स्वतंत्र भारताचं हायजॅक झालेलं विमान पाकिस्तानने सोडवलं

भारताच्या इतिहासात अनेक घाव आहेत जे आप्तेष्टांनीच भारतीयांना दिले आहेत. मात्र हे देखील खरं आहे की कधीकधी दुरावलेल्या नेत्यांनीचसंकटाच्या वेळी भारताची मदत देखील केली आहे. अनेक किस्से यासंदर्भातील सापडतील. त्यातीलच एक किस्सा १९७६ सालचा. हे असं साल होतं जेव्हा पाकिस्तानने दाखवून दिलं होतं की कितीही शत्रुत्व, नाराजगी या दोन्ही देशांत असली तरी सामान्य माणसावर जेव्हा वेळ येते तेव्हा एकच गोष्ट शाश्वत असते ती म्हणजे ‘माणुसकी’.

भारतात तेव्हा राजकीय उलथापालत चालू होती. नुकतंच १९७५ ला इंदिरा गांधींनी भारतात पहिल्या आणीबाणीची घोषणा केली होती. अशात देशाला हादरवून टाकणारी घटना घडली. भारताच्या विमानाचं अपहरण करण्यात आलं. मात्र जितक्या भयानक पद्धतीने या विमानाला हायजॅक करण्यात आलं होतं तितक्याच बहादुरी ने आणि समजदारी ने अगदी फिल्मी स्टाईल मध्ये या विमानातील सर्व प्रवाशांना वाचवण्यात देखील आलं होतं.

१० सप्टेंबर १९७६ चा दिवस उजाडला दिल्लीच्या पालम हवाई विमानतळावरून इंडियन एअरलाइन्सचं बोईंग ७३७ विमान मुंबईसाठी निघालं होतं. ६६ प्रवासी यामध्ये होते. विमानाचे पायलेट होते बीएन रेड्डी आणि त्यांच्यासोबत अजून एक पायलेट होते ते म्हणजे आरएस यादव. सकाळी साधारणतः सात ते साडेसातची वेळ असेल जेव्हा विमानाने उड्डाण केलं. मुंबईला जाताना दोन ठिकाणी स्टॉप घ्यायचे होते एक म्हणजे जयपुर आणि दुसरा औरंगाबाद.

टेक ऑफ केल्यानंतर पायलेटने काही वेळातच ३५ किलोमीटर अंतर पार केलं आणि ८००० उंचीवर गेल्यावर जेव्हा रेड्डी यांचे सह पायलट यादव हे स्वयंचलित मोड म्हणजेच ऑटो पायलट मोड चालू करायला जात होते तेव्हा अचानक दोन लोकं तिथे आले. ज्यांच्या हातात पिस्तूल होती आणि ते पायलेट केबिनमध्ये आले. रेड्डी यांच्या डोक्यावर बंदूक ठेवली आणि विमान चालूच ठेवा असं म्हणत हायजॅक झाल्याची बातमी दिली. अगदी आपण चित्रपटात बघतो तसाच सीन होता.

दोन्ही पायलेट अगदी घाबरून गेले होते. मात्र प्रवाशांचा विचार करत त्यांनी धीर एकवटला आणि यादव यांनी ऑटो पायलट मोड सुरू केला. तसंच दिल्ली एअर ट्राफिक कंट्रोलसोबत संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

एका आतंकवाद्याने त्यांना विमान लिबियाच्या दिशेने वळविण्यास सांगितलं. मात्र यादव यांनी त्यांना सांगितलं की लिबियापर्यंत जाण्यासाठी विमानामध्ये इंधन नाहीये. जास्तीत जास्त जयपुर किंवा परत दिल्लीला जाता येईल. मात्र यानंतर आतंकवाद्यांनी विमान पाकिस्तानच्या कराचीला वळवण्याचा आदेश दिले. मग परत यादव म्हणाले की कराची नाही फक्त लाहोरपर्यंत जाता येईल. 

यादव यांनी अतिशय हुशारीने हा डाव रचला होता, कारण दिल्लीपासून कराचीपर्यंतचं अंतर जवळपास अकराशे किलोमीटर होत तर लाहोर आणि दिल्ली मधील अंतर फक्त ४११ किलोमीटर. म्हणजे दिल्लीपासून लवकर मदत मिळण्याची आशा होती, त्यामुळे त्यांनी लाहोर सांगितलं होतं. लाहोरला इंधन भरून लिबियाकडे जाण्याचा मार्ग आतंकवाद्यांनी निवडला. मात्र दोन्ही पायलेट सोबत असले तर काही गडबड होऊ शकते म्हणून आतंकवाद्यांनी दोघांना दूर केलं.

 रेड्डी यांना तर शौचालयात बंद केलं. मग यादव लाहोरला विमान घेऊन आले. सकाळचे जवळपास साडे आठ वाजले असतील यादव यांनी लाहोर विमानतळाच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलर यांना हकीकत सांगितली आणि विमानतळावर उतरण्याची परवानगी मागितली. घटनेची माहिती मिळताच लाहोर विमानतळावर पण हंगामा सुरू झाला. थोड्याच वेळात लाहोरच्या विमानतळावर विमानाने लँडिंग केलं.

भारताचे प्रवासी आता पाकिस्तानात होते. काहीच वर्षांपूर्वी फाळणी झाली होती, तर १९७१ च्या युद्धाच्या जखमाही अजून ताज्या होत्या. त्यामुळे सगळ्यांमध्ये भीतीचं वातावरण होतं पण हे देखील सत्य होतं की गेल्या चार वर्षांत दोन्ही देशांनी सामंजस्य दाखवत बरेच बदल केले होते. रेल्वे देखील प्रवास सुरू झाला होता.

 तेव्हा भारत सरकारने पाकिस्तान सरकारला फोन करून वैमानिक आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मदत मागितली.

पायलटने जितकं सांगितलं तेवढं इंधन अपहरणकर्त्यांनी भरून घेतलं. सोबतच रेड्डी यांनी शक्कल लढवली, त्यांनी हवाई मार्गाचा नकाशा मागवला, ज्याच्या आधारे लिबियाला जाता येईल. पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना हा इशारा पुरेसा होता. त्यांनी देखील उत्तरात अपहरणकर्त्यांना सांगितलं की लाहोर आंतरराष्ट्रीय विमानतळ नाहीये म्हणून त्यांना नकाशा मागवायला वेळ लागेल आणि तसा वेळ मागून घेतला.

नकाशा येईपर्यंत आणि इंधन भरेपर्यंत संध्याकाळ होत आली. तेव्हा पायलट म्हणाले आता जर रात्री आपण उड्डाण केलं तर अपघात होऊ शकतो. आतंकवादी त्यांच्या बोलण्यात येत होते, त्यांचे प्लॅन यशस्वी होत होते. तर दुसरीकडे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सुद्धा अपहरणकर्त्यांचा विश्वास संपादित केला होता. त्यानुसार त्यांनी सर्वप्रथम अशा यात्रेकरूंना सोडण्याची विनवणी केली जे आजारी आहेत किंवा प्रवासात त्यांची तब्येत खराब झाली आहे. त्यानुसार आतंकवाद्यांनी त्यांना सोडून दिलं.

अधिकाऱ्यांनी आतंकवाद्यांचा पुढचा प्लॅन काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी सांगण्यास नकार दिला. असंच टोलवा टोलवीमध्ये रात्र झाली. रात्री विमान चालवणं धोकादायक असल्याचं आधीच पायलटने सांगितलं होतं. तेव्हा अपहारांकर्त्यांशी अधिकाऱ्यांनी बोलणी केली आणि रात्रीचा मुक्काम लाहोरला ठरवण्यात आला. रात्रीचे जवळपास अडीच वाजले असतील तेव्हा प्रवासी आणि विमानाच्या स्टाफला एअरपोर्टच्या लाऊंजमध्ये नेण्यात आलं. 

मात्र एकाच पायलटला जाण्याची परवानगी दिली तेव्हा रेड्डी म्हणाले की सकाळचा प्रवास लांब असणार तर दोघांची झोप होणं गरजेचं आहे.

अपहरणकर्त्यांचे सगळे डाव पेच फेल होत होते. हताश झालेल्या त्यांनी यालाही परवानगी दिली, फक्त एक विनंती केली की, विमान चालू ठेवावं ज्याने त्यांना एसी असल्याने गर्मी होणार नाही. मात्र पायलट यांनी परत सांगितलं की इंजिन रात्रभर चालू ठेवलं तर गरम होईल आणि सकाळी विमान चालवता येणार नाही. तेव्हा नाईलाजाने अपहरणकर्त्यांना गर्मीमध्ये रात्र काढावी लागणार होती. मग त्यांनी त्यांच्या सरदाराला प्रवाशांसोबत लाऊंजला पाठवलं आणि बाकी विमानातच थांबले.

आतंकवाद्यांनी अधिकाऱ्यांवर विश्वास टाकला होता. अधिकाऱ्यांनी त्याच्या खाण्यापिण्याची सोय केली. दमलेल्या सर्वांनी जोरदार पेटपूजा केली.

काही घंट्यांनी पायलट लोकांना उठवलं गेलं, तेव्हा त्यांना बातमी मिळाली की सर्व अपहरणकर्ते ताब्यात सापडले आहेत. हे ऐकून सर्व जणांनी सुटकेचा निश्वास सोडला. जेव्हा विचारलं की हे कसं केलं तेव्हा समोर आलं की रात्रीच्या जेवणात आणि पाण्यात झोपेच्या गोळ्या मिसळण्यात आल्या होत्या. ज्यामुळे सर्व गाढ झोपी गेले आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या सरदारालाही एकट्यात पकडण्यात आलं.

अशाप्रकारे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सर्वांचा जीव वाचवला आणि ११ सप्टेंबर १९७६ ला विमान परत भारतात आलं. अटक करण्यात आल्यानंतर त्यांनी अपहरणाचं कारण सांगितलं, ते म्हणजे या अतंगवाद्यांना काश्मीरच्या स्वातंत्र्याची मागणी संपूर्ण देशात पोहोचवायची होती. बाकी ते यात्रेकरूंना काहीच करणार नव्हते.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.