना ढेकणं आहेत का, स्क्रीन थोडी डल आहे का… असल्या प्रश्नांशी आम्हाला कणभर पण देणंघेणं नव्हतं… टार्गेट फिक्स होतं पुष्पाचा राडा बघायचा. पुष्पा भाऊंनी एंट्री मारली तेव्हा आम्हाला वाटलं आता थिएटर पागल होईल. पण भाऊ आले, १०-१२ जणं हाणली तरी काय जल्लोष नाही. जल्लोष झाला, तो श्रीवल्लीच्या एंट्रीला आणि तेही वाढीव.

तिचं ते गोंडस दिसणं, गावातल्या पोरी राहतात अगदी तसंच साधं राहणं, पुष्पावरचा लटका राग आणि सगळ्यावर कळस म्हणजे तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स. आजवर हिरोसाठी परत परत बघावे वाटले, असे लई साऊथ इंडियन पिक्चर असतील. पण श्रीवल्लीसाठी पुष्पा परत पाहिला असे लई भिडू तुम्हाला सापडतील.

आता एवढं सगळं वाचल्यावर आणि सकाळ-दुपार-संध्याकाळ-रात्र असा डोस घेतल्यासारखा श्रीवल्लीचा विचार केल्यावर एक प्रश्न फिक्समध्ये पडतो, की बाबा ही श्रीवल्ली नेमकी आहे तरी कोण आणि तिचं करिअर सुरू कसं झालं?

तर या श्रीवल्लीचं नाव रश्मिका मंदाना. तशी रश्मिकाही आपली शेजारीच, अहो खरं. तिचा जन्म झालाय कर्नाटकच्या कोडागुमध्ये. (कन्नडी लोकांशी आपला बांधाला बांध लागतो म्हणून, नाय तर फिक्स सोयरीक नेली असती.) रश्मिकानं आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात कन्नड इंडस्ट्रीमधूनच केली. २०१६ मध्ये तिचा पहिला पिक्चर आला ज्याचं नाव होतं, किरिक पार्टी. पुढच्या वर्षी तिचे दोन पिक्चर आले, अंजनीपुत्र आणि चमक… नुसता धूर. आता कन्नड इंडस्ट्रीचंही जोरदार मार्केट आहेच, पण साऊथला खरा दंगा तमिळ, तेलुगू आणि मल्याळमचा असतो. तिनं टॉलीवूडमध्ये एंट्री मारली २०१८ मध्ये, पिक्चरचं नाव होतं… ‘चलो.’

पण हे पिक्चर काय सगळ्या भारतात हिट झाले नाहीत. तिला प्रत्येक मोबाईलमध्ये पोहोचवलं ते गीता गोविंदमनं. विजय देवराकोंडासोबत तिनं या पिक्चरमध्ये लईच भारी काम केलं. त्यात गाण्यांमुळंही पिक्चरची हवा झाली. तिची चालण्याची स्टाईल, वेगवेगळी एक्स्प्रेशन्स… डायरेक्ट काळजात रुतली.

याच विजय देवराकोंडासोबत तिनं डिअर कॉम्रेडमध्येही काम केलं. त्यात तिचं नाव होतं लिली. एकदम फुलांनी गुदगुल्या केल्यासारखंच वाटलं. यात पण ती छान दिसली, लोकांना आवडली… पण जेव्हा क्रिकेटच्या मैदानात लिली बॅट घेऊन उतरते आणि कडक छकडा हाणते, तेव्हा आईशप्पथ स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतं. या दोन पिक्चरनं रश्मिकाला ‘नॅशनल क्रश’ बनवलं.

त्यानंतरही तिनं काही पिक्चरमध्ये काम केलं, त्यातले काही पडले, तर काही चालले. पण सगळ्यात जास्त हवा कशाची झाली तर पुष्पाचीच. त्यातही रश्मिका जेव्हा सामी, सामीवर नाचते तेव्हा, पाणावलेल्या डोळ्यांना काजळ लावते तेव्हा… आपण अल्लू अर्जुन का नाही याचं लई दुःख होतं.

आता टॉलिवूड आणि कॉलिवूड गाजवून झाल्यानंतर, रश्मिका लवकरच बॉलिवूडमध्ये दंगा करणार आहे. शेरशाहवाल्या सिद्धार्थसोबत तिचा मिशन मजनू नावाचा पिक्चर येतोय. वर श्रीवल्ली तेवढ्यावर थांबत नसत्या, गुडबाय नावाच्या पिक्चरमध्ये ती डायरेक्ट सिनिअर बच्चन सोबत स्क्रीन शेअर करणारे. आपण सिद्धार्थ पण नाय आणि बच्चन पण नाय…

थोडक्यात कसंय, आपल्या प्रेयसीनं थोडंसं अल्लड आणि डेरिंगबाज असावं, तिला पटवण्यासाठी आपल्याला कष्ट घ्यायला लागावे, तिच्या फादरची मदत करुन आपण तिच्या हृदयात घर करावं, तिच्या आईनं प्रेमानं आपला डबा भरुन द्यावा आणि सरतेशेवटी आपलं आणि तिचं लग्न व्हावं.. असं प्रत्येक पोराला वाटतं. श्रीवल्ली एकदम परफेक्ट हे सगळं करती, तेही कधी हसत, कधी रुसत आणि आपलं काळीज बाद होतंय.. तिनं आपल्याकडे बघावं म्हणून झुरणाऱ्या पुष्पा सारखंच.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.