स्वातंत्र्यलढ्यात तोफेच्या तोंडी गेलेले देशातील पहिले पत्रकार.

एकोणिसाव्या शतकातील वृत्तपत्रांचं देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठं योगदान राहिलेलं आहे. त्या काळात पत्रकारिता केली जायची तीच राष्ट्रीय कार्याच्या उद्देशाने. इंग्रज सरकार विरोधात लोकांची जनजागृती करण्यासाठी आणि सामाजिक तसेच राजकीय सुधारणांसाठी अनेकांनी आपली लेखणी झिजवल्याचा तो काळ होता. पत्रकारिता हे त्या काळात प्रोफेशन नाही तर मिशन होतं. याच काळात एक असा माणूस होऊन गेला ज्याला सरकारविरोधी लिखाणासाठी इंग्रज सरकारने मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती. मौलवी मोहम्मद बाकीर देहलवी असं या माणसाचं नांव.

मौलवी मोहम्मद बाकीर हे देशातील पहिले आणि शेवटचे पत्रकार होते जे स्वातंत्र्यलढ्यातील आपल्या सहभागामूळे इंग्रजांच्या रोषास बळी पडून मातृभूमीसाठी शहीद झाले.

आर्थिकदृष्ट्या संपन्न असणाऱ्या घरातून येणारे मौलवी त्याकाळात विद्वान म्हणून ओळखले जात असत. त्यांना फारसी, अरबी, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी भाषांचं ज्ञान अवगत होतं. लेखणी घेऊन स्वातंत्र्यलढ्यात उतरण्यापूर्वी त्यांनी सरकारच्या आयकर विभागात तहसीलदार म्हणून काम केलेलं होतं. पण या कामामध्ये त्यांचं मन रमलं नाही आणि शेवटी त्यांनी वर्तमानपत्र सुरु करण्याचा निर्णय घेतला. हेच वृत्तपत्र पुढे उर्दू पत्रकारितेच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरलं.

मौलवी बाकीर यांनी १८३७ साली दिल्ली येथून ‘उर्दू अखबार दिल्ली’ नावाचं उर्दू वर्तमानपत्र सुरु केलं होतं. भारतीय जनतेमध्ये सामाजिक आणि राजकीय जनजागृतीसाठी काम करणारं हे देशातलं पहिलच वृतपत्र होतं. एक मिशन म्हणूनच हे वृत्तपत्र सुरु करण्यात आलं होतं. वृत्तपत्रातून आपल्या अतिशय तिखट आणि जहरी शब्दांनी मौलवी इंग्रजी सत्तेवर वार करत असत. इंग्रजांच्या भारतातील अन्याय आणि अत्याचारांवर तसेच त्यांच्या वसाहतवादी धोरणांवर उघडपणे कठोर टीका करत असत.

feat

१८५७ चा उठाव मोडून काढण्यासाठी हिंदू-मुस्लीम अशी फुट पाडता यावी यासाठी इंग्रजांकडून दिल्लीतील जामा मशिदीसमोर धार्मिक दंगे घडून येतील अशा प्रकारचे पोस्टर लावण्यात आले होते. या पोस्टरच्या माध्यमातून मुस्लीम समाजाला हिंदूंविरोधात भडकावण्यात येत होतं. हा एक मोठ्या षड्यंत्राचा भाग होता. मौलवींनी ही गोष्ट हेरली आणि आपल्या वृत्तपत्रातून इंग्रजांचं षड्यंत्र लोकांसमोर आणलं. संभाव्य हिंदू-मुस्लीम फुट टाळण्यात त्यांची मोठी भूमिका राहिली होती.

१८५७ च्या उठावात त्यांनी अतिशय प्रखर भूमिका घेतली होती. उठावाला पाठींबा देण्यासाठी त्यांनी वृत्तपत्राचे नांव बदलून क्रांतिकारकांचे नेते बहादूर शाह जफर यांच्या नावावरून ‘अखबार उज जफर’ असं केलं होतं. उठावात सामील असलेल्या आंदोलकांवर इंग्रजांकडून करण्यात येणाऱ्या अन्याय अत्याचारांची तपशिलावर वर्णनं वृत्तपत्राच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्यात येत होती. जनतेमध्ये इंग्रजी सत्तेविरोधात आक्रोश निर्माण करण्यात या रिपोर्टिंगने महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.

इंग्रजांना ज्यावेळी १८५७ चा उठाव संपूर्णतः मोडून काढण्यात यश आलं त्यावेळी उठावात सहभागी असणाऱ्या अनेकांसह मौलवी बाकीर यांना देखील इंग्रजांनी ताब्यात घेतलं. तुरुंगात त्यांचा मोठ्या प्रमाणात छळ करण्यात आल्यानंतर १६ सप्टेबर १८५७ रोजी इंग्रज शासक स्टीफन हडसन याने मौलवी बाकीर यांच्यावर कुठलाही खटला न चालवता त्यांना थेट मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. दिल्ली गेटसमोरील खुल्या मैदानात त्यांना तोफेच्या तोंडी देण्यात आलं. भारतीय पत्रकारितेच्या आणि स्वातंत्र्यलढ्याच्या देखील इतिहासातील एक क्रांतिकारी पर्व अशा पद्धतीने संपुष्टात आलं.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.