ओरिसाच्या रौद्ररूपी फणी वादळाशी लढणारा मराठी IAS अधिकारी.

दोन दिवसांपूर्वी ओरिसात फणी नावाचं वादळ येऊन नुकसान करून गेलं. प्रत्येक वेळी अशी वादळ येतात सरकार, प्रशासन, हवामान विभाग आपापली कामं पार पाडतं. वादळ शमलं जातं.आपत्कालीन व्यवस्था लोकांची गरज पार पाडून सरकारी यंत्रणा परत जाग्यावर येतात आणि सामान्य माणूस दररोजचा दिवस जगण्याच्या  संघर्षाच्या दिशेला लागतो.या फणी वादळाने ओरिसाला परत निसर्गशक्तीची झलक दाखवून परत गेलं. देश नेहमीसारखा दोन दिवसांसाठी सुन्न झाला आणि परत आपल्या जाग्यावर आला..

ओरिसातील या फणी वादळाच्या रौद्ररूपात महाराष्ट्राचा एक मराठी माणूस चर्चेत आला. मराठी माणूस महाराष्ट्राच्या बाहेर टिकाव धरू शकत नाही ही बाब या माणसाने खोटी ठरवली. तो माणूस IAS आहे. त्यांचं गाव आहे अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण म्हसोबा आणि नाव आहे विजय अमृता कुलांगे – जिल्हाधिकारी गंजाम ओरिसा

विजय कुलांगे हे ओरिसातील 40 लाख लोकसंख्या, 23 तालुके, 13 आमदार व 2 खासदार आणि 3 मोठ्या नद्यांचा समावेश आणि विशेष बाब म्हणजे ओरिसाच्या मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असणाऱ्या गंजाम या ओरिसातील सर्वात मोठ्या जिल्ह्याचे सध्या जिल्हाधिकारी आहेत.

जायचं होतं एमबीबीएसला पण पैशाची अडचण, यामुळे डीएड होऊन शिक्षक झालेले विजय कुलांगे हे 2001 मध्ये एमपीएससी मधून सहाय्यक विक्रीकर निरीक्षक झाले त्यानंतरच्या एमपीएससी परीक्षेत ते राज्यात दुसरे आले पण उपजिल्हाधिकारी पदाची एकही जागा नसल्याने त्यांची तहसीलदारपदी नियुक्ती झाली.

2010 साली जामखेडला तहसीलदार असताना त्यांनी अतिक्रमण, वाळू तस्करी, स्त्री भ्रूण हत्या याच्यात धडाक्याने कामं केली, शिवार रस्ते आणि राजस्व अभियान याच्यात जामखेड तालुका राज्यात प्रथम आला होता आणि त्यांना त्यावेळी “आदर्श तहसीलदार” म्हणून गौरविण्यात आले होते या तहसीलदारांची आठवण जामखेड तालुका आजही काढतो. 

ज्या आयुष्याच्या स्वप्नंसाठी 7 वर्षाचा संघर्ष सुरू होता ते स्वप्नं 2011 साली सत्यात उतरले आणि पैशाच्या अडचणीमुळे डी. एडला जाऊन शिक्षक झालेला आणि नंतर एमपीएससीतुन अधिकारी होणारा हा बंधावरचा तरुण यूपीएससी उत्तीर्ण होऊन IAS म्हणजेच जिल्हाधिकारी झाला.

गावाची कपडे शिवण्यात आयुष्य गेलेल्या टेलरांचा आणि दुसऱ्याच्या शेतात काम करणाऱ्या माऊलीचा हा मुलगा ज्यावेळी जिल्हाधिकारी झाला त्यावेळी नगर जिल्हा आणि या तरुणाचा प्रवास माहिती असणारा प्रत्येकजण मनातल्या हुंदक्यांना आवरत अभिमानाची झालर घेऊन आनंद व्यक्त करत होता.

मसुरीतील ट्रेनिंग संपवून हा माणूस ओरिसा राज्याच्या सेवेत दाखल झाला. मराठी माणसाची ऊर्जा काय असते याची झलक ओरिसा राज्याला दाखवली. मग ती बोनाईला उपजिल्हाधिकारी असताना की संबलपूरला असताना असो. संबलपूरला अतिरिक्त आयुक्त असताना केलेली अतिक्रमण माहीम, ड्रेनेज आणि स्वच्छतेची कामे संबलपूर आणि बोनईवासीयांना कायम विजय कुलांगे नावाची आठवण देत राहतील.

सध्या ते गंजाम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत. येथे अतिक्रमण मोहीम, स्वछता मोहीम, डिजिटल स्कुल, मनेरगा, व आदिवासींच्या विकासासाठी अभिनव उपक्रमांची उभारणी सुरू आहे. फणी वादळात विजय कुलांगे यांची ताकद ओरिसा सरकारने आणि प्रशासनाने अनुभवली. यांच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या पाच तालुक्यातील 10 लाख लोकांना वादळाचा फटका बसणार होता.

वादळाची पूर्वसूचना घेऊन विजय कुलांगे यांनी जिल्हा यंत्रणा कामाला लावली आणि वादळाला भिडण्याची मोहिम सुरू झाली गुरुवार, शुक्रवार दोन दिवस वादळाने तडाखा दिला पण गंजाम जिल्ह्याला काहीही होऊ दिलं नाही.

गुरुवारी 3 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 100 च्या आसपास गर्भवती महिलांच्या सुरक्षेची काळजी, लहान बालके आणि वृद्ध यांच्या जीवांची जबाबदारी 3 दिवस कॅप्टन म्हणून विजय कुलांगे यांच्या खांद्यावर होती ती समर्थपणे पेलली. कुठेही जीवितहानी नाही, दळणवळण यंत्रणा विस्कळीत नाही, आणि सुरक्षित नागरिक आणि जिल्हा असं वार्तांकन ज्यावेळी समोर आलं त्यावेळी लोकांच्या सेवेची भावना आयुष्याचं सार्थक करते.

निवडणुकांचा सिझन सुरू होता, त्यात राज्याचे लक्ष आपल्या जिल्ह्यावर कारण बिजू पटनाईक यांचा जिल्हा , लोकसभा निवडणुकीच्या व्यस्ततेत थकलेलं प्रशासन, आणि अश्यातच अंगावर आलेलं फणी वादळ हे सगळं लीलया पेललं एका माणसाने, एका मराठी युवकाने, भारतभर पसरलेले मराठी अधिकारी आज त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करतायत, मराठी माणूस कुठेही आव्हाने पेलू शकतो आणि जिंकून दाखवू शकतो.ही ताकद आणि ऊर्जा आहे मराठी मातीची आणि मराठी अभिमानाची.

हा मराठी माणूस “आजचा दिवस माझा” या तत्वावर लोकांसाठी, देशसेवेसाठी नेहमीच तत्पर असतो, मसुरीच्या ट्रेनिंगमधून बाहेर पडताना घेतलेली शपथ सतत ओठांवर असते त्या शपथेला जागण्याचं आणि मराठी मातीच्या अभिमानाचा झेंडा रोवण्यासाठीचा  सततचा ध्यास असणारी ही माणसं महाराष्ट्राचा अभिमान आहेत..राज्याच्या कौतुकाचा पताका देशभर रोवणारी आहेत. या मराठी माणसाची दखल ओरिसातील लोकांनी, प्रशासन आणि सरकारने घेतली.  आणि पाठीवर थाप टाकताना ओरिसा प्रशासनाच्या मुख्य सचिवांनी शब्द उच्चारलेे,

“वेल डन विजय”

IAS विजय कुलांगे यांचे “आजचा दिवस माझा” हे पुस्तक प्रेरणादायी आहे.

  • संदीप तिकटे

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.