भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आमरण उपोषण करून शहीद झालेले एकमेव क्रांतिकारक !

१३ सप्टेंबर १९२९.

लाहोरमधील जेलमध्ये ज्यावेळी क्रांतिकारक जतीन दास हे भगतसिंग यांच्या कुशीत शेवटचा श्वास घेत होते, त्यावेळी जतीन दास यांचीच शेवटची इच्छा म्हणून आपल्या या क्रांतिकारक साथीदारासाठी भगतसिंग हे रवींद्रनाथ टागोरांची ‘एकला चलो रे’ ही कविता गुणगुणत होते.

२७ ऑक्टोबर १९०४ रोजी कोलकात्यात जन्मलेले जतींद्र नाथ दास बंगालमधील क्रांतिकारी संघटना ‘अनुशिलन समिती’शी जोडले गेलेले होते. त्यांनी गांधीजींच्या असहकार चळवळीत देखील भाग घेतला होता.

जतीन दास यांचा संबंध ज्यावेळी भगतसिंग यांच्याशी आला त्यावेळी ते भगतसिंग यांच्यासोबत काम करायला लागले. जतीन दास यांचं काम होतं आपल्या  क्रांतिकारी साथीदारांसाठी बॉम्ब बनवणं. भगतसिंग आणि बटूकेशवर दत्त यांनी सेन्ट्रल असेंब्लीमध्ये जे बॉम्ब टाकले ते जतीन दास यांनीच बनवले होते.

जून १९२९ साली ते इंग्रजांच्या ताब्यात सापडले आणि त्यांना लाहोरच्या तुरुंगात पाठवण्यात आलं. लाहोरचा तुरुंग हा राजकीय कैद्यांना दिल्या जाणाऱ्या अतिशय वाईट वागणुकीसाठी कुख्यात होता. जतीन दास यांनाही तिथे अतिशय वाईट वागणूक देण्यात येत होती.

त्यामुळे त्यांनी १३ जुलै १९२९ रोजी तुरुंगातच इंग्रज सरकारविरोधात आमरण उपोषणास सुरुवात केली. भारतीय राजकीय कैद्यांना देखील युरोपीय कैद्यांप्रमाणेच वागणूक देण्यात यावी ही त्यांची मागणी होती. जतीन दास यांचं हे उपोषण ६३ दिवस चाललं होतं आणि ते संपुष्टात आलं ते त्यांच्या हौतात्म्यानेच.

ब्रिटीश सरकारने त्यांचं उपोषण तोडण्यासाठी अनेक बऱ्या-वाईट मार्गांचा अवलंब केला परंतु त्यात त्यांना यश येत नव्हतं. जतीन दास यांचं उपोषण तोडण्यासाठी त्यांना अनेक आमिष आणि प्रलोभने दाखवण्यात आली, पण या भारतमातेच्या सुपुत्राने त्यापैकी कशालाही भिक घातली नाही.

जतीन यांच्या उपोषणाचा कालावधी जसाजसा वाढत चालला होता, तसतशी त्यांची तब्येत देखील खालावत चालली होती. त्यामुळेच ब्रिटिशांनी त्यांना जबरदस्तीने अन्न देण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी हे अन्न त्यांच्या अन्ननलिकेत अडकलं. जतीन दास यांची प्रकृती आणखीनच खालावली. वैद्यकीय उपचार करून देखील त्यांचे प्राण वाचवणं शक्य झालं नाही.

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात जतीन दास शहीद झाले, पण त्यांच्या हौतात्म्याने अनेक भारतीयांना ब्रिटिशांच्या विरोधात तीव्र लढा उभारण्याची प्रेरणा दिली. भगतसिंग यांच्या महत्वाच्या साथीदारांपैकी एक असणाऱ्या दुर्गा भाभी या लाहोरमधून जतीन दास यांचा मृतदेह घेऊन कोलकात्याला पोहोचल्या. तिथे खुद्द नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांचा मृतदेह स्वीकारण्यास आले होते.

हे ही वाच भिडू

3 Comments
  1. Swapnil Babaso Khade says

    Assembly मध्ये भगतसिंग बरोबर bomb blast करायला राजगुरू नाही तर बटुकेश्वर दत्त होते. थोडी पडताळणी करावी व माझे ही काही confusion hai असेल तर ते ही नीट करावे.

  2. टिम बोलभिडू says

    आपले म्हणणे योग्य आहे. जुना लेख होता, नजरचुकीने नावात चूक झाली होती. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. वाचत रहा बोल भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.