ते दाऊदचा फोटो काढू लागले तोच, कोणाच तरी लक्ष त्यांच्याकडे गेलं…
दाऊदने त्याच्या आयुष्यात कायमच गोपनीयता जपली. सुरवातीला काही सार्वजनिक ठिकाणी तो दिसायचा, मात्र त्याच्या सभोवती कायम त्याच्या बॉडीगार्डसचा पहारा असायचा. अनेकांमध्ये त्याच्याबद्दलची भीती आणि त्याचं आकर्षण होतं. त्याला मात्र प्रत्येक सामान्य भारतीयांप्रमाणे फिल्मस्टार आणि क्रिकेटचं आकर्षण होतं. मुंबई तर मायानगरी आणि तो इथे राज्य करणारा डॉन.
दाऊद अनेक सेलेब्रिटीनां पार्ट्या द्यायचा. त्याला घाबरून सगळे न चुकता पार्टीला हजर देखील व्हायचे. मात्र तिथले फोटो तो बाहेर जाऊ द्यायचा नाही. पुढे पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी तो दुबईला सटकला. मात्र तिथेही त्याच्या पार्टीजच्या कथा चवीने चर्चिल्या जायच्या.
१९९३ साली मुंबईत भीषण बॉम्बस्फोट घडवून आणल्यावर तो जगातल्या अनेक सुरक्षा यंत्रणाच्या हिटलिस्टवर आला. त्या घटनेनंतर तर तो गायबच झाला. आता तो पाकिस्तानात असतो. पाकिस्तान सरकारने त्याला आसरा दिलाय. काही जणांच्या मते, त्याने स्वतःची प्लस्टिक सर्जरी केलीये. त्याच्या मुलीचे प्रसिद्ध पाकिस्तानी क्रिकेटर जावेद मियांदादच्या मुलाशी लग्न झाले. तिथे दाऊदला पकडण्यासाठी भारतीय गुप्तचर संघटनेने सापळा रचला होता मात्र तो स्वतःच्या मुलीच्या लग्नाला सुद्धा आला नाही.
आजघडीला पाकिस्तानी बिळात लपलेल्या दाऊदचा फोटो काढणं ही निव्वळ अशक्य कोटीतली गोष्ट. मात्र बॉम्बस्फोट प्रकरणापूर्वी काढण्यात आलेले त्याचे काही जुने फोटो प्रसिद्ध आहेत. त्यापैकी सगळ्यात फेमस फोटो म्हणजे,
गॉगल घातलेला क्रिकेटची मॅच बघतानाचा फोटो.
तेव्हा सुद्धा त्याचा फोटो काढणं अवघड होतं, मात्र ही किमया केली होती एका धाडसी फोटोजर्नालीस्टने .
साल होत १९८५. भारत-पाकिस्तान दरम्यानची शारजा सिरीजमधील मॅच..
एकदम हाय व्होल्टेज गेम. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशामधून हजारो फॅन्स या सामन्यासाठी शारजामध्ये दाखल झालेले. तसेच हा महासंग्राम कव्हर करायला देशोदेशीचे पत्रकार आणि फोटोग्राफर सुद्धा हजर होते. यातच होते ‘इंडिया टुडे’चे फोटोजर्नालीस्ट ‘भवनसिंग’.
भवनसिंग यांच्याजवळ दोन कॅमेरे होते. एक कॅमेरा मैदानाच्या दिशेने ट्रायपॉडवर लावून ठेवण्यात आला होता, तर दुसरा त्यांच्या गळ्यात होता. मॅच सुरु असताना अचानकच त्यांच्याजवळच्या स्टँडमध्ये काहीतरी गडबड सुरु असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
कुणीतरी ‘दाऊद, दाऊद’ असं कुजबुजत असल्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला. ट्रायपॉडवरचा कॅमेरा तसाच सोडून फक्त गळ्यातला कॅमेरा सोबत घेऊन ते आवाजाच्या दिशेने गेले .
त्यापूर्वी भवनसिंग यांनी कधीही दाऊदला बघितलं नव्हतं. ना कधी त्याचा फोटो त्यांच्या बघण्यात आला होता. त्यामुळे गर्दीमध्ये दाऊद नेमका कोणता या विवंचनेत ते सापडले. मात्र थोडंस जवळ गेल्यानंतर दाउद त्यांच्या नजरेस पडला. पिवळा गोल गळ्याचा टीशर्ट, डोळ्यावर स्टाईलिश गॉगल, ओठात सिगरेट आणि मैदानावर आपलंच राज्य असल्याचा चेहऱ्यावरचा मग्रूर भाव. सोबत आजूबाजूला अदबीने उभे असलेले चमचे.
भवनसिंग यांना दाऊदला ओळखणं अवघड गेलं नाही. ‘डॉनचा फोटो काढण्यास मनाई आहे’ हा अलिखित नियम भवनसिंग यांना सुद्धा माहित होता मात्र त्यांना ही सुवर्णसंधी वाटली.
असा फोटो काढण्याची संधी आयुष्यात फक्त एकदाच मिळते, याची त्यांना जाणीव होती. खरं तर हा फोटो त्यांच्या आयुष्यातला शेवटचा फोटोसुद्धा ठरू शकला असता, पण या सगळ्या गोष्टींची कल्पना असताना देखील त्यांनी हे शिवधनुष्य पेलायचा निर्णय घेतला.
डॉनच्या थोडंसं जवळ जाऊन त्यांनी आपल्या गळ्यातला कॅमेरा दाउदच्या दिशेने रोखला. कॅमेराच्या लेन्समधून बघत फोटो क्लिक करणार इतक्यात दाऊदसोबतच्या कोणाचं तरी लक्ष भवनसिंगकडे गेलं आणि तो ओरडला,
“क्यू खीच रहे हो फोटो? बंद करो.”
भवनसिंगना ब्रम्हांड आठवलं. त्यांना वाटलं आता आपण संपलो. फोटो गेला, कॅमेरा जाणार आणि आयुष्याची सुद्धा काही खात्री नाही. सगळेजण त्यांच्या दिशेने बघू लागले. तो ओरडणारा आवाज होता दाऊदचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या छोटा राजनचा.
भवनसिंगांनी हातपाय गळालेल्या अवस्थेत काही काळ दाऊदकडे रोखून बघितलं. दोघांची नजरानजर झाली. दाऊदला काय वाटले काय माहित त्याने आपल्या गुंडाकडे हात करून इशारा केला,
“खिंचने दे”.
भवनसिंगांच्या जीवात जीव आला. त्यांनी चुपचाप दाऊदचे ५ फोटो काढले. जे आजही आयकॉनिक मानले जातात.
दाऊदचं अख्ख व्यक्तिमत्व या फोटोमधून प्रतिबिंबित होतं. यातल्या एका फोटोत तो स्टेडियममध्ये फोनवर बोलताना दिसतोय. त्याच्यामागे असलेल्या त्याच्या छोटा राजन वगैरे साथीदारांचं फोटोग्राफरकडे अजूनही बारीक लक्ष आहे. दाऊद मात्र बेदरकारपणे मॅच पाहतोय. आजही दाऊदची कुठलीही बातमी छापायची असली तर हेच फोटो वापरले जातात.
फोटोज घेतल्या-घेतल्या लगेच भवनसिंग स्टेडियममधून सटकले. संपूर्ण मॅच संपण्याची देखील त्यांनी वाट बघितली नाही. आपल्या हाती लागलेला हा खजिना कधी एकदा आपल्या संपादकाला देतोय असं त्यांना झालं होतं. दुसरं असं की त्यांच्या मनात भीती देखील होती की, न जाणे कधी डॉनचा मूड बदलेल आणि तो आपल्या साथीदारांना सांगून फोटो डीलीट करायला भाग पाडेल ?
दुसऱ्या दिवशी शॉपिंग करताना त्यांना सुनील गावस्कर भेटले. गावस्करांनी सांगितलं की “डे-नाईट मॅचमुळे गडबड झाली आणि भारताने सामना गमावला.”
मुंबईत पोहचल्यानंतर भवनसिंगांनी ते फोटोज ‘इंडिया टुडे’चे संपादक अरुण पुरींकडे सुपूर्द केले. दाऊदचा फोटो बघून संपादक साहेबांना आश्चर्याचा धक्काच बसला. ऑफिसमधले बाकीचे सहकारीसुद्धा ते फोटो पाहून चाट पडले. सगळ्यांनी भवनसिंगांचं कौतूक केलं. त्यांना मात्र ते फोटोज दाऊदचेच असल्याची खात्री झाल्यामुळे हायसं वाटलं. हे फोटोज ‘इंडिया टुडे’मध्ये छापून आल्यानंतर मात्र देशभर खळबळ उडाली. भवनसिंगांना वाटलं की आता आपली पोलीस किंवा सीबीआयकडून चौकशी वगैरे होईल. मात्र तसं काही झालं नाही.
भवनसिंग हे भारतातल्या लीजंड फोटोजर्नालीस्ट पैकी एक मानले जातात. तत्कालीन सरकारच्या दबावाला झुगारून त्यांनी काढलेले ‘नेल्ली नरसंहार’मधले फोटोज तर विशेष गाजले. इंदिरा गांधी, सरसंघचालक गोळवलकर गुरुजी, क्वात्रोची अशा अनेक फेमस व्यक्तिमत्वांचे त्यांनी काढलेले फोटोज प्रसिद्ध आहेत. काही वर्षापूर्वी त्यांना केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे दिल्या जाणाऱ्या ‘राष्ट्रीय फोटोग्राफी पुरस्कार’ सोहळ्यात मानाचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ देखील देण्यात आला होता.
हे ही वाच भिडू –
- बारकाईनं पाहिलं तर यात पाकिस्तानचा हात सुद्धा दिसून येईल.
- पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब टाकणार होता.. पण ?
- चेतन शर्माला आजही लुझर सिक्ससाठी ओळखताय, आत्ता मत बदलेल..!!!