टरबुजावरून भारतातल्या दोन राज्यात राडा झालेला, आईशप्पथ हे खरय…!

टरबुज या गोष्टीला राजकीय महत्व आहे का?

गालातल्या गालात हसून उत्तर देवू नका भिडू. उगीच दुसरा अर्थ काढून नको तिथे राजकारण आणण्यात अर्थ नाही. कारण ही गोष्ट खरोखरच्या टरबूज्याची आहे. म्हणजे एकदम ओरिजनल टरबूज. ते गोल गोल असत. उन्हाळ्यात शेतकरी ते घेवून हायवेला उभारतात ते टरबूज. मग ते कापून आपण खातो. काही काही महाभाग अशा टरबुजांना व्होडक्याचं इंजेक्शन मारून मस्त कॉकटेल करतात वगैरे वगैरे.. 

थोडक्यात टरबुजाची महती मोठ्ठी आहे. इतकी की हा प्रश्न सोडवण्यासाठी थेट दिल्ली दरबारात जावं लागलं होतं.

दोन राज्याच्या सैनिकात तुफान युद्ध झालं आणि दोन्हीकडचे सैनिक मारले गेले होते. अगदी आमचं पटत नसेल तर “मतीरे की राड” नावाने गुगल सर्च करा. एकसे एक लेख येतील. ते वाचा आमचं पण वाचा आणि मगच विश्वास ठेवा बास काय.. 

तर ही गोष्ट आहे १६४४ ची.

त्यावेळी राजस्थान भागात दोन संस्थाने अथवा स्वतंत्र राज्य म्हणूया. यापैकी पहिलं राज्य होतं बिकानेर राज्य आणि दुसरं होतं नागौर राज्य. 

या दोन राज्यांची सीमा जाखनिया गावातून जात होती. म्हणजे निम्म गाव या भागात आणि निम्म गाव त्या भागात असा कारभार होता. बर ही सिमारेषा भारत बांग्लादेश सीमेसारखी नव्हती. अगदी कट टू कट सिमारेषा होती. 

तर झालं अस की याच गावात एक टरबूज्याचा वेल वाढू लागला. काही दिवसात त्याला एक टरबूज लागलं. झालेलं अस की बिकानेर च्या सिमेत हा वेल उगवलेला आणि वेल वाढत जावून तो नागौरच्या सिमेत गेला तिथे या वेलाला टरबुज लागला. 

आत्ता नागौर वाल्या लोकांनी या टरबुज्यावर आपला हक्क सांगितला, कारण काय तर टरबुज आमच्या हद्दीत आलय. तर बिकानेरवाले म्हणाले टरबुजाचा वेल तर आमच्या हद्दीत आहे. 

नागौरच्या राजाचं नाव होतं अमरसिंह महाराज तर बिकानेरच्या महाराजांच नाव होतं राजा करणसिंह. प्रकरण पेटत गेलं. तेव्हा अमरसिंह हे मुघलांच्यासाठी दक्षिण भारताच्या मोहिमेवर गेले होते. इकडे करणसिंहाने सलावतख्सा बक्शी याच्याकडून पत्र पाठवत मुघलांनी या प्रकरणात तडजोड करावी म्हणून मागणी केली. तिकडे दक्षिणेतून येताच नागौरचे अमरसिंह मुघल दरबारात पोहचले. 

मुघल दरबारात हे प्रकरण पोहचून निर्णय येईपर्यन्त टरबूज वाळून गेलं असतं. साहजिक दोन्हीकडून युद्धाची घोषणा करण्यात आली. 

नागौर सैन्याचं नैतृत्व सिंघवी सुखमल करत होते तर बिकानेरचं नैतृत्व रामचंद्र करत होते. दोन्हीकडून युद्ध झालं. राडा झाला. दोन्ही बाजूचे शेकडो सैनिक मृत्यूमुखी पडले आणि बिकानेर जिंकल. ज्यांच्या हद्दीत हे टरबुज होतं तेच जिंकले. टरबुज आपणाला मिळालं म्हणून बिकानेर वाले खूष झाले. 

आत्ता सांग हे युद्ध फक्त टरबुजासाठी होतं का, नाही राव..!! इगो लय महत्वाची गोष्ट आहे..

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.