स्वदेशी खेळाचा आग्रह धरणाऱ्या कट्टर पुण्यात क्रिकेट कसं शिरलं त्याचीच ही गोष्ट !

पुणे तिथे काय उणे ! असं म्हणण्याची एक परंपराच आहे. म्हणजे काय नाही आमच्या पुण्यात असं पुणेरी लोक दाबून विचारतात. आता त्यांचं ही बरोबर आहेच म्हणा. इथं कुठलीच कमतरता नाही. पण खेळात असलेली पुण्याची कर्तबगारी मात्र पन्नास साठ वर्षांपूर्वी झाकोळली गेली.

मात्र पुण्यभूमी असलेल्या या पुण्यान एकेकाळी क्रिकेटचं मैदान गाजवलं होत. पुण्यात क्रिकेट कसं आलं त्याचीच ही गोष्ट !

१८९८ च्या आधी ब्रिटिशांची सत्ता पुण्यात सुरू होण्यापूर्वी पुण्यात बरेच खेळ खेळले जायचे. यात पुण्यातल्या कुस्त्या विशेष लोकप्रिय होत्या. पुण्यातल्या गुलशे तालीम तर पेशव्यांच्या कालखंडातली. ब्रिटिश राज्य सुरू झालं त्या सुमारास पुण्यात पन्नासावर तालमी होत्या. त्या अनुषंगाने जोर-बैठकांसारखे व्यायामाचे प्रकार, तर लाठी काठी, बोबाटी, फरीगदगा वगैरे अनेक खेळ होते. हुतूतू अल्पांशाने तरी होता. धावण्याच्या शर्यती होत्या पण अॅथलेटिक्स नव्हतं. मोठ्या वडांच्या झाडांवर सूरपारंब्या खेळल्या जात होत्या.

पण जसे पुण्यात इंग्रज आले तसं पुण्यात क्रिकेटही अवतरलं !

नव्या सत्ताधाऱ्यांनी पुण्यात शाळा उभारण्यास सुरुवात केली. मुंबई इलाख्याचं शिक्षण खातं पुण्यातच ठेवलं गेलं. शिक्षणाच्या प्रसारासाठी शाळा सुरू करण्यात पेशव्यांना उसत मिळाली नव्हती, पण ब्रिटिश सत्तेने ते काम प्राधान्याने केलं. यामुळे सरकारी प्रशासन व्यवस्थेचे बहुसंख्य माजी अधिकारी पुण्यातच स्थायिक झाले. त्यातूनच पुणे शैक्षणिकदृष्ट्या झपाट्याने विकसित होत गेलं होतं. स्वाभाविकपणे बौद्धिकदृष्ट्या पुण्याची पातळी खूप वरची होती. अशातच क्रीडा विषय शिक्षणाचा एक अंग बनला. 

पण त्या वेळी खेळांमध्ये कोणत्याही प्रकारची शिस्त मिळ नव्हती.  दरम्यान, सरकारी शिक्षणखात्याने क्रीडाविषयक एक योजना आखली. त्यानुसार या खात्याकडून १८६० साली सर्व शिक्षणसंस्थांना एक परिपत्रक पाठवलं गेलं.

यात सर्व शिक्षणसंस्थांनी ‘क्रीडाशिक्षकांची’ नियुक्ती करावी आणि किमान काही खेळाचे ठराविक तासास उपस्थिती लावली नसल्यास त्याला वार्षिक परीक्षेला बसू देऊ नये अशा सूचना त्यात होत्या.

त्याच कालखंडात देशात स्वातंत्र्य चळवळ जोरात होती. त्याचाच एक भाग म्हणून स्वदेशी खेळाची कल्पना पुढे आली. ती पुण्यातल्या बहुसंख्य शाळामास्तरांनी उचलून धरली खरी, पण त्याला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद फारसा मिळाला नाही. त्यामानाने क्रिकेटला जास्त प्रतिसाद मिळत होता. त्या खेळातली शिस्त मध्यमवर्गीय पालकांना खूपच आवडली. परिणामी क्रिकेट वेगाने वाढत राहिलं. 

पुण्यात हा खेळ मुख्यत्वे कॅम्पातील पुन्हा क्लबच्या मैदानावर व्हायचा. शहरातले श्रीमंत लोक टांग्यातून मैदानात जायचे. विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे,

ब्रिटिश राज्याचे कडवे विरोधक आणि स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या लोकमान्य टिळकांचा केसरीने १९ ऑगस्ट १८९०  रोजीच्या अग्रलेखात क्रिकेटवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला.

तो लेख म्हणजे केवळ देशी खेळांना इशारा नव्हता. तर चांगल्याला चांगलंच म्हणण्याचा खिलाडूपणा त्यात ओतप्रोत भरलेला होता.  केसरीच्या अग्रलेखाने क्रिकेट आणखीनच प्रसिद्ध झालं आणि बघताबघता शहरातल्या सर्व शाळा महाविद्यालय क्रिकेटमय झाली. तोवर पुण्यात विद्यार्थी वर्ग भरलेले, आता त्यात क्रिकेटची भर पडल्याने पुण्यात चैतन्यमय वातावरण निर्माण झालं. याच काळात पुण्यात पूना क्लब, रॉयल कनॉट बोट क्लब, हिराबाग, डेक्कन जिमखाना आशा मोठाल्या क्रीडा संस्था उभ्या राहिल्या. 

थोडक्यात पुण्याच्या क्रीडासंस्कृतीची मुहूर्तमेढ क्रिकेट या खेळामुळेच रोवली गेली हे तर निश्चितच सांगता येईल.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.