शरद पवारांच्या व्हायरल व्हिडीओ मागचं किल्लारी ! 

शरद पवारांचा किल्लारी भूकंपादरम्यानचा मदत व पुर्नवसन करत असतानाचा एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. तो व्हिडीओ आपल्यापर्यन्त पोहचलाच असेल. नसेल तर तो खाली दिलेलाच आहे. तर या व्हिडीओत शरद पवार प्रशासनाला आदेश देत आहेत. मदत कशी करावी, गावात खाण्यापासून ते निवारा, आरोग्य यांबाबत ते सल्ला देतायत. आणि पुन्हा प्रश्न निर्माण होतोय काय होती त्या दिवसाची परिस्थिती.

व्हिडीओच्या निमित्ताने जाणुन घेवुया ! कसे धावले होते राजकारणी आणि प्रशासन? 

शरद पवार सांगतात, 

“त्या रात्री अनंत चतुर्दशी होती. विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडण्याचा तणाव प्रशासनावर होता. तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री मीच असल्याने रात्रभर मिरवणुकांचा आढावा घेत होतो. रात्री तीन साडेतीन वाजता मी मिरवणुक शांततेत पार पडल्याने निर्धास्तपणे झोपण्यासाठी गेलो. झोपलो तोच काही मिनटात हादरे जाणवू लागले. वर्षा बंगल्याच्या काचा हलण्यापर्यन्त हा मोठ्ठा धक्का होता. तात्काळ मी कोयनानगरच्या भूकंपमापन केंद्राला फोन लावला. सर्वसाधारण महाराष्ट्रात भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनेच्या आसपासच असायचा. त्याच वेळी मला अधिकाऱ्यांनी सांगितलं भूकंपाचा केंद्रबिंदू लातूरजवळ आहे !”

भूकंपाचा केंद्रबिंदू लातूर होता !  

न पटणारी अशीच गोष्ट होती ती. लातूर भागातच काय भारताच्या दख्खनच्या पठारावर कुठेही भूकंपाची नोंद नसताना लातूरमध्ये 6.4 रिश्टर स्केलचा धक्का जाणवला होता. तात्काळ शरद पवारांनी सचिव व स्वीय सहाय्यकांना उठवलं. लातूरला जाण्यासाठी कोणत्याही परस्थिती सकाळी ७ वाजता विमान सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले. मुख्यमंत्री सकाळीच लातूरला पोहचत आहेत असा आदेश कसातरी वायरलेसवरुन पोहचवण्यात आला. 

सकाळी ७.४० ला शरद पवारांचा ताफा लातूरला पोहचला. किल्लारी गावाची माहिती शरद पवारांना असल्याने तात्काळ गाड्यांचा ताफा किल्लारी गावात पोहचला. तिथं जे दिसलं त्याबद्दल शरद पवार लिहतात, 

“तिथे जावून पाहतो तर, गावातील सारी घरे जमिनदोस्त झाली होती. ढिगाऱ्याखालून माणसांच्या कण्हण्याचे आवाज येत होते. अनेकजण झोपेतच मृत्यूच्या दाढेत सापडले होते. काही अडकलेले मृतदेह आम्ही आमच्या हातानेच बाहेर ओढून काढले. तोपर्यन्त आणखी माहिती समजली आणि भूकंपाचा तडाखा बऱ्याच भागात बसल्याचं लक्षात आलं. पार उस्मानाबादच्या गावांपर्यन्त आम्हाला हेच चित्र दिसत होतं” 

पहिला प्रश्न होता तो निवाऱ्याचा ! 

परिस्थितीचा अंदाज घेतल्यानंतर प्रशासनापुढे पहिला प्रश्न होता तो बेघर झालेल्या लोकांचा. भूकंपानंतर पाऊस सुरू झाला होता. एखाद्या छताखाली उभा राहण्यासारखी देखील अवस्था नव्हती अशा वेळी माणसं कुठं थांबणार कुठे राहणार हा प्रश्न होता आणि तो देखील दिवसभरात सोडवायचा होता. 

शरद पवारांनी लातूर, उस्मानाबाद बरोबरच परभणी, जालना, बीड, औंरगाबाद, नांदेड इथल्या जिल्हाधिकाऱ्यांना, उपजिल्हाधिकाऱ्यांना व संबधित अधिकाऱ्यांना तात्काळ पाचारण केलं. प्रत्येकाकडे गावांची जबाबदारी देण्यात आली. आजूबाजूच्या ठिकाणावरुन बांबू ,कळकं, पत्रे विकणाऱ्यांकडून त्यांच सामान ताब्यात घ्यावं असं सांगण्यात आलं ते ही मोबादला देवून ! 

मात्र इतकं सामान पुरेसं नव्हतं तेव्हा शरद पवार यांनी त्यांचे पुण्याचे मित्र विठ्ठल मणियार यांना पुण्याच्या टिंबर मार्केटमधून जे मिळेल ते पाठवण्यास सांगितलं अशीच मदत ठिकठिकाणावरुन मिळत तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्यात आली. 

याच सोबत लोकांच्या भूकेचा प्रश्न देखील होता. ठिकठिकाणी अन्नछत्र उभारण्यात आली. वैद्यकिय पथकाने आपली जबाबदारी संभाळलीच होती. एकुणात ४८ तासांमध्ये सुरक्षीत वातावरण निर्माण करण्याचं विक्रमी काम करण्यात आलं होतं. 

पुढील पंधरा दिवस शरद पवारांचा मुक्काम सोलापूरमध्येच होता. शरद पवार स्वत: मदतकार्यात गुंतल्याने वातावरण पहिल्यासारखं होण्यास मदत होत होती. यावेळी दूसरा सर्वात मोठ्ठा प्रश्न होता तो मृतदेहांच काय करायचं ! आपल्याकडे मृतदेहाच्या विधीसोबत धार्मिक विधींच महत्व किती आहे ते शरद पवारांना चांगल माहित होतं त्यामुळेच शरद पवारांनी अशा वेळी कोणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेण्याचे आदेश दिली. प्रत्येकाची ओळख पटवून त्या मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी घेण्यात आली. 

याच दरम्यानचा एक किस्सा शरद पवार सांगतात, 

ते म्हणतात, एक दिवशी पहाटेच्या सुमारास एका गावातून जात होतो. एका बैलगाडीत कुणीतरी झोपलेलं होतं. कोण आहे अशी मी चौकशी केली, तेव्हा ते उपजिल्हाधिकारी असल्याचं सांगण्यात आलं. सकाळपासून मध्यरात्रीपर्यन्त अथक काम करुन ते बैलगाडीतल्या पोत्यावर झोपून गेले होते.” 

शरद पवार व्हिडीओत सांगतात, मी एक दिवसासाठी मुंबईत गेलो लोकांनी ३० कोटी दिले, सकाळी एक तासासाठी पुण्यात गेलो लोकांनी साडेसात कोटी दिले. 

ते पैसे देखील अभिनव पद्धतीने गुतंवण्यात आले ते कसे तर , तेव्हा केंद्रिय अर्थमंत्री म्हणून डॉ. मनमोहन सिंग कारभार पहात होते.

जागतिक बॅंकेशी चर्चा करुन तात्काळ कर्ज संमत करण्यात आलं. राज्याबरोबर देशभरातून मदतीचा ओघ चालू झाला होता तेव्हा, शरद पवारांनी निर्णय घेतला की लोकांचा पैसा मुदतठेव योजनेत गुंतवायचा आणि त्या व्याजातून जागतिक बॅंकेच कर्ज फेडायचंय. यामुळे जागतिक पातळीवर देखील भारताची पत वाढण्यास फायदाच झाला. 

Screen Shot 2018 09 08 at 12.41.59 PM
social media

शेवटच्या वाक्यात शरद पवार म्हणतात, आपल्याला २० हजार घरं बांधायची आहेत, 

त्यासाठी शरद पवारांना IIT रुरकीमधून तज्ञांना बोलवलं होतं. भूकंपक्षेत्रात कुठे नुकसान झालं व पुन्हा घरे बांधण्यात आल्यानंतर नुकसान होणार नाही याची काळजी घेवून ठिकाण निश्चित करण्यात आली. यामध्ये चावडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा यांचा आराखडा ठरवण्यात आला. जातिनिहाय घरांची रचना होणार नाही याची काळजी घेण्यात आली. आराखड्यातून रचना निवडण्याची मोकळीक गावकऱ्यांना देण्यात आली. 

किल्लारी त्या दूखातून बाहेर काढण्यात आलं त्यामुळेच शरद पवारांवर गुजरातच्या भूकंपानंतर देखील राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची जबाबदारी सोपवण्यात आली. 

किल्लारीसारख्या आपत्तीत एक महत्वाची गोष्ट महाराष्ट्राने शिकली आणि त्या गोष्टींचा आपणास अभिमान वाटायलाच हवा तो म्हणजे, या घटनेचं कोणत्याही राजकिय पक्षाने भांडवल केलं नाही. राजकारण केलं नाही. सर्व पक्ष, सर्व संघटना आपल्या घरातली आपत्ती म्हणून धावून आल्या म्हणून या दुखात देखील लढलेल्या प्रत्येकाचच योगदान महत्वाचं वाटतं.  
Leave A Reply

Your email address will not be published.