महाराष्ट्रातला हा राजा आपली हजारों एकर जमीन दान करुन सर्वसामान्यांसारखं जगला..

एखाद्या संस्थानाचा राजा म्हटलं कि राजमहल, आलिशान गाड्या आणि सुखसुविधांमध्ये विलासी जीवन जगणारी व्यक्ती डोळ्यासमोर उभी राहते. राजे-महाराजे किंवा श्रीमंत जमीनदारांना अशाच पद्धतीने जगतांना आपण प्रत्यक्षात किंवा सिनेमात पाहिले असल्यामुळे आपल्या डोळ्यासमोर अशी प्रतिमा तयार होते.

परंतु महाराष्ट्राच्या इतिहासात असेच एक राजे होऊन गेलेत. ज्यांनी आयुष्यभर निर्व्यसनी आणि साधं  जीवन जगून आपल्या व्यक्तिमत्वाची अमिट छाप सोडली आहे.

ते व्यक्ती म्हणजेच अहेरी इस्टेटीचे राजे विश्वेश्वरराव महाराज..

अर्ध्यावर हात मुडलेला लांब हाताचा सदरा, दीड टांगेच्या वर नेसलेला धोतर आणि डोक्यावर काळी टोपी घालून शेवटच्या श्वासापर्यंत साधेपणाने जगणारे राजे विश्वेश्वरराव दुर्लक्षितच राहिले. 

अहेरी इस्टेटचे चौथे राजे, राजे विश्वेश्वरराव आत्राम..

भारत स्वतंत्र होण्यापूर्वी भारतात अनेक राजघराण्यांचे राज्य होते. त्या राजघराण्यांपैकी अहेरीचे आत्राम राजघराणे हे एक होते. ५४८ गावांवर पसरलेले वतन, १८ गावची थेट मालगुजारी, हजारो एकर शेती, प्रशस्त राजभवन, गावोगावी डाकबंगले आणि दीडशे वर्षांची राजेशाही परंपरा असलेले हे घराणे आहे. 

१९५० मध्ये भारत सरकारकडून मिळणारा तनखा आणि राज्याचा महसूल मिळून सात लाखाची खजिनदारी असलेल्या असलेल्या अहेरी इस्टेटीचे चौथे राजे म्हणजेच राजे विश्वेश्वरराव आत्राम.

१९५१ मध्ये संस्थाने खालसा झाल्याच्या धक्क्याने राजे धर्मराव आत्राम यांचं निधन झालं. त्यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र विश्वेश्वरराव आत्राम हे अहेरी संस्थानाचे नामधारी राजे झाले. मात्र अतिशय श्रीमंतीत वाढलेल्या विश्वेश्वररावांनी सत्तेला लाथ मारून चळवळ आणि शिक्षणाच्या प्रसारात आपली हयात खर्च केलं केली.   

अन विश्वेश्वररावांनी थेट खोटा थाटमाट सोडून साधेसुधे जीवन जगणे स्वीकारले..

 १९५१ मध्ये संस्थान खालसा झाले आणि १९७१ मध्ये राज्यांना मिळणारा प्रिव्ही पर्स सुद्धा समाप्त करण्यात आला. जमीन जुमला आणि संपत्तीतील बराचसा भाग सरकारच्या हातात गेला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पैशांची निकड निर्माण झाली. 

या निकडीच्या काळात विश्वेश्वररावांनी कोणताही बडेजाव न मिरवता आपली आलिशान कार सोडून जीप आणि बसमधून प्रवास करण्यास सुरुवात केली. अहेरीच्या जवळच्या गावी जायचे असल्यास मैलों मैल पायी सुद्धा प्रवास करायचे.  

अन विश्वेश्वररावांनी हजारो एकर जमीन आणि संपत्ती आदिवासींना दान केली..  

१९५१ मध्ये संस्थान खालसा झालं आणि कुळ कायदा आला. याच्या धक्क्याने राजे धर्मराव आत्राम यांचे निधन झाले. मात्र विश्वेश्वररावांनी जमिनींवर कोणतीही मालकी न दाखवत हजारो एकर जमिनी आदिवासींना दान केल्या. तसेच संस्थानाचे प्रत्येक डाकबंगले सुद्धा सरकारच्या स्वाधीन केले. 

जमिनी दान करतांना शेतकऱ्यांसमोर कोणताही तगादा लावला नाही. तसेच त्या जमिनी परत मिळवण्याचे प्रयत्न सुद्धा केले नाही. तर काळानुरूप आपल्या जगण्यात बदल करून सामान्य माणसाचे व्रतस्थ जीवन स्वीकारले. 

पैशांची निकड असतांना सुद्धा आदिवासींच्या शिक्षणासाठी शिक्षण संस्था उभारल्या..

आदिवासी समाज हा पिढ्यानं पिढ्या मागासलेला आणि वंचित समाज आहे. खुद्द राजे विश्वेश्वरराव आत्राम सुद्धा गोंड आदिवासीच असल्यामुळे अत्यंत निकडीच्या काळात सुद्धा १९५७ मध्ये धर्मराव शिक्षण संस्थेची स्थापना केली. आणि मागास असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात शिक्षणाच्या प्रसाराला सुरुवात केली. 

विश्वेश्वररावांनी संस्थानाचे पैसे शिक्षणाच्या प्रसारासाठी खर्च केले. आदिवासींनी व्यसनांचा त्याग करून शिक्षण घेऊन प्रगती  करावी यासाठी ते निव्वळ बोलूनच थांबले नाही तर कृतीही केली.

तत्वावर विश्वास ठेवणारे विश्वेश्वरराव आयुष्यभर निर्व्यसनी राहिले..

१९६२ मध्ये विश्वेश्वररावांचे वडील राजे धर्मराव आत्राम यांच्या पुतळ्याचा अनावरण समारंभ होता. कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाने राजे धर्मराव आत्रामांच्या दानवीरतेबद्दल भाषण केले. 

मात्र जेव्हा विश्वेश्वरराव भाषण करण्यासाठी उभे झाले आणि हजारो आदिवासींच्या जनसमुदायाला संबोधित करत ते म्हणाले कि, “माझ्या वडिलांचे सगळे गुण स्वीकारा मात्र त्यांच्या व्यसनाधीनतेच्या  गुणांपासून दूर रहा.” विश्वेश्वररावांचे हे वाक्य निव्वळ टाळ्या घेण्यापुरते नव्हते तर ते त्यांच्या जीवनातून उमगलेले ज्ञान होते. 

विश्वेश्वररावांचे वडील आणि भाऊ दोघेही व्यसनाधीन होते. मैफिल, सिगार, दारू यासह त्या काळातील राज्यांना असलेले सगळे राजसी व्यसन दोघांनी केले होते. मात्र विश्वेश्वरराव याला अपवाद होते. 

विश्वेश्वररावांच्या हातात केवळ एक चांदीची डबी असायची. या डबीत सुपारीच्या काही खांडा ठेवलेल्या असायच्या. या सुपारीच्या खांडा सोडून विश्वेश्वररावांनी कोणतेच व्यसन केले नाही.

परंतु विश्वेश्वरराव एवढ्यापुरतेच मर्यादित नव्हते..

राजे विश्वेश्वरराव सिरोंचातून आमदार आणि गडचिरोली लोकसभेतून तीन वेळ खासदार म्हणून लोकसभेला निवडून गेले होते. १९६२, १९६७ च्या निवडणुकीत त्यांनी प्रचंड बहुमताने विजय मिळवला होता

परंतु १९७१ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अब्दुल शफी यांनी विश्वेश्वररावांना पराभूत केलं होतं.तर १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत विश्वेश्वरराव पुन्हा विजयी झाले. मात्र १९८० मध्ये काँग्रेसच्या शांताराम पोटदुखे यांनी त्यांचा पराभव केला होता. 

राजे विश्वेश्वरराव हे विजयात हुरळून जाणारे नव्हते किंवा पराभवात खचून जाणारे नव्हते. निवडणुकीत विजयी झाल्यांनतर पराभूत उमेदवाराचं सांत्वन करायचे तर पराभूत झाल्यांनतर विजयी उमेदवाराचं खिलाडी वृत्तीने अभिनंदन सुद्धा करायचे. 

विजयालक्ष्मी पंडित यांच्यासह चार मुख्यमंत्र्यांनी विश्वेश्वररावांना राष्ट्रीय प्रवाहात येण्याची विनंती केली होती..

विश्वेश्वरराव हे कायम वेगळ्या विदर्भ आंदोलनासाठी लढत राहिले. या मागणीला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षाबरोबर ते कायम दोन हात करत राहिले. यासाठी त्यांनी आदिवासी सेवा मंडळ आणि नाग विदर्भ आंदोलन समितीची स्थापना केली होती. 

यशवंतराव चव्हाण, मारोतराव कन्नमवार, वसंतराव नाईक यांच्यासह शंकरराव चव्हाण यांनी वेळोवेळी विश्वेश्वररावांना काँग्रेसमध्ये येण्याची विनंती केली होती. 

महाराष्ट्राच्या राज्यपाल विजयालक्ष्मी पंडित यांनी सुद्धा विश्वेश्वररावांना काँग्रेसमध्ये बोलावण्यासाठी प्रयत्न केले होते. तर ही मागणी घेऊन स्वतः मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण १९८६ मध्ये विश्वेश्वररावांच्या शष्ठाब्दी पूर्तीनिमित्त अहेरीला गेले होते. मात्र विश्वेश्वररावांनी ही ऑफर कायम नाकारली होती. 

आजच्या काळात सत्तेसाठी पक्षाला केव्हाही रामराम ठोकणाऱ्या खासदारासारखे विचार न करता विश्वेश्वररावांनी कायम आपल्या विचारांना महत्व दिले होते. 

पत्नीचे कर्करोगाने निधन झाल्यांनतर कोलमडून गेलेल्या विश्वेश्वररावांनी अवघ्या तीन महिन्यानंतरच जगाचा निरोप घेतला. जन्माने राजगादी मिळलेले राजे विश्वेश्वरराव आपल्या राजेपदाची झूल खांद्यावरून उतरवून सामान्य माणसाप्रमाणे आयुष्य जगले. आणि आयुश्यभर सामान्य आदिवासींच्या हक्कासाठी लढत राहिले. 

हे ही वाच भिडू  

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.