उत्तमराव की निहाल अहमद दोघांच्या भांडणात दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले..!!!

वसंतदादा पाटलांच्या मुख्यमंत्री होण्याच्या आणि मुख्यमंत्रीपदावरून जाण्याचा इतिहास पाहिला तर हा फक्त इतिहासापूरता विषय रहात नाही. अनेक राजकीय कुरघोड्या, डावपेच टाकलेले दिसून येतात.

यातलाच एक किस्सा १९७८ सालचा.

१९७८ साली वसंतदादा मुख्यमंत्री झाले. काहीकाळ त्यांनी सत्ता उपभोगली आणि त्यानंतर पुलोदचा कार्यक्रम झाला आणि वसंतदादा मुख्यमंत्रीपदावरून गेले. पुलोदचा कार्यक्रम आणि दादांच मुख्यमंत्रीपदावरून जाणं याची चर्चा अनेकदा होत असते.

राजकीय पटलावर जेव्हा जेव्हा शरद पवारांचे नाव निघते तेव्हा तेव्हा हा किस्सा अगदी रंगवून सांगितला जातो. पण त्यापूर्वी वसंतदादा मुख्यमंत्रीपदावर कसे आले. त्यावेळी नेमकं काय काय झालं हे देखील तितकच भारी आहे.. 

तर झालेलं अस की आणिबाणीनंतर देशभरात लोकसभेच्या निवडणूका झाल्या होत्या. आणिबाणीनंतर झालेल्या या निवडणूकांनंतर देशभरात जनता पक्षाचं वादळ आलं होतं. या वादळात खुद्द इंदिरा गांधींना पराभव पहायला लागला. संजय गांधी यांचा देखील पराभव झाला. 

त्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणूका होत्या पण तत्पूर्वीच कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडली.

कॉंग्रेसचे तुकडे झाले. महाराष्ट्र कॉंग्रेस देखील या दोन तुकड्यात विभागली गेली. यातीलच एका तुकड्यात यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार असे नेते होते तर दूसऱ्या तुकड्यात रामराव आदिक, नासिकराव तिरपुडे असे नेते होते. रामराव आदिक, नासिकराव तिरपुडे यांनी इंदिरा कॉंग्रेसचा रस्ता पकडला होता.

आत्ता या दोन्ही कॉंग्रेसी गटांना आव्हान ठरणार होता तो तेव्हा वादळ ठरलेला जनता पक्ष.

महाराष्ट्राचे पूर्वाश्रमीचे सर्व कॉंग्रेस विरोधक या गटात होते. शिवाय देशभरात जनता पक्षाचं वादळ होतं. अशा पार्श्वभूमीवर झालेल्या या निवडणूका म्हणजे फक्त निम्मितमात्र ठरणार होत्या. महाराष्ट्रात आत्ता जनता पक्षाची राजवट येणार हे जवळपास फिक्स होतं.. 

पण झालं अस की निकाल लागल्यानंतर चित्र पालटल. जनता पक्षाचं हे वादळ ९९ जागांवर आटोपलं. यशवंतराव चव्हाणांच्या गटाला ६९ तर इंदिरा गांधीच्या कॉंग्रेसला ६२ जागा मिळाल्या. तरिही बहुमत जनता पक्षाचच होतं. इतर उरलेसुरले लोक घेवून सत्ता स्थापन करता येईल व जनता पक्षाचा पहिला मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या खुर्चीवर बसेल अस चित्र निर्माण झालं… 

पण इथेच माशी शिंकली.. 

कारण जनता पक्ष मुळात बनलेलाच विविध विचारांच्या, विविध गटांच्या ताकदीवर. पुर्वीश्रमीच्या जनसंघवाल्यांनी उत्तमराव पाटील यांना आपल्या पक्षाच्या नेतेपदावर निवडून आणावं असा आग्रह धरला तर समाजवाद्यांनी निहाल अहमद यांचे नाव पुढे केले. शेकापचे १२ सदस्य आणि डाव्यांचे १३ सदस्य मिळून काठावरचं का होईना बहुमत सिद्ध करता येणं शक्य होतं. त्यामुळेच या दोन्ही गटांना समोर मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दिसू लागली.. 

या दोन्ही नेत्यांच्या चर्चेने महाराष्ट्राचं राजकारण गोंधळलेलं होतं. पण उत्तर महाराष्ट्रात मात्र अभूतपुर्व उत्साह होता. कारण उत्तर महाराष्ट्राला पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद मिळण्याची संधी आली होती. 

पण राजकारणात एक गोष्ट करावी लागले, ती म्हणजे पटकन डाव साधायला लागतो. जनता पक्षात नेतानिवडीवरून मतभेद चालू असल्याने नेमक्या नावावर शिक्कामोर्तब होवू शकलं नाही. नेमकी याचीच संधी फुटलेल्या कॉंग्रेसने घेतली.. 

बिगर कॉंग्रेसी सरकार अस्तित्वात येण्यापेक्षा आणि तडजोड करु हा मध्यममार्ग स्वीकारण्यात आला. यशवंतराव चव्हाणांच्या गटाने व इंदिरा कॉंग्रेसच्या गटाने तडजोड केली आणि थेट राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला. 

राज्यपालांनी देखील कॉंग्रेसच्या दोन्ही गटांचा सत्तास्थापनेचा दावा मंजूर केला आणि राज्यात कॉंग्रेसचं सरकार सत्तेत आलं. दोघांच्या भांडणात वसंतदादा राज्याचे मुख्यमंत्री झाले तर नासिकराव तिरपुडे महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री झाले. 

पण हे सरकार अंतर्गत कलहांनी पुरत बेजार झालं. हाच डाव शरद पवारांनी साधला. पवारांनी पुलोदचा कार्यक्रम करत जनता पक्षाला घेवून सरकार स्थापन केलं. इथे एसएम जोशींकडे मंत्रीपदाची संधी चालून आली.

पण शरद पवारांनी युक्ती केली आणि एसएम जोशींच मुख्यमंत्रीपद स्वत:कडे खेचून घेतलं ते तुम्ही इथे क्लिक करुन वाचू शकता…

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.