राज्यात राजकीय भूकंप आलेला असतांना काँग्रेसचे नेते काय करतायत….

राज्यात घडत असलेलं राजकारण रोज नवीन वळणं घेत आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या सत्तासंघर्षा समोरचा पेच काय सुटत नाहीये.  महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळू शकतं.  या सगळ्या राजकीय उलथापालथी मध्ये काँग्रेस कुठेय ?  

काँग्रेसने काय भूमिका घेतली ?

आजच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी मुंबईत आलेल्या, त्या आपल्या खाजगी कामासाठी मुंबईहून कनेक्टिंग फ्लाईट घेणार असल्यामुळे त्यांच्याकडे काहीच वेळ असल्यामुळे त्यांनी विमानतळावरच, राज्यातल्या राजकीय परिस्थितीबाबत काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली.

तर अलीकडेच राज्यसभेच्या निवडणुकीत झालेली चूक विधान परिषदेत होऊ नये म्हणून काँग्रेस नेते कमलनाथ महाराष्ट्रात दाखल झाले. तरीही काँगेसची तीन मतं फुटून विधानपरिषदेत भाई जगतापांना पराभव सहन करावा लागला. सगळं काही महविकास आघाडीच्या हातात असतांना सुद्धा आघाडीची २१ मतं फुटलीत असं म्हणतायेत.

या सगळ्या तारांबळीत काँग्रेस नेत्यांनी काय भूमिका घेतलीय आणि निकालानंतर काँग्रेसनं कोणती पावलं उचललीत हेही महत्वाचं आहे. त्यासाठी विधानपरिषदेच्या निवडणुकीचा दिवस ते आजचा दिवस. या ४ दिवसात काँग्रेसचा मार्ग काय राहिलाय ते बघूया..

२० जून २०२२ : विधान परिषदेच्या निवडणुकीचा दिवस. 

विधानपरिषदेचं मतदान उरकून नाना पटोले तात्काळ नागपूरला रवाना झालेले.

विधानपरिषदेच्या मतदानानंतर नाना पटोले नागपूरला रवाना झाले होते. पत्रकारांनी तात्काळ नागपूरला जाण्याचं कारण विचारल्यावर नाना पटोलेंनी ‘मी, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी सगळ्यात शेवटी मतदान केलंय. महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार निवडून येतील अशी मला खात्री आहे. मी माझ्या कौटुंबीक कामासाठी तात्काळ नागपूरला जातोय. यात काहीही वेगळं नाही. शंका कुशंका घेण्याचं कारण नाही.’ अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली होती.

सोबतच बाळासाहेब थोरात यांनी सुद्धा राज्यसभेत जास्त बिनधास्त राहिल्यामुळे आघाडीला एका जागेचं नुकसान झालंय. पण या निवडणुकीत आघाडीचे सहाही उमेदवार निवडून येतील अशी आशा  व्यक्त केली होती.

निकाल लागल्यावर मात्र बाळासाहेब थोरातांनी अतिशय कठोर प्रतिक्रिया दिली.

पराभव होत असेल तर सरकार म्हणून विचार करण्याची गरज आहे. ‘राज्यसभेसारखी विधान परिषदेच्या निवडणुकीत कोणतीही चूक होणार नाही याची काळजी महाविकास आघाडीनं घेतली होती. परंतु तरीसुद्धा एकदोन नाही तर तब्बल २१ मतं फुटली. यात स्वतः काँग्रेसची तीन मतं आहेत. पक्षाचं गटनेता म्हणून याची जबाबदारी स्वीकारत, मित्रपक्षाला दोष देण्यात काहीही अर्थ नाही. असं ते म्हणाले होते. 

“यात पहिल्यांदा काँग्रेसच्या सभासदांची चूक आहे. एक पक्ष म्हणून पहिल्या क्रमांकाची मतं आपल्या उमेदवारांना देण्याऐवजी पक्षातील मतं दुसरीकडे गेली ही खेदाची गोष्ट आहे”, असं ते म्हणाले होते. 

या प्रतिक्रियेवरून विधान परिषदेचा पराभव बाळासाहेब थोरातांच्या किती जिव्हारी लागलाय याची कल्पना आली. यामुळे बाळासाहेब थोरात गटनेते पदाचा राजीनामा देतील अशी चर्चा रंगली. 

२१ जून २०२२. 

याचदरम्यान थोरातांच्या मते खेद…तर पटोलेंच्या मते महाराष्ट्रात महाविकास आघाडीत कोणतीही अडचण नाहीये असं वक्तव्य..

विधानपरिषदेच्या मतदानानंतर घरी गेलेले नाना पाटोले यांनी दुसऱ्या दिवशी नागपूरहून मुंबईला येतांना  पक्षातील बंडखोरीवर भाष्य केलं, 

‘काँग्रेस पक्षात मतदानावरून जी काही बंडखोरी झाली आहे. त्याचे आम्ही आत्मपरीक्षण करू. ज्या कोणत्या सदस्याने बंडखोरी केलीय त्याची सविस्तर माहिती हायकमांडला देण्यात येईल असं ते बोलले. तसेच महाराष्ट्रातील सर्व काँग्रेस आमदारांना दिल्लीला बोलावलं असतांना, मुंबईत पक्षाच्या सर्व आमदारांची आणि मंत्र्यांची बैठक घेण्यात येत असल्याची माहिती नाना पटोलेंनी दिली होती.  

 बहुमताचा आकडा पूर्ण करण्यासाठी दिवसाची स्वप्न पाहणं अजून दूर आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीत कोणतीही अडचण आहे असं मला वाटत नाही. असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा सुद्धा  साधला होता. 

काँग्रेसचे कोणतेही आमदार नॉट रिचेबल नाहीत. सगळे संपर्कात आहेत – नाना पटोले 

त्यानंतर मुंबईत झालेल्या बैठकीनंतर माहिती देतांना पटोलेंनी, काँग्रेसचे सगळे आमदार संपर्कात असून कुठलेही आमदार नॉट रिचेबल नाहीत. चालू असलेल्या सगळ्या घटनाक्रमावर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. सेनेत जी काही बंडाळी झालीय तो सेनेचा अंतर्गत मामला आहे. सेना हा मामला स्वतः सेटल करेल. मुख्यमंत्री त्यावर प्रयत्न करत असून आमचे नेते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे सगळं काही पूर्वीप्रमाणे सुरळीत होईल अशी माहिती त्यांनी दिली होती.

विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेच्या नाराज आमदारांनी बंड केलं त्यानंतर आपल्याही पक्षातील आमदारांनी बंड करू नये म्हणून खबरदारी घेत काँग्रेस हायकमांडने कमलनाथ यांना मुंबईला पाठवले. 

कमलनाथ यांच्या महाराष्ट्रात येण्यावरून पटोलेंनी पक्षाच्या बाजूने अशी भूमिका मांडलेली कि, “महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होतांना सुद्धा काँग्रेसचे सिनिअर नेते राज्यात आले होते. तसेच जेव्हा जेव्हा महत्वाच्या घडामोडी घडतात तेव्हा तेव्हा सिनिअर नेते राज्यात येतात. त्यांच्या मार्गदर्शनाने हायकमांड बरोबर चर्चा केल्या जातात”, अशी माहिती त्यांनी दिली. 

याबरोबरच चालू असलेल्या घटनेवर भाष्य करतांना नाना पटोले  म्हणाले कि, मध्य प्रदेश तसेच कर्नाटकमधील काँग्रेसची सरकारं भाजपने पाडली आहेत. जे राज्य सरकार केंद्राच्या विरोधात जाते ते सरकार पाडण्याचं काम केंद्र सरकार करते. असं  म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला होता.   

२२ जून २०२२ 

राज्यात चाललेल्या घटनाक्रमात काँग्रेसच्या दिल्ली हायकमांडने कमलनाथांना मुंबईला पाठवलं. बुधवारी म्हणजेच २२ जून रोजी कमलनाथ मुंबईला हजर झाले. त्यांनी काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली. यांनतर ते म्हणाले कि, काँग्रेसचे सगळे आमदार एकजूट आहेत. बैठकीत ४१ आमदार होते बाकी तीन येण्याच्या मार्गावर आहेत. काँग्रेसमधील आमदार विकले जाणारे नाहीत त्यामुळे काँग्रेसला कोणताही धोका नाही”,

यानंतर कमलनाथ शिवसेनेवर बोलतांना म्हणाले कि, “भाजप सत्तेसाठी सौद्याचे राजकारण करत असून हे भविष्यासाठी घातक आहे. शिवसेनेला आपल्या आमदारांशी कसं बोलायचं आहे हे त्यांना ठरवायचं आहे. उद्धव ठाकरेंसोबत माझी बैठक ठरली होती. परंतु त्यांना करोना झाल्यामुळे बैठक रद्द झाली आहे असंही ते म्हणाले.  याच दिवशी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आणि यावर काँग्रेसच्या नेत्यांमध्ये संशयकल्लोळ सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली.

 २३ जून २०२२ :

याच राजकीय घडामोडीत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी मुंबईत आलेल्या, त्या आपल्या खाजगी कामासाठी मुंबईहून कनेक्टिंग फ्लाईट घेणार असल्यामुळे त्यांच्याकडे थोडाच वेळ होता, त्यामुळे त्यांनी विमानतळावरच काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली.

आजचीच मोठी घटना म्हणजे संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचं त्यांनी सांगत महाविकास आघाडीच्या गोटात एकच खळबळ उडवून दिली आणि त्यानंतर काँग्रेसचे राज्यातील नेत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली.

महाविकास आघाडीतून शिवसेना बाहेर पडून भाजपसोबत जाणार का या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हंटलंय कि,  शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना त्यांची भूमिका घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आमच्या हातात काहीच नाहीये. 

चव्हाण असंही म्हणायला विसरले नाही कि, उद्धव ठाकरे युटर्न घेतील असं वाटत नाही.

तर नाना पटोले यांनी थेट आपली भूमिकाच जाहीर करून टाकली.  ते म्हणालेत कि, काल लाईव्ह झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांची आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली, आमच्यात चर्चा झाली, “राज्यात सद्या जी राजकीय अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झाली. हे भाजपचे षड्यंत्र आहे. मात्र, काही झाले तरी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत. महत्वाचं म्हणजे, महाविकास आघाडी आहे, तोपर्यंत सोबत आहोत. अन्यथा आम्ही विरोधात बसायला तयार आहोत. 

थोडक्यात 

थोडक्यात काँग्रेस वेट अँड वॉचची भूमिका घेताना दिसत आहे.

 

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

    

Leave A Reply

Your email address will not be published.