धर्मवीर आनंद दिघे यांना एकनाथ शिंदे एवढं का मानतात?

महाराष्ट्राचे ३० वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेत आहेत. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. आठवड्याभरापासून चालू असलेलं बंड, उद्धव ठाकरेंनी दिलेला राजीनामा हा प्रवास शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावर येवून थांबला.

एकनाथ शिंदेंनी जेव्हा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शपथ घेतली. तेव्हा त्यांनी आपल्या शपथविधीची सुरवातच,

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना वंदन करून व धर्मवीर आनंद दिघे साहेबांना स्मरण करून अशी शपथ घेतो”

अशी केली. आजही ते बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच स्मरण करुन शपथविधी घेतली.

एकनाथ शिंदे आणि ते आनंद दिघे यांना इतक का मानतात?

एकनाथ शिंदे हे मुळचे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातले. त्याच्या जन्म 9 फेब्रुवारी 1964 सालाचा. मात्र काही कामानिमित्त एकनाथ शिंदे यांचं कुटुंब मुंबईतील ठाणे जिल्ह्यात स्थायिक झालं. ठाणेजिल्ह्यातील मंगला हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये त्यांनी 11 पर्यंत शिक्षण घेतलं.

त्यावेळी मराठी माणसाचा पक्ष म्हणून शिवसेना नावारूपाला आली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे आणि शिवसेनेचे चाहते झाले.

त्यानंतर शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून ते काम करू लागले.

त्या काळात ठाणे जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे होते. एक झपाटलेला कार्यकर्ता, शिवसेना आणि बाळासाहेबांवर निस्सीम प्रेम करणारा कार्यकर्ता अशी आनंद दिघेंची ओळख होती.

एकदा ठाण्यात साखरेचा प्रचंड तुटवडा असताना दिघे यांनी एकनाथ शिंदेंच्यावर कारखान्यात जाऊन साखर आणण्याची जबाबदारी सोपवली होती. प्रचंड धोकादायक परिस्थितीत ट्रक घेऊन गेलेले शिंदे यांनी चालकाच्या वर असलेल्या लाकडी खणात पैसे ठेवले होते.

कारखान्यात पोहचेपर्यंत ते सारखे पैसे आहेत की नाहीत पाहत असत. अखेर त्यांनी साखर ठाण्यात आणली आणि वाटली. त्या दिवशी आनंद दिघेना त्यांनी जिंकल होतं.

शांत स्वभाव, अभ्यासू नेतृत्व, एकनिष्ठ माणूस म्हणून एकनाथ शिंदे हे आनंद दिघेंचे विश्वासू बनले. आनंद दिघेंचे पटट्शिष्य म्हणून एकनाथ शिंदेंना ठाण्यामध्ये ओळख मिळाली. इथूनच त्याच्या राजकीय प्रवासाला सुरूवात झाली.

धर्मवीर आनंद दिघे त्यांच्यासाठी पितासमान होते.  दोन मुले धरणात बुडल्यानंतर खचून गेलेल्या शिंदे यांना सावरले ते दिघे यांनीच.

त्या घटनेनंतर एकनाथ शिंदे यांनां दिघेनी जास्तीजास्त राजकारणात गुंतवले. 

पुढे आनंद दिघे साहेबांचा २००१ साली मृत्यू झाला. यामुळे एकनाथ शिंदेनां मोठा धक्का बसला. नेहमी आधार देणारा बापच आता हात सोडून निघून गेला होता. शिंदेना स्वतःच स्वतःला सावराव लागणार होतं. मात्र दिघेंचा आणि शिवसेनेचा वारसा त्यांनाच पुढे न्यावा लागणार होता. मन घट्ट करून ते सगळ्याला सामोरे गेले.

कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नसलेले एकनाथ शिंदे हे ठाणे महानगरपालिकेत दोन वेळेस नगरसेवक म्हणून निवडून आले. आपल्या कामातून त्यांनी जनमानसात आणि शिवसेना पक्षात आपली स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली.

त्यामुळे 2004 साली त्यांनी पहिल्यांदा आमदारकी लढवली आणि ते आमदार झाले. 2009, 2014 मध्येही ते आमदार म्हणून निवडून आले.

2014 ला देशभरात मोदी लाट होती. या मोदी लाटेतही एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा बालेकिल्ला असणारा ठाणे जिल्हा अबाधित ठेवला. 2014 साली शिवसेना विरोधी बाकावर बसल्यानंतर एकनाथ शिंदे यांना विरोधी पक्षनेते पद देण्यात आलं होतं.

काही महिन्यानंतर शिवसेना युतीत सामिल झाली. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात एकनाथ शिंदे यांना सार्वजनिक बांधकाम खात्याचं मंत्रिपद देण्यात आलं. तसंच ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीही एकनाथ शिंदे यांना करण्यात आलं.

आपल्या कामाच्या, अभ्यासाच्या आणि विश्वासाच्या जोरावर पाच वर्षात एकनाथ शिंदे यांनी ठाणे, मुंबई, पालघरसह संपुर्ण महाराष्ट्रात शिवसैनिकांचं भक्कम असं जाळं उभा केलं.

२०१९ साली परत आमदार झाल्यानंतर त्यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत आल होतं. काही जण म्हणत होते की एकनाथ शिंदे भाजपला जाऊन मिळणार.

पण तिथले कार्यकर्ते नेहमी म्हणायचे,

“आनंद दिघेंचा हा पठ्ठ्या शिवसेनेला कधीच अंतर देणार नाही. “

आज मात्र एकनिष्ठ शिवसेनेच्या याच एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड करत धक्का दिला आणि राज्याचे मुख्यमंत्री झाले..

हे हि वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.