बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री कसे झाले हे कोडं लोकांना अजून सोडवता आलेलं नाही..
सोलापूरचे तुळशीदास जाधव म्हणजे स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य व्यक्तिमत्व. गोऱ्या सैनिकांपुढे गोळ्या घाला पण डोक्यावरची गांधी टोपी काढणार नाही अशी गर्जना करणारा हा धाडसी नेता.
१९४२ सालच्या गांधीजीनी पुकारलेल्या छोडो भारत आंदोलनात महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अनेक तरुण तुळशीदास जाधवांच्या नेतृत्वाखाली चळवळीत एकत्र आले.
यातच एक जण होता सातारचा बाबासाहेब भोसले.
वडील प्राथमिक शिक्षक पण सत्यशोधक चळवळीचे अनुयायी. कोल्हापूरच्या शहाजी कॉलेजमधून कायद्याच शिक्षण घेतलेल्या बाबासाहेब भोसलेनी वडिलांचा सत्यशोधकी वारसा पुढे चालू ठेवला.
या हुशार तरुणावर स्वातंत्र्यसेनानी तुळशीदास जाधव यांचा जीव होता. त्यांनी आपल्या लेकीच लग्न त्यांच्याशी गांधीवादी पद्धतीने लावून दिल. त्या आधी तुळशीदास जाधव ब्रिटीशांच्या जेलमध्ये असताना त्यांच्या समोर कलावती आणि बाबासाहेब भोसले यांचा साखरपुडा झाला होता. स्वातंत्र्यानंतर आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी बाबासाहेब भोसले इंग्लंडला गेले.
इंग्लंडहून परत आल्यावर त्यांनी वकिलीची प्रॅक्टीस सुरु केली. स्वातंत्र्यानंतर तुळशीदास जाधव यांनी कॉंग्रेस सोडून केशवराव जेधे, शंकरराव मोरे यासाथीदारांच्या सह शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. पुढे काही वर्षांनी ते कॉंग्रेसमध्ये परतले. त्यांनी नांदेडमधून खासदारकीची निवडणूक लढवली व निवडून देखील आले.
तोपर्यंत आपल्या उच्च न्यायालयातील चांगल्या चाललेल्या वकिलीला सोडून बाबासाहेब भोसलेंनी देखील सक्रीय राजकारणात प्रवेश केला होता.
ते साताऱ्याच्या खटाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष, सातारा जिल्हा काँग्रेसचे खजिनदार म्हणून कार्य केले आणि पुढे ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (इं.) कमिटीचे सचिव झाले (१९७८). त्यावर्षी त्यांना विधानसभेच मुंबईच्या नेहरूनगर मतदारसंघातून तिकीट मिळालं. त्यात त्यांचा पराभव झाला मात्र परत १९८०च्या निवडणुकीत ते निवडून आले.
त्यांची वर्णी बॅरीस्टर अंतुलेंच्या मंत्रीमंडळात कायदा मंत्री म्हणून झाली.
आणीबाणीनंतरच्या पराभवातून परत आलेल्या इंदिरा गांधीनी सर्व राज्यात आपल्या मर्जीचे मुख्यमंत्री बसवलेले. इंदिराजींच्या कृपेने सत्तेत आलेल्या मुख्यमंत्र्यांना लोकाधार नव्हता. राज्यात कॉंग्रेसमध्ये वसंतदादा पाटील हे सर्वोच्च व ताकदवान नेते होते मात्र इंदिरा गांधीनी त्यांना मागे ठेवून अन्तुलेना संधी दिली होती.
अंतुलेंच्या कारभारावर अनेकजण असंतुष्ट होते पण जेव्हा सिमेंट घोटाळ्यात त्यांचं नाव आल तेव्हा राज्यातील सगळ्या नेत्यांनी जोर धरला व अन्तुलेना राजीनामा द्यायला भाग पाडलं.
तेव्हा सगळ्यांचा अंदाज होता की आता तरी वसंतदादांना इंदिरा गांधी मुख्यमंत्री करतील. येत्या सरकारात मंत्रीमंडळात संधी मिळावी म्हणून अनेकजण श्रेष्ठींची मनधरणी करण्यासाठी दिल्लीच्या वारीला आले होते. वसंतदादा, प्रतिभा ताई पाटील हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार देखील दिल्लीत तळ ठोकून बसले होते.
तुळशीदास जाधव यांना काळजी होती की आपल्या जावयाला पुढच्या मंत्रीमंडळात स्थान मिळेल की नाही. अंतुलेंच्यावर सगळे नेते चिडून होते. मग अंतुलेंचा माणूस म्हणून बाबासाहेब भोसलेना पुढचा मुख्यमंत्री आपल्या मंत्रीमंडळात घेणार नाही. असे घडू नये म्हणून हा जेष्ठ नेता दिल्लीला मोठ्या नेत्यांच्या भेटीला आला होता.
“कसेही करा पण बाबासाहेबांना मंत्रीमंडळात ठेवा, त्यांना काढून टाकू नका”
एवढीच विनंती ते तिथल्या नेत्यांना करत होते. स्वातंत्र्यसेनानी तुळशीदास जाधव यांना दिल्लीतही लोक ओळखायचे, त्यांच्या त्यागाबद्दल कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनाही आदरच होता. पण बाबासाहेब भोसलेंच मंत्रीपद टिकणं अवघड होतं.
जेष्ठ पत्रकार अशोक जैन यांनी आपल्या राजधानीतून या पुस्तकात ही आठवण सांगितली आहे.
२४, अकबर रोड या कॉंग्रेस कार्यालयाच्या बाहेर महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्रीपदाची घोषणा होणार होती. तो भारत बंदचा दिवस होता तरीही पत्रकारांनी तिथे गर्दी केली होती. महाराष्ट्राचे प्रभारी जी.के.मुपणार हे इंदिरा गांधीना भेटायला गेले होते.
कॉंग्रेस कार्यालयात जमलेल्या नेत्यांच्या गर्दीमध्ये तुळशीदास जाधव देखील होते. तिथल्या व्हरांडयामध्ये अस्वस्थपणे ते चकरा मारताना दिसत होते.
मुपणार आले. पत्रकारांनी त्यांना गराडाच घातला. प्रश्नांचा मारा सुरु केला. मुपणार यांना मुख्यमंत्र्याच नावचं आठवत नव्हत. त्यांनी आपल्या खिशातील महाराष्ट्राच्या आमदारांची यादी बाहेर काढली. त्यात एका नावापुढे पेन्सिलने रेघ ओढलेली होती. नाव होतं,
“बाबासाहेब भोसले”
सगळ्या पत्रकारांना आश्चर्याचा झटका बसला. अनेकांना माहितीच नव्हतं हे बाबासाहेब भोसले कोण. ते सातारा जिल्ह्यातील आहेत हे कळाल्यावर लोक म्हणाले,
“इंदिरा गांधीना सातारच्या छत्रपती घराण्यातील अभयसिंहराजे भोसलेना निवडायच होतं पण गैरसमजातून त्यांनी बाबासाहेब भोसलेना निवडलं असाव”
सगळ्यात मोठा धक्का तुळशीदास जाधवांना बसला होता. जावयाच मंत्रीपद टिकवण्यासाठी ते दिल्लीला आले होते, त्याला कधी मुख्यमंत्रीपदावर बसलेलं पाहता येईल हे त्यांनी कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं. पण ते प्रत्यक्षात घडून आल.
अस म्हणतात की जातीची समीकरणे सांभाळण्यासाठी इंदिरा गांधीना मराठा मुख्यमंत्री करायचा होता पण वसंतदादांसारखा डोईजड होईल असा नेता नको होता.
अंतुलेंनां देखील जाता जाता आपल्या शब्दात राहिल असा माणूस त्यापदावर हवा होता. त्यांनी बाबासाहेब भोसलेंच नाव पुढ केलं. इंदिराजींना ही फर्ड इंग्रजी बोलू शकतो व कायद्याचा अभ्यासू आहे या मुद्द्यावर बाबासाहेब भोसलेनां मुख्यमंत्री केलं.
हे ही वाच भिडू.
- मुख्यमंत्री पद गेल्यावर ते म्हणाले, माझ्या नावाच्या मागे कायमचं माजी मुख्यमंत्री तरी लागलं .
- वसंतदादांच्या या निर्णयामूळं काँग्रेस नेत्यांची पोरबाळं राजकारणात आली
- या चौघींना मुख्यमंत्री बनण्याची संधी चालून आली होती पण