अमर्त्य सेन यांचा जन्म झाल्यावर खुद्द रवींद्रनाथ टागोर यांनी त्याचं नामकरण केलं होत, “अमर्त्य “

अमर्त्य सेन. अर्थशास्त्राचा नोबेल जिंकणारे एकमेव भारतीय. त्यांच्या यशामागे त्यांनी केलेले कष्ट, अभ्यास आणि संशोधन हे सगळ तर आहेच पण आणखी एक गोष्ट आहे जिला ते नेहमी आपल्या नोबेलचे श्रेय देतात.

भारताचे पहिले नोबेलवीर गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी सुरु केलेलं शांतीनिकेतन.

शांतीनिकेतन हे रवींद्रनाथ टागोर यांनी पाहिलेलं स्वप्न होत. भारताच्या पुढच्या पिढीला कोणत्याही भयाशिवाय कोणत्याही बंधनाशिवाय खुली ज्ञानप्राप्ती व्हावी, अस्सल भारतीय कलापासून ते पाश्चात्य शिक्षणापर्यंत काहीही त्याच्यापासून सुटून जाऊ जाऊ नये यासाठी शांतीनिकेतनची निर्मिती केली होती.

अमर्त्य सेन यांचे आजोबा आचार्य क्षिती मोहन सेन हे रवींद्रनाथ टागोर यांचे जवळचे सहकारी होते. ते शांतीनिकेतन मध्ये शिकवायचे. अमर्त्य सेन यांच्यासाठी  शांतीनिकेतन हे दुसरे आजोळच होते. यामुळे तिथले संस्कार अमर्त्य सेन यांच्यावर बालपणापासून पडले. त्यांच प्राथमिक शिक्षण तिथच झालं. कोणत्याही परीक्षेच्या दडपणाशिवाय घेतलेल्या या ज्ञानाची शिदोरी त्यांना आयुष्यभर पुरली. सांस्कृतिक विविधतेची ओळख झाली. स्वतःचे मुक्त विचार घडण्यास तिथ वाव होता.

त्यांचे आजोबा क्षिती मोहन सेन हे हिंदू धर्म आणि साहित्याचे गाढे अभ्यासक होते. वयाच्या एका टप्प्यावर अमर्त्य सेन यांना नास्तिकवाद जवळचा वाटू लागला. त्यावेळी त्यांच्या आजोबांनी त्यांना नास्तिकवाद हा सुद्धा कसा अस्सल भारतीय विचार असल्याचं दाखवून दिल. आपण वेगळे विचार करतो हे काही चुकीचं नाही याची जाणीव त्यांना आजोबाकडून मिळाली.

याच उदारमतवादी संस्काराचा परिणाम म्हणून की काय अमर्त्य सेन यांचा ओढा कल्याणकारी अर्थशास्त्र, साधनसंपत्तीच्या वाटपाचा सामाजिक न्याय अशा समाजाच्या उतरंडीत शेवटच्या व्यक्तीच्या उपयोगी पडणाऱ्या अभ्यासाकडे राहिला. याच क्षेत्रात त्यांनी केलेल्या अभ्यासावर त्यांना जगातले सर्वात महत्वाचे नोबेल मिळाले.

केंब्रीजच्या ट्रिनीटी कॉलेज मध्ये अर्थशास्त्राची डिग्री मिळाल्यावर त्यांना जगात कुठेही मोठ्या पगाराची नोकरी मिळाली असती पण रवींद्रनाथ टागोरांच्या संस्कारामुळे शिक्षणक्षेत्र हीच आपली कर्मभूमी त्यांनी मानली आणि आयुष्यभर ते व्रत जपलं.

त्यांचे केम्ब्रिजमधले सहाध्यायी मनमोहनसिंग यांनी अर्थशास्त्राचे प्रशासकीय क्षेत्र निवडले आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, अर्थमंत्री अशा एक एक पायऱ्या चढत अखेर ते भारताचे प्रधानमंत्री बनले. दोघांनीही आपापल्या क्षेत्रात सर्वोच्च सन्मान मिळवला.

समकालीन असलेल्या जगदीश भगवती आणि अमर्त्य सेन यांच्या दोन अर्थशास्त्रीय विचारधारा मध्ये भारत विभागला गेला. भांडवलवादाचे स्तोम कितपत भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये माजू द्यायचे यावर या दोघांची विरोधी मते सुप्रसिद्ध आहेत. दोन्ही पंथाचे लोक आजही त्यांच्या मुद्द्यांना घेऊन आपला झेंडा झळकत ठेवण्याचा प्रयत्न करत असतात.

काही वर्षापूर्वी मोदी सरकारने जाहीर केलेल्या नोटबंदीच्या वेळेस सुद्धा हे दोन विचारवंत आपल्या विरोधी मतांमुळे आमोरे सामोरे ठाकले होते.

कितीही विरोध झाला तरी अमर्त्य सेन यांनी आपले मुद्दे कधी सोडले नाहीत. त्यांनी लिहिलेल्या  “अॅन अर्ग्यूमेंटेटिव्ह इंडियन” , “आयडिया ऑफ जस्टीस“, “डेव्हलपमेंट ऑफ फ्रिडम”  अशा पुस्तकामधून त्यांनी आपले विचार मांडले आणि ते जगभर प्रसिद्ध देखील झाले.

अमर्त्य सेन यांचा जन्म झाल्यावर खुद्द रवींद्रनाथ टागोर यांनी त्याचं नामकरण केलं होत, ” अमर्त्य ” . कधीही न मरणारा म्हणजे अमर्त्य. खरच अमर्त्य सेन यांच नाव भारतीय अर्थशास्त्रात तरी अमर्त्यच राहील.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.