दहावी, बारावीत ८० टक्यांच्या वर मार्क पाडण्यासाठी आजच वापरा पाथर्डी पॅटर्न..

सध्या गावागावात आणि चौकाचौकात वातावरण टाईट आहे. या टाईट वातावरणाचं कारण इलेक्शन असलं तरी दूसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे 10 वी 12 वी च्या परिक्षा. झालंय असं की जे बोर्डाचे पेपर देणार आहेत तर तर बिझी आहेतच पण त्यांच्यासोबत कॉपीची रसद पुरवणारे पण मोठ्या प्रमाणावर बिझी आहेत.

निदान आमच्या इथे तर असच वातावरण आहे, कारण मी पाथर्डीचा आहे. आणि आमच्या पाथर्डीत मोहटा देवी, जायभायचा वडापाव, आणि माव्यानंतर नंतर फेमस असण्याचा नंबर लागतो तो पाथर्डीच्या कॉपी पॅटर्नचा.

दरवर्षी हा पाथर्डी पॅटर्न चर्चेत असतो. म्हणूनच म्हणलं बाहेरच्या लोकांना जरा विस्कटून सांगाव की आमचा पाथर्डी पॅटर्न नेमकं कस काम करतो ते. 

अहमदनगर जिल्ह्यातील सगळ्यात शेवटचा तालुका पाथर्डी. हा तालुका कधी राज्याच्या राजकारणात किंवा कोणत्याच घडामोडीत चर्चेत आला नाही. हा तालुका नेहमीच मागास राहिलेला आहे. शेवगांव-पाथर्डी मिळून एक विधानसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे अनेक सुख सोयींपासून हा तालुका वंचित राहिलेला आहे.

मात्र राजकारण्यांनी आपल्या सोयीनं इथल्या गोष्टीचा फायदा घेतला आणि मोठा प्रमाणात शाळा, काँलेज, शिक्षणसंस्था उभारल्या. आत्ता सामाजिक कामात योगदान म्हणून काहीजण उद्दात्त भावनेतून शिक्षणसंस्था चालवणारे असतील. फक्त ते उद्दात भावना जपणारे कोण ते तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही ठरवा.

इतक्या संस्था झाल्यानंतर पास करण्याच्या मुदतीवर लाखो रूपये उकळून बाहेरच्या विद्यार्थ्यांना इथं अॅडमिशन देण्यात आल्या. आणि पास करून देण्याचा नादात इथं या कॉपीच्या भस्मासुरानं पाय रोवले. दोन वर्षापुर्वी मोबाईलवर एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यामध्ये दोन मजली इमारतीच्या खिडकीवर चढून पोरं आतमधल्या विद्यार्थ्यांना काँपी पुरवातांना दिसत होते. अनेक माध्यमांनी यांची दखल घेतली. शिक्षणविभागानं चौकशीचे आदेशही दिले तेवढ्यापुरतं प्रकरण थंड झालं पुढच्या वर्षी पुन्हा तेवढ्याच तेजीनं हा पॅटर्न सुरू झाला.

नेमकी कशी चालते कॉपी…

शाळा काँलेजमध्ये मुळात चांगलं शिकवलं जातं. चांगला अभ्यासही घेतला जातो. मात्र परिक्षेचा काळात मात्र चांगलीच बोंबाबोब उडते. या विद्यार्थ्यांच्या काँपीमागं एक प्रकारची मोठी यंत्रणाच आहे. यामध्ये विद्यार्थ्यी, पालक, मित्र, काँलेजमधील शिक्षक, शिपाई, पोलिस, पाणी वाटणारे मुलं सगळ्यांचाच समावेश आहे. विद्यार्थ्यांना कधी कधी चेक करून परिक्षा हाँलमध्ये सोडलं जातं. मात्र खिडक्यांमधून विद्यार्थ्यांना काॅपी करण्यासाठी रसद पुरवली जाते.

बाहेर पोलिसांचा बंदोबस्त असतो तरीही पोलिसांना मॅनेज करून खिडकीवरून चढून पुस्तक, गाईडच, नोटस देण्यात येतात. वर्गावर असणाऱ्या सुपरवाईजराचाही या गोष्टींना फारसा विरोध नसतो. त्यांच्या डोळ्यादेखत या सगळ्या गोष्टी घडतात. त्यामुळे विद्यार्थी गाईडमधला शब्दं शब्द रट्टावून लिहितात.

मात्र, परिक्षा केंद्रावर तपासणीसाठी एखादं पथक आलं तर तेव्हा मात्र खरी विद्यार्थ्यांची, शिक्षकांची आणि पालकांची ताराबंळ उडते.

त्यावेळी खिडकीतून धडाधड नोटस, गाईडस, पुस्तक खाली फेकली जातात. पाणी वाटणाऱ्या मुलांकडं गाईडस दिली जातात. पाणी वाटणाऱ्या मुलांच्या मार्फंत तपास अधिकारी जाईपर्यंत ती सुरक्षित ठिकाणी लपवली जातात. मुळात पाणी वाटणारे मुलं ही कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे खरे तारणहार असतात. प्रत्येक परिक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना परिक्षेच्या काळात पाणी वाटण्यासाठी खालच्या वर्गातील ठरावीक वर्गातील मुलांची निवड केलेली असते. त्यांना काँलेजमार्फत वॉटरबॉय म्हणून ओळखपत्रही दिलेलं असंत.

त्यामुळे ही मुलं पाणी वाटण्याच्या नावाखाली यांच्यामध्ये फिरत असतात. तपास अधिकारी गेल्यानंतर या मुलांमार्फत कॉपी पुरवल्या जातात. एका काँपीसाठी 50 रू, 100 रू, 200 रू, 300 रू, अशी रक्कम विद्यार्थी किंवा पालक मोजतात. परिक्षेच्या काळात पेपर देणाऱ्या विद्यार्थांच्या खिशात 200 ते 400 रूपये असतात म्हणजे असतातच. त्यामुळे एक वाँटर बाँय दिवसाला 500 ते 1000 रूपये सहज मिळवतो.

गणित आणि इंग्रजी हे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अवघड विषय. त्यामुळे हा पेपर अवघड जाऊ नये किंवा या दिवशी तपास अधिकारी येतोच असा विद्यार्थ्यांचा गैरसमज असतो. त्यामुळे या पेपरला विद्यार्थ्यांसोबत मोठा फौजफाटा येतो. कोणाचा भाऊ, कोणाचा मित्र, कोणाचा पालक, कोणाचा नातेवाईकांमधील हुशार माणूस अशांची हमखास गर्दी या दोन पेपरच्यावेळेस परिक्षा केंद्राच्या बाहेर पाहायला भेटते. काही विद्यार्थ्यांकडं मोबाईल असतो त्यांच्यामार्फत कधी कधी पेपरचा फोटो बाहेर पाठवला जातो.

त्यामुळे तात्काळ त्यातील महत्वांच्या उत्तरांची झेरॉक्स काढून या विद्यार्थ्यापर्यंत पोहचिवण्यासाठी आटापीटा चालतो. बाहेर पोलिसांचा बंदोबस्त असतो मात्र त्यांना चुकवून किंवा मॅनेज करून हे सगळं चालतं. कधी डायरेक्ट खिडकीपाशी पळत जावून कॉपी दिली जाते, कधी झेरॉक्स काढलेल्या कॉपीमध्ये दगड ठेवून ती खिडकीवाटे आत फेकली जाते किंवा खिडकीवर चढून कॉपी पुरवली जाते. प्रत्येक जण आपल्या जिवाच्या आंकाताने यासाठी प्रयत्न करतांना यावेळेस दिसतो. आतल्यापेक्षा बाहेरच्यांचाच यावेळी जास्त कलकलाट असतो.

एखादा शिक्षक, नेता, किंवा मातब्बर व्यक्तींचा मुलगा किंवा मुलगी परिक्षेला बसलेला असेल तेव्हा त्यांच्याकडं विशेष लक्ष दिलं जातं. कधीकधी त्या त्या विषयांचे सर वर्गात येवून प्रश्न पत्रीकेतील MCQ चे उत्तर सांगून जातात, असंही घडतं. त्यामुळे पाथर्डीतील 10 वी 12 वीच्या विद्यार्थी रट्टावून पेपर लिहितात आणि भरमसाठ मार्कानं पास होतात.

त्यामुळे पाथर्डीत बाहेरच्या मुलांची संख्या वाढू लागली. 

पाथर्डी तालुक्यातील शाळा आणि कॉलेजमध्ये बाहेरील जिल्ह्यातील अॅडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. कारण चांगले मार्क पाडतो या हमीवर बाहेरील विद्यार्थ्यांना इथं अॅडमिशन दिली जाते. त्यासाठी ५० हजार ते १ लाख रूपयांच्या घरात रक्कम मोजण्यात येते. वर्षभर काँलेज न करता फक्त फायनल प्रॅक्टीकल परिक्षेचा आणि मेन परिक्षेचा पेपर देऊन चांगल्या मार्कानं पास होण्याची हमी असते.

त्यासाठी श्रीमंत पोरांचे बाप इथं अॅडमिशन घेतात आणि आपल्या पोराला पुणे, मुंबई, औरंगाबाद अशा ठिकाणी चांगले क्लास करण्यासाठी पाठवतात. सध्या तालुक्यात बाहेरील जिल्ह्यातील परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जवळपास ५०० ते १००० च्या घरात असल्याचं समजतंय. यावेळेस हॉटेल आणि लॉज वाल्यांची चंगी होते. वर्षभर जेवढा धंदा होत नाही तेवढा धंदा या एक महिन्यांच्या काळात होतो, असं स्वत: हॉटेलमालकांनी सांगितलं.

मात्र, सगळेच विद्यार्थी असे नाहीत. काही प्रामाणिकपणे वर्षभर अभ्यास करणारे सुद्धा आहेत. पण गव्हासोबत किडेही रगडले जातात ना तसं या प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडतांना दिसंत.

10वी, 12 वीत घसघशीत मार्क पाडल्यानंतर पुढं काय होतं?  

दहावी आणी बारावीच्या पेपरला प्रचंड कॉपी करून चांगले मार्क मिळवले. मात्र अशा या खोट्या मार्काचा खऱ्या आयुष्यात किती फटका बसला याबद्दल मी एका मित्राला विचारलं तेव्हा तो म्हणाला,

मला बारावीला ७० टक्के मार्क पडले. पुण्यातील चांगल्या कॉलेजला अॅडममिशन घेतलं. घरच्यांनींही डोनेशन भरलं. मात्र पायाच कच्चा असल्यानं पहिल्याच वर्षी दांड्या गुल झाल्या. वर्षही वाया गेलं. घरच्य़ांचे पैसेही खर्च झाले आणि तीन वर्षाच्या डिग्रीला पाच वर्ष लागले.

हे असं फक्त माझ्या एकटाच्याच बाबतीत घडलं नाही. माझ्यासारखे असं अनेक आहेत.

कॉपी करून चांगले मार्क तर मिळवता येतात मात्र खऱ्या आयुष्यात थट्टा होते. अपयश येतं. कॉपीच्या नावाखाली अख्खी पिढी बरबाद झालीय. अजूनही होतेय. त्यामुळे हे कुठंतरी थांबायला हवं. पालकांनी याकडं गांभीर्यानं पाहायला पाहिजे. मलई खाणारे तर आपले खिशे भरायला बसलेलेच आहेत. मात्र आपल्या मुलाचं भविष्य खराब व्हायला नको यासाठी पालकांनी आवाज उठवायला हवा, असं या पाथर्डी पॅटर्नमध्ये रगडलेले अनेकजण सांगतात.

हे ही वाचा. 

3 Comments
  1. Krushna ajinath khade says

    बरोबर आहे सर तुम्ही आपल्या पाथर्डीची खरी परिस्थिती मांडली

  2. Shubham Garad says

    खरयं खरयं

Leave A Reply

Your email address will not be published.