कोण होती ‘लक्स’च्या जाहिरातीत झळकलेली पहिली भारतीय अभिनेत्री…?
‘लक्स’ साबणाच्या जाहिरातीत नर्गिस, मधुबाला आणि मीनाकुमारी यांच्यापासून ते आजघडीच्या ऐश्वर्या रॉय, करीना कपूर, प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोन या सर्व अभिनेत्रींना आपण पाहिलं असेलच. पुरुष अभिनेत्यांपैकी बॉलीवूडचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणारा शाहरुख खान आणि इम्रान खान हे देखील लक्सच्या जाहिरातीत झळकलेत पण या सगळ्यांना ही वाट मोकळी करून देण्याची किमया पार पाडली होती एका मराठी अभिनेत्रीने. ‘लक्स’ची जाहिरात करणारी पहिली भारतीय अभिनेत्री होण्याचा मान सर्वप्रथम मिळवला होता ‘लीला चिटणीस’ या मराठमोळ्या अभिनेत्रीने. १९४१ साली जेव्हा लीला चिटणीस ‘लक्स’च्या जाहिरातीत झळकल्या त्यावेळी त्यांनी ‘लक्स’वरील तोपर्यंतची विदेशी मॉडेल्सची सद्दी मोडीत काढली होती आणि त्यानंतरच अनेक भारतीय अभिनेत्रींसाठी ‘लक्स’ या ब्रांडच्या जाहिरातीत झळकण्याचा मार्ग मोकळा झाला होता.
१९३० ते १९८० च्या कालावधीत भारतीय चित्रपटसृष्टीत काम केलेल्या लीला चिटणीस यांचा जन्म कर्नाटकातील धारवाड येथील एका मराठी भाषिक कुटुंबात झाला होता. त्या पूर्वाश्रमीच्या लीला नगरकर. वयाच्या १६ व्या वर्षीच डॉ. गजानन चिटणीस यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्या नगरकरच्या ‘चिटणीस’ झाल्या. काही कारणांमुळे पतीबरोबर घटस्पोट झाल्यानंतरच्या काळात त्या शिक्षिका म्हणून काम करू लागल्या. पदवी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी ‘नाट्य मन्वंतर’ या नाट्यसंस्थेसोबत काम करायला सुरुवात केली.
इंग्रजी प्राध्यापकाच्या घरात जन्मलेल्या लीला चिटणीस या भारतीय चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या सुशिक्षित अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यानंतर १९४० च्या सुमारास ‘बॉम्बे टॉकीज’च्या महत्वाच्या अभिनेत्री म्हणून नावलौकिक मिळविण्याआधी त्यांनी ‘प्रभात पिक्चर्स’ आणि ‘रणजीत मुव्हीटोन’ बरोबर देखील काम केलं होतं. ‘बॉम्बे टॉकीज’च्या १९३९ सालच्या ‘कंगण’ या चित्रपटात त्या प्रमुख भूमिकेत झळकल्या आणि हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. ‘कंगण’च्या यशाने त्या ‘बॉम्बे टॉकीज’चा नवीन चेहरा म्हणून प्रेक्षकांसमोर आल्या.
त्यानंतर त्यांचे अशोक कुमार यांच्या बरोबर ‘आझाद’ ‘बंधन’ आणि ‘झुला’ हे सामाजिक विषय हाताळणारे चित्रपट प्रदर्शित झाले आणि हे तिन्हीही चित्रपट ‘बॉक्स ऑफिस’वर सुपरहिट ठरले. या चित्रपटांच्या या यशाने १९४१ पर्यंत लीला चिटणीस या प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्या होत्या. त्यांची ही लोकप्रियता लक्षात घेऊनच त्यांना ‘लक्स’ ब्रँडची जाहिरात करण्याची ऑफर मिळाली, ती त्यांनी स्वीकारली. ही ऑफर स्वीकारल्यामुळे ‘लक्स’ची जाहिरात करणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय अभिनेत्री ठरल्या. तोपर्यंत ‘लक्स’च्या जाहिरातीत फक्त हॉलीवूडमधील प्रख्यात अभिनेत्रीच झळकत असत.