एकनाथ शिंदेंच्या बंडामागे उद्धव ठाकरेंचा हात आहे..?

24 तासाच्या आत शिंदे गटाने परत यावं, शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडले. अस आवाहन शिंदे गटाला संजय राऊत यांनी केलय. त्यावरून चर्चा चालू आहेत पण यात महत्वाची चर्चा आहे ती म्हणजे,

महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यासाठीच शिवसेनेनं हा गेम केला का?

या बंडामागे उद्धव ठाकरेचं नसतील कशावरून. तशा शिंदेच्या बंडामागे खुद्द उद्धव ठाकरेच असतील असा चर्चा गेल्या दोन दिवसांपासून चालूच होत्या पण आत्ता या चर्चांनी वेग पकडला आहे. कारण सेनेच्या संजय राऊतांनी महाविकास आघाडीतून बाहेरल पडण्याची दाखवलेली तयारी…

असा संशय व्यक्त करण्याची काही कारणं देखील आहेत..

पहिलं कारण म्हणजे मुख्यमंत्री पदावर असणाऱ्या व्यक्तीला आपल्या पक्षातच इतक्या टोकाच्या हालचाली सुरू आहेत याचा अंदाज कसा लागला नाही.

राज्यातील गुप्तचर यंत्रणा ही मुख्यमंत्र्यांना रिपोर्टिंग करत असते. अशा गुप्तचर यंत्रणेला विरोधी पक्षासोबत आपल्या पक्षात देखील काय चालू आहे याची माहिती घेण्याची जबाबदारी असते. अशा वेळी एकीकडे विधानपरिषदेच्या निवडणूकीच्या निकालांची माहिती येत असताना ३० च्या वरती आमदार गायब कसे होवू शकतात.

या आमदारांना गुजरातच्या सीमेपर्यन्त सुरक्षित घेवून जाईपर्यन्त मुख्यमंत्र्यांना माहिती नसते.

दूसरं कारण म्हणजे इतक्या मोठ्या संख्येने बंडखोर आमदार थेट मातोश्री सोबत पंगा घेण्यास तयार होवू शकतात का,

एकाबाजूला भाजपचे समर्थन या बंडखोर आमदारांना आहे हे मान्य जरी केलं तरी..संदिपान भुमरे, गुलाबराव पाटील अशा आमदारांची बंडखोरी सहजासहजी मान्य होत नाही. संदीपान भुमरे हे मातोश्रीचे कट्टर सेवक. अगदी मुख्यमंत्र्यांसाठी सातव्या मजल्यावरून उडी मारू शकतो अस वक्तव्य त्यांनी केलेलं. तर गुलाबराव पाटील देखील असेच कट्टर शिवसैनिक. उद्धव ठाकरे आमचं इंजिन आणि मी त्यांच्या डब्बा अस वक्तव्य त्यांनी केलेलं. असे आमदार आज एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झाले आहेत.

कट्टर मातोश्रीभक्त म्हणून उल्लेखले जाणारे हे आमदार शिवसेनेशी गद्दारी करतील ही गोष्ट देखील पचण्याच जड जात आहे..

तिसरा कारण म्हणजे, एकनाथ शिंदे खरच इतके मोठ्ठे नेते आहेत का? की ज्यांच्यामागे इतके आमदार जावू शकतील..

सुरवातीला आपण भुजबळांच्या बंडाचा उल्लेख केला. भुजबळांनी बंड केलं होतं तेव्हा त्यांना शिवसेनेचे फक्त सहा आमदार फोडणं शक्य झालं होतं. भुजबळ हे सेनेचे प्रमुख विरोधी पक्षनेते होते. बाळासाहेब ठाकरेंच्या खालोखाल सेनेत तेव्हा भुजबळांचा शब्द प्रमाण मानला जात होता. मंडल आयोगावर वातावरण तापवल्यानंतर थेट व्हिपी सिंग या पंतप्रधानांनी भुजबळांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली होती. इतक्या ताकदीचा नेता असताना देखील भुजबळ सेनेचे फक्त सहा आमदार फोडू शकले होते.

नारायण राणेंनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा नारायण राणेंवर माजी मुख्यमंत्रीपदाचा टॅग होता. उद्धव ठाकरेंच्या विरोधात थेट बाळासाहेबांकडे तक्रार करण्याएवढी ताकद राणेंची होती. १९९९ च्या निवडणूकीत तिकीट वाटपाच्या यादीत राणेंचा हस्तक्षेप होता.  स्वत: उमेदवारी देणं, प्रचाराला जाणं आणि उमेदवाराला निवडून आणणं हे राणेंनी केलं होतं. अस असतानाही राणेंना सेनेचे फक्त दहा आमदार फोडता आले.

अन् राज ठाकरे. ते तर घरचेच होते. उद्धव ठाकरेंच्या पुर्वीपासून ते विद्यार्थी सेनेतून सक्रिय राजकारणात होते. सेनेत राज ठाकरेंचा स्वत:चा असा गट होता. तरिही राज ठाकरेंसोबत फक्त आमदार म्हणून बाळासाहेब नांदगावकर हे एकमेव आमदार गेले..

पण एकनाथ शिंदे खरच इतके ताकदवान आहेत का? तुलनात्मकदृष्ट्या नाही असच उत्तर येतं. एकनाथ शिंदे संपूर्ण महाराष्ट्राचे नेते नाहीत. ठाण्याबाहेर लोकनेतृत्व म्हणून त्यांची इमेज नाही. अस असताना एकनाथ शिंदेच्या मागे इतके आमदार कसे जावू शकतील..

या मुद्द्यामुळे चर्चा होतेय ती या बंडामागे खुद्द उद्धव ठाकरेच आहेत. या प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी बोलभिडूने राजकीय विश्लेषक, संपादक यांच्यासोबत संपर्क साधला. त्यांच याबाबत काय मत आहे हे क्रमवार पाहूया..

जेष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई बोलभिडू सोबत बोलताना म्हणालेत,

उद्धव ठाकरेंनीच या आमदारांना बंड करायला लावलंय या चर्चाना अर्थ नाही. कारण कालच्याच लाइव्हमध्ये उद्धव ठाकरे म्हणलेले कि, शरद पवारांनी आणि सोनिया गांधींनी मला मुख्यमंत्री केलं, त्यांनी मला सतत आधार दिलाय. आता स्वतः उद्धव ठाकरेच भाजपच्या लाईनवर असले असते तर त्यांनी या दोघांचा उल्लेख केलाच नसता. आणि ज्या पद्धतीने त्यांनी वर्षा सोडलं त्याचाच अर्थ असाय कि, आपण ‘ठाकरे घराण्याचे’ आहोत, आपल्याला सहानुभूती मिळू शकते.  

आणि जो दुसरा मुद्दा आहे कि,

“उद्धव ठाकरेंनीच बंडखोरांमध्ये स्वतःचे आमदार पाठवलेत का तर हे पटेनासं आहे. कारण प्रत्येक आमदाराचं स्वतःचं गणित वेगळं असतं. जे आमदार उशिरा गेलेलेत त्यांना अशी भीती असेल कि, उद्धव ठाकरेंसोबत राहणं म्हणजे भाजपशी दोन हात करणं. ती हिंमत त्यांच्यात नसावी. गुलाबराव पाटलांसारख्या ढाण्या वाघाची शेळी झाली आणि ते तिकडे गेले.  २०२४ मध्ये आपण भाजपच्या मदतीशिवाय निवडूनच येणार नाही अशी एक भीती. आणि दुसरी ईडीची भीती जी प्रत्येकालाच आहे. त्यामुळे भाजपच्या विरोधात जायलाच नको असं त्यांचा विचार असावा असं मत चोरमारे यांनी व्यक्त केलंय.  

याच विषयाला धरून  बोल भिडूने ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्याशी चर्चा केली असता, त्यांचं मत असं आहे कि, 

या बंडामागे उद्धव ठाकरे असतील हे नॅरेटिव्हच तथ्यात बसत नाही. कारण स्वतःला आणि शिवसेनेला अपमानित करून उद्धव ठाकरे काय साधणार आहेत ?उलट ते डॅमेज होतायेत.  एकनाथ शिंदेच्या बंडाचं प्लॅनिंग खूप आधीपासून चालू होतं. जोपर्यंत तो आकडा जमत नव्हता तोपर्यंत शांततेत घेतलं गेलं.

मग जेंव्हा बंड सुरु झालं होतं आणि महाराष्ट्राबाहेर इतक्या मोठ्या संख्येने आमदार जात होते तेंव्हा त्यांना लोकल पोलीस सेक्युरिटी देतात मग त्याची खबर मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना नव्हती का ? गुप्तचर विभाग असल्या खबरा काढत असतो त्यांनाही याची माहिती नसावी का.  त्यात देवेंद्र फडणवीस पहिल्यापासूनच उघडपणे सांगतायत कि, तुमचे आमदार नाराज आहेत ते आम्हालाच मत देणारेत. या सगळ्या गोष्टींवरून या बंडाची कल्पना पक्षनेतृत्वाला का आली नाही?

आता काल देखील उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन विषय संपावायला हवा होता तसं त्यांनी केलं नाही. त्यांनी जर का आत्ता ‘शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडतेय’ असं जाहीर करावं, सगळे बंडखोर आमदार मुंबईत परत येतील. कारण हीच त्या बंडखोर आमदारांची मागणी आहे.  राहिला मुद्दा शिंदेंच्या गटात जे नव्याने आमदार सामील होतायेत ते उद्धव ठाकरेंनी पाठवले असावेत यात तथ्य असू शकतं, मात्र आता डॅमेज व्हायचं ते  होऊन गेलंय. त्यामुळे त्याचा काही फायदा नाही असंही तोरसेकर यांनी म्हंटलंय.

तोरसेकर बोल भिडूशी चर्चा करताना असंही म्हणतात कि, 

एकनाथ शिंदेंची सर्वात मोठी ताकद काय आमदारांमध्ये नाहीये. त्यांची ताकद म्हणजे त्यांच्याकडे कुणीही ‘संजय राऊत’ नाहीये. तुम्हाला खड्डयात घालणारा जेंव्हा लाडका होतो तेंव्हा तुम्हाला बुडवायला कुणीही लागत नाही. संजय राऊत हे शिवसेना बुडवत आहेत हे उद्धव ठाकरेंना मान्यच नाहीये”.

तर तोरसेकरांचं मत पाहता आणि काहीच वेळापूर्वी एकनाथ शिंदे गटाने २ पानी पत्र जारी केलं त्यात संजय राऊतांवर केलेले आरोप पाहता, याचा अर्थ बंडखोर आमदारांचा राग संजय राऊतांवर आहे असं चित्र दिसून येतंय.

याच चर्चेत पत्रकार विजय चोरमारे याची प्रतिक्रिया आम्ही घेतली, ते म्हणतात कि,   

“या चर्चेत तथ्य नाही. असं असलं असतं तर उद्धव ठाकरेंनी स्वतः काहीतरी कारण देऊन आघाडी तोडली असती आणि ते भाजपबरोबर गेले असते. इतक्या मोठ्या संख्येने आमदार जातायेत, कार्यकर्ते फुटत आहेत. इतकी सगळी नामुष्की पत्करून अशी काहीतरी खेळी करतील असं वाटत नाही. 

एकदा जर का असं वाटलं कि आता आपली सत्ता येणार नाही, मग अशावेळेस सत्तेबरोबर जाण्यात काहींचा इंटरेस्ट असतो. आता एकनाथ शिंदेंकडे मोठा गट आहे आणि हा गट सत्तेत येणार हे लक्षात आल्याबरोबर हे आमदार उशिरा का होईना त्यांच्या गटात सामील होतायेत.

तोच दुसरा मुद्दा म्हणजे, उशिरा शिंदेंच्या गोटात जाणारे आमदार हे कदाचित शिवसेनेकडून पाठवले गेले असतील,  तिथं किती आमदार स्वतःच्या मर्जीनुसार गेलेत, किती शिंदेंसोबत आहेत याचा एकंदरीत अंदाज घेण्यासाठी उद्धव ठाकरेंनीच आमदार पाठवले असतील याची शक्यता नाकारता येत नाही असंही चोरमारे यांचं म्हणणं आहे. 

या चर्चेच्या सरतेशेवटी बोल भिडूशी बोलताना वरिष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांचं म्हणणं आहे कि, 

सद्याची जी परिस्थिती बघितली तर जे सहकारी उद्धव ठाकरेंच्या जवळचे आहेत ते सहकारी काल रात्रीपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत होते ते आज सकाळी गुवाहटीला शिंदेंकडे पोहचलेत. हे चित्र बघितलं तर, असं वाटतंय कि हे सगळं उद्धव ठाकरेंच्या मर्जीनुसार तर होत नसेल ना? उद्या जाऊन जर आदित्य ठाकरे अन संजय राऊत गृहवाटीत दिसले तर आश्चर्य वाटायला नको. आणि या सगळ्या आमदारांना ते एकत्र घेऊन येतील आणि स्वतः उद्धव ठाकरे मुंबई विमानतळावर त्यांचं स्वागतही करतील. असं चित्र दिसतंय कारण गोष्टी तशा घडतायेत, 

दुसरा मुद्दा असाय कि,

उद्धव ठाकरेंनी आपले विश्वासू आमदार शिंदेंसोबत असणाऱ्या आमदारांना फोडण्यासाठी पाठवलेत का, जसे छत्रपती शिवाजी महाराज गनिमी कावा करायचे तसा हा गनिमी कावा उद्धव ठाकरेंनी केलाय का ? या दोन्ही शक्यता नाकारता येत नाहीयेत. मात्र पुढं काय घडतं यावर सगळं काही अवलंबून आहे.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.