स्वामी विवेकानंद यांच्या एका भाषणाने मार्गारेट नोबेलच भविष्य बदलून गेलेलं.

मार्गारेट एलिझाबेथ नोबेल यांची आज जयंती. आत्ता मार्गारेट नोबेल म्हणल्यानंतर नेमक्या कोण हे अनेकांना समजणार नाही पण भगिनी निवेदिता म्हणल्यानंतर अनेकांच्या डोळ्यासमोर शाळेतल्या पाठ्यपुस्तकात वाचलेला इतिहास डोळ्यासमोर येईल.

कोण होत्या भगिनी निवेदिता..?

भगिनी निवेदिता या जन्माने आयरिश. २८ ऑक्टोबर १८६७ साली एका सधन कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता, परंतु वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी डोक्यावरील पित्याचं छत्र हरवलं आणि घरची आर्थिक परिस्थिती देखील खालावली. त्यामुळे आपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी शिक्षिका म्हणून काम सुरु केलं.

१८९३ सालच्या स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो येथील जगप्रसिद्ध भाषणाने जगाला या महान भारतीय योग्याची ओळख करून दिली. याच शृंखलेत स्वामी विवेकानंदांनी अनेक भाषणे दिली आणि त्याचवेळी लेडी इसाबेल यांच्या घरी स्वामीजींनी दिलेल्या एका भाषणाने मार्गारेट नोबल यांच्या भविष्यकाळाचा पटच बदलून टाकला. या भाषणाने त्या इतक्या प्रभावित झाल्या की त्यांनी विवेकानंदांचं शिष्यत्व पत्करलं.

विवेकानंदांनी मार्गारेट यांच्यासाठी ‘निवेदिता’ हेच नाव का निवडलं…?

विवेकानंदांच्या उपदेशानंतर मार्गारेट यांनी भारतात येऊन काम करण्याचा निर्णय घेतला. जानेवारी १८९८ साली मार्गारेट भारतात आल्या आणि २५ मार्च १८९८ साली स्वामी विवेकानंद यांनी त्यांना दीक्षा देऊन ‘निवेदिता’ हे नाव दिलं. ‘निवेदिता’ या शब्दाचा अर्थ होतो ‘समर्पित’.

बनारस हिंदू विद्यापीठातील बांगला भाषा विभागाचे माजी विभागप्रमुख अमरनाथ गांगुली यांनी यांनी ‘निवेदिता’ नावासंदर्भात सांगितलं होतं की,

“या नावाचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे अशी महिला जिने आपल्या गुरुच्या चरणी आपलं आयुष्य  समर्पित केलं  किंवा दुसरा अर्थ असा की अशी महिला जिने महिलांच्या शिक्षणांसाठी आपलं जीवन समर्पित केलं. भगिनी निवेदिता यांच्या संदर्भात दुसरा अर्थ अधिक योग्य वाटतो”

मार्गारेट भारतात आल्यानंतर विवेकानंदांनी त्यांना ‘निवेदिता’ हे नाव दिलं पण पुढे आपलं संपूर्ण आयुष्य त्या हे नाव शब्दशः जागल्या. आपलं आयुष्य त्यांनी खऱ्या अर्थाने महिलांसाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी खर्ची घातलं. भारतीय महिलांच्या आयुष्यात फक्त शिक्षणानेच अमुलाग्र बदल होऊ शकतो, असं त्यांचं मत होतं आणि म्हणूनच त्या आयुष्यभर त्यासाठी झटत राहिल्या.

त्यांनी महिलांसाठीची शाळा सुरु करून त्यांच्या शिक्षणावर भर देतानाच महिलांना शिवणकाम, चित्रकला यांसारख्या गोष्टीचे प्रशिक्षण दिले. जेणेकरून महिला स्वावलंबी होऊ शकतील.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात देखील त्यांनी आपलं योगदान दिलं. त्या स्वतःला भारतमातेची पुत्रीच मानत असत. आपलं संपूर्ण जीवन भारतासाठी समर्पित करणाऱ्या भगिनी निवेदिता यांचा १३ ऑक्टोबर १९११ रोजी वयाच्या अवघ्या ४४ व्या वर्षी दार्जीलिंग येथे निधन झालं.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.