लाखोंचं उत्पन्न देत असलेली पिवळी कलिंगडं हा नेमका काय विषय आहे?

फ्रेश आणि रसरशीत कलिंगड. बाहेरून दिसायला जर्द हिरवं आणि गोल, आतून रंगला लाल आणि चवीला गोड. भर उन्हाळ्यात शेतकरी ते हायवेला विकत असतात, काही ठिकाणी घरोघरी जाऊन विकत असतात. खाल्ल्यावर उन्हाळ्यात बरचं बर वाटतं. ९७ टक्के पाणी असलेलं हे फळ शरीरात ग्लुकोजची लेव्हल पूर्ण करतं. तर काही काही महाभाग अशा कलिंगडांना व्होडक्याचं इंजेक्शन मारून मस्त कॉकटेल करतात.

पण आता याच लाल आणि रसरशीत दिसणाऱ्या कलिंगडांमध्ये नवीन प्रकार आलायं. पिवळ्या कलिंगडाचा. हा इस्रायलचा प्रकार असल्याचं सांगितलं जात आहे. 

हल्लीचा शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देऊन नवीन प्रयोग करणाऱ्यांतील मानला जातो. आधुनिकतेची जोड देत जगभरातील नवं तंत्रज्ञान स्वीकारत आहे. आणि त्यातून ते शेती अधिकाधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत.

असाच एक नवीन प्रयोग केलायं कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील कोरहळी गावातल्या बसवराज या तरुणानं. हा तरुण ग्रॅज्युएट आहे. पण नोकरीच्या मागं न लागत त्यानं शेतीचा पर्याय निवडला, सांगितलं जेवढं कष्ट एखाद्या कंपनीसाठी करणार तेवढंच माझ्या शेतीसाठी केलं तर वर्षाला १० एकर शेती घ्यायला कमी करणार नाही. 

मग काय बसवराज शेतीत घुसले आणि पारंपारिक शेतीला फाटा देऊन आपल्या शेतात पिवळ्या रंगाच्या कलिंगडाची लागवड केली. जेव्हा कलिंगडं तयार झाली आणि त्यातलं एक कलिंगड
त्यांनी कापून दाखवलं तेव्हा बघणाऱ्या सगळ्यांच्याच चक्कीत जाळ झाला. कारण आतला गर हा लाल रंगाच्याऐवजी पिवळ्या रंगाचा होता.

सध्या हे कलिंगड लाल कलिंगडापेक्षा चवीला गोड असल्याचं बसवराजचं म्हणणं आहे. पिवळ्या कलिंगडाच्या उत्पादनासाठी त्यानं जवळपास २ लाख रूपये गुंतवले होते, ज्यातून त्याला ३.५ लाखापेक्षा जास्त नफा मिळवला आहे. 

पण भिडूनों, पिवळ्या कलिंगडाचं उत्पादन घ्यायला कर्नाटकमधल्या शेतकऱ्यांच्या आधी पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. मालवण, पालघरमध्ये ही पिवळ्या कलिंगडं शेती केली जात आहेत.

याआधी मालवणच्या आचरा गावातील तरुण विक्रांत आचरेकर यांनी हा प्रयोग केला आहे. पोलीस भरतीची तयारी करताना लॉकडाऊनमध्ये मिळालेला मोकळा वेळ सत्कारणी लावत त्यांनी विशाला, आरोही, शुगरक्कीन, ममद अशा चार प्रकारच्या कलिंगडांची लागवड केली होती. ज्यातून त्यांना देखील चांगलं उत्पन्न मिळालं असल्याचं सांगण्यात आलं.

तर वाडा तालुक्यातील देवघर गावचे शेतकरी प्रफुल्ल पाटील यांनीही पिवळ्या कलिंगडाची लागवड केली होती. कमी साधन आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाऱ्या शेतीकडे वळण्यासाठी प्रफुल्ल पाटील ठिकठिकाणच्या प्रयोगशील शेतीची पहाणी करत असतात. त्यासाठी नवनव्या तंत्रज्ञानाची माहिती घेत असतात.

अशातच ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेनं मागच्या वर्षी काही शेतकऱ्यांना शेतीच्या अभ्यासासाठी इस्राईलला पाठवलं होतं. त्यात प्रफुल्ल पाटील पण होते. तिथलं शेतीचं तंत्रज्ञान पाहून, कमी पाणी व कमी मनुष्यबळावर होणारी शेती पाहून प्रफुल्ल यांनी पण आपल्या शेतीत हा प्रयोग करण्याच ठरवलं.

त्यामुळे हा कलिंगडातील पिवळा प्रकार इस्रायल मधून आला असल्याचं सांगितलं जातयं. 

हे हि वाच भिडू. 

1 Comment
  1. गणन says

    तैवानी आहेत Known you seed कम्पणीचे रंगीत कलिंगड तुम्ही इस्राएल म्हणू नका

Leave A Reply

Your email address will not be published.