सुभाषचंद्र बोस यांच लग्न सिक्रेट का ठेवण्यात आलं होतं ?

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आयुष्याबद्दल अनेक गुपितं आहेत. त्यांचा मृत्यू जसा एक रहस्य आहे तसंच त्यांचं लग्न हे देखील एक गुपित होतं. आपल्यापैकी खूप कमी लोकांना नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रेमकहाणी विषयी आणि त्यांनी बराच काळ गुपित म्हणून जपलेल्या त्यांच्या लग्नाविषयी माहीत असेल, कारण खुद्द नेताजींनी अनेक वर्षे ही गोष्ट गुपित ठेवली होती.

साधारणतः १९३४ चा काळ असावा. नेताजी ऑस्ट्रियामध्ये वास्तव्यास होते. याचवेळी त्यांचे मित्र डॉ. माथूर यांनी नेताजींनी भेट एमिली शांकल यांच्याशी करून दिली. नेताजी त्यावेळी ‘द इंडियन स्ट्रगल’ नावाच्या  पुस्तकाच्या लिखानात व्यस्त होते आणि त्यासाठी त्यांना टाईपरायटर म्हणून काम करणारी व्यक्ती मदतीसाठी हवी होती.

एमिली यांचं इंग्लिश खूप चांगलं होतं आणि त्यांचा शॉर्टहँडचा कोर्स देखील झालेला होता. त्यामुळे नेताजींनी लगेच टाईपरायटर म्हणून काम करण्यासाठी एमिली यांना नियुक्त केलं. कामाच्या दरम्यान त्यांची छान मैत्री झाली आणि याच मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघांमध्ये प्रेमाचे ऋणानुबंध निर्माण झाल्यानंतर १९४२ साली नेताजींनी एमिली यांच्याशी लग्न केलं.

नेताजींचं हे लग्न बराच काळ गुपित ठेवण्यात आलं होतं.

त्यांच्या कुटुंबियांना देखील त्यांच्या लग्नाविषयी कसलीही कल्पना नव्हती. ज्यावेळी एमिली आणि नेताजींची मुलगी अनिता हिचा जन्म झाला, त्यावेळी नेताजींच्या कुटुंबियांना या लग्नाविषयी समजलं.

Screen Shot 2018 07 05 at 7.16.15 PM

नेताजींच्या पत्नी एमिली यांनी नेताजींचे बंधू सरतचंद्र बोस यांना पत्र लिहून लग्नाविषयीची माहिती दिली. सरतचंद्र बोस यांना लिहिलेल्या पत्रात एमिली यांनी आपल्या आणि सुभाषचंद्र बोस यांच्या संबंधांविषयी विस्तृतपणे लिहिलेलं आहे.

आपल्या मुलीचं नाव अनिता ब्रिगीटे असल्याची माहिती देखील त्यांनी या पत्रात दिलीये. आपल्याला मुलीचं नाव अनिता नाही तर अमिता ठेवायचं होतं, परंतु जर्मन अधिकाऱ्यांनी या नावावर आक्षेप घेतल्यानंतर त्या नावशीच साधर्म्य असलेलं अनिता हे नाव आपण ठेवलं.  नावाच्या पुढे असलेल्या ब्रिगीटे या जर्मन शब्दाचा अर्थ गीता असा होतो, असं देखील एमिली यांनी पत्रात लिहिलंय.

माधुरी बोस लिखित ‘द बोस ब्रदर्स अँड इंडियन इंडिपेंडन्स’ या पुस्तकात या पत्राचा समावेश करण्यात आलेला आहे.

नेताजींनी लग्नाची गोष्ट लपवून का ठेवली..?

लग्नाची गोष्ट गुपित का ठेवण्यात आली होती याविषयी देखील याच पत्रात खुलासा करण्यात आलेला आहे. एमिली लिहितात की, ” पुरेशा परिचयानंतर ज्यावेळी सुभाषबाबूंनी मला लग्नासाठी विचारलं तेव्हा मी होकार दिला. एकच अडचण होती ती म्हणजे जर्मन कायद्यांची. सुभाषबाबूंशी लग्न करण्यासाठी जर्मन सरकारची परवानगी आवश्यक असणार होती आणि सरकार ती सहजासहजी देण्याची शक्यता नव्हती. त्यामुळेच या अडचणींना सामोरे जायला लागू नये म्हणून आम्ही हे लग्न उघड न करण्याचा निर्णय घेतला”

नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य क्रांतिकारक होते. शत्रूकडून त्यांच्या जीवाला नेहमीच धोका असे. शिवाय त्यांची पत्नी एमिली या ज्या ऑस्ट्रिया देशाच्या नागरिक होत्या, तो देश त्यावेळी जर्मन साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता. त्यामुळेच आपली पत्नी आणि मुलगी यांच्या जीविताच्या संरक्षणार्थ नेताजींनी आपल्या लग्नाची बातमी गुपित ठेवली असावी, असा  देखील तज्ज्ञांचा दावा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.