देवभूमी केरळवर ‘देवच’ रुसलाय का..?

केरळ.

भारतातील एक छोटंस राज्य. निसर्गसौंदर्याने नटलेल्या या राज्याची ओळख ‘देवभूमी’ अशी आहे. नारळ, रबर, माडाची उंचच उंच झाडे, चहा-कॉफीचे मळे, बारा वर्षातून एकदाच फुलणारे ‘निलकुरंजी’ फूल  (ज्यावरून निलगिरी पर्वताचे नाव पडले) आणि सर्वात महत्वाचं म्हणजे  सर्वांना छाया देणारा पश्चिम घाट.

अगदी रोमन कालखंडापासून जगभर प्रसिद्ध असणारे पश्चिम घाटावर पिकवले जाणारे मसाले म्हणजे तर निसर्गाचा विलोभनीय असा शृंगारच. ही देवभूमी म्हणजे भारताचे ‘पश्चिमेकडील प्रवेशद्वार’ आहे. ख्रिश्चन धर्माचा भारतातील प्रवेश केरळमधूनच झाला. भारतातील पहिले चर्च देखील याच ठिकाणी उभारण्यात आले. फक्त परकियांचाच नाही तर मान्सूनचा भारतामधील प्रवेश देखील येथूनच होतो.

flud images

आज मात्र या देवभूमीत मान्सून नकोसा झाला आहे. जुलैच्या शेवटच्या आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाने केरळमध्ये हाहाकार माजवलाय. आतापर्यंत तीन लाख लोक निर्वासित झालेत, तर तीनशेपेक्षा अधिक लोकांचा या प्रलयात मृत्यू झालाय. ज्या केरळच्या बाबतीत ‘मान्सून बघायचा असेल तर केरळला जा’ असे म्हटले जाते, त्याच केरळमधील लोकांना मान्सूनमुळे निर्वासित व्हायची वेळ का यावी ?

भारतीय हवामान विभागानुसार केरळमध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये इडुक्की आणि वायनाड या जिल्ह्यात सरासरीपेक्षा ३१६ % अधिक पाऊस झाल्याने ही परिस्थिती निर्माण झालीये. तब्ब्ल २६ वर्षानंतर इडुक्की धरणाचे सर्वच्या सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे काही कळायच्या आतच लोकांच्या घरामध्ये पाणी शिरले. परंतु स्थानिक नागरिकांच्या मते, त्यांच्या घरांमध्ये पाणी शिरण्यास वरूणदेवाची अवकृपा नाही तर ‘मानवी लालसा’ कारणीभूत आहे.

ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सण २०११ मध्येच आपल्या अहवालात अशा महापुराचा धोका वर्तवला होता. आज ज्या गावांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे, ती सर्व गावे पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्रामध्ये येतात. गाडगीळ आणि कस्तुरीरंगन या दोन्ही समित्यांनी जैवविविधतेने नटलेल्या या क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारच्या बांधकामास प्रतिबंध केला होता.

आज याचठिकाणी असलेल्या बांधकामांमुळे नैसर्गिक जलप्रवाहात अडथळे निर्माण होत आहेत. खाणकामांमुळे जमिनीची जलधारण क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरता वाहत जाऊन नदीमध्ये जमा होत आहे.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार इडुक्की धरण भरण्यास सरासरी दोन महिने लागत असत. परंतु अलिकडील काही वर्षात ते धारण दोन आठवड्यातच भरत आहे. याचं मुख्य कारण म्हणजे मानवी हस्तक्षेपामुळे पाणी जमिनीत न जिरता नदीत येते. हा प्रलय येण्यास निसर्गापेक्षा मानवच अधिक कारणीभूत आहे.

पूराची तीव्रता आणि झालेला विध्वंस पावसामुळे नसून भुस्खलनामुळे वाढला आहे. गाडगीळ यांच्या अहवालामध्ये केरळमधील पश्चिम घाटातील १७०० बेकायदेशीर खाणींना प्रतिबंध करण्याची सूचना होती. परंतू या सूचनेकडे साफ दुर्लक्ष करण्यात आलं.

पर्यावरणीय नियमांच्या  उल्लंघनाचे उत्तम उदाहरण म्हणजे प्रतिबंध असताना देखील केरळ पर्यटन विभागाने इडुक्की धरणाच्या १०० मीटर क्षेत्रात बांधलेले पर्यटन निवास. हे फक्त एक प्रातिनिधिक उदाहरण. अशी अनेक बांधकामे पूरमैदानात झालेली आहेत.

मानवी अर्थलालसेचा फटका केरळमधील सर्वसामान्य जनतेला बसला आहे. सरकारी माहितीनुसार आतपर्यंत सुमारे आठ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आजूबाजूला पाणीच पाणी असताना पिण्यासाठी मात्र शुद्ध पाणी उपलब्ध नाही. संकटात अडकलेल्या माणसांना तर शेवटी मदत मिळाली, पण मुक्या जनावरांचं काय ? पूराचा सर्वाधिक फटका वन्यजीवांना बसला आहे.

donation apeal

केरळने केंद्र सरकारकडे १२०० कोटींची मदत मागितली आहे. सध्यातरी केंद्राने ५०० कोटी रुपये केरळसाठी मदत म्हणून जाहीर केली आहे. केंद्राबरोरच अनेक राज्य सरकारे आणि स्वयंसेवी संस्थांनी देखील आपापल्या परीने केरळसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. वैयक्तिक पातळीवर अनेकजण आपल्याला जमेल त्याप्रकारे मदत करत आहेत.

आम्हीसुद्धा ‘बोलभिडू’च्या वाचकांना आवाहन करतो की ज्यांना कुणाला शक्य असेल त्या सर्वांनी  ‘Kerala Chief Minister Flood Relief Fund’च्या उभारणीत हातभार लाऊन  केरळवासीयांना मदत करावी.

तात्काळ मदत गरजेची आहेच परंतू मूळ प्रश्नाचा देखील गांभीर्यपूर्वक विचार व्हायला हवा. केरळच्या देवभूमीतील मानवी चुका जोपर्यंत दुरुस्त होत नाहीत, तोपर्यंत अशा प्रकारच्या संकटांचा सामना आपल्याला वारंवार करायला लागणार आहे.

केरळच काय महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या राज्यांनी देखील गाडगीळ समितीचा अहवाल स्वीकारलेला नाही. केरळमध्ये निर्माण झालेली आजची परिस्थिती उद्या आपल्याकडे देखील  उद्भवू शकते. केरळच्या  घटनेतून काही धडा घ्यायचाच असेल तर स्थानिकांना विश्वासात घेऊन शास्वत विकासाचा मार्ग अवलंबवा लागेल. तरच देवभूमीतील देवाचं वास्तव्य परत एकदा पावन होईल !

– जयंत इंगळे

 

Leave A Reply

Your email address will not be published.