मंटो : तुकडा तुकडा चांद….

नंदिता दास ही काही फार जुनी किंवा खूप काम केलेली अशी दिग्दर्शिका नाही. मुळात ‘मंटो’ हा तिचा दिग्दर्शक म्हणून दुसराच सिनेमा पण तिचं वेगळेपण हे तिनं निवडलेल्या विषयांत दिसतं. तिचा पहिला सिनेमा ‘फिराक’ हा गुजरातच्या दंगलींच्या पार्श्वभूमीवर होता. आताचा हा मंटो नावाच्या एका वादग्रस्त आयुष्य जगलेल्या लेखकाच्या आयुष्यावर आहे.

सआ’दत हसन मंटो हा स्वातंत्र्य चळवळीच्या काळातला एक प्रसिद्ध लेखक होता. त्याचं लिखाण हे प्रामुख्यानं समजाच्या अंधाऱ्या आणि उघड उघड पणे असभ्य समजल्या जाणाऱ्या लोकांविषयी होतं. त्याच्या लिखाणाला वास्तवाची धार होती, त्यात तात्कालिक समाज रचनेनुसार अश्लाघ्य वर्णनं होती. त्याच्यावर यासाठी ६ खटले सुद्धा भरवले गेले. पण त्यातून तो वाचला. 

बॉलिवूडला सिनेमा बनवायला लागणारी सगळी अशी सामुग्री असणाऱ्या या मंटोवर आलेली ही काही पहिलीच फिल्म नाही. याआधी पाकिस्तानात २०१५ साली मंटो याच नावाने ती येऊन गेली.

मात्र सिनेमा म्हणून पाहिलं तर मात्र नंदिता दास च्या मंटो ला थोडे गुण अधिक मिळतात.

मंटोची कथा ही मुंबई ते पाकिस्तान अशी फिरते. चित्रपटाचा काळ हा सुद्धा १९४७-१९५२ अर्थात फाळणीच्या काळाचा आहे. मुंबईतल्या सिनेसृष्टी मधलं उत्तम चालत असलेलं आयुष्य ते पाकिस्तानात गेल्यानंतर अस्थिर आणि एका अर्थानं उद्ध्वस्त होत असलेलं आयुष्य असा चित्रपटाचा आलेख आहे.

मंटो हा सिनेमा पाहताना एक गोष्ट लक्षात येते की मुळात दिग्दर्शिकेन प्रेक्षकांना गृहीत धरलं असावं. मंटो चा काळ, त्याचं काम किंवा त्याचं आयुष्य याबाबत लोकांना प्रेक्षकांना माहिती आहे हे गृहितक मधोमध ठेऊन सिनेमा बनवला गेला असावा.

मंटो कोण हेच ठाऊक नसेल आणि त्याच्या बाबत पुसटशी कल्पना नसेल तर प्रेक्षकांना मंटो हा सिनेमा कळेल का?

उत्तर नाही हेच आहे. मंटो चं लिहिणं, त्याचं ते स्वाभिमानी असणं, दारू च्या आहारी जाणं असे सगळे कंगोरे आपल्या समोर आणण्यात सिनेमा यशस्वी होतो पण त्यातून खरा मंटो कळत नाही. 

चित्रपटाच्या बऱ्याच बाजू जमेच्या आहेत. अभिनय – पटकथा – संगीत – संवाद – प्रोडक्शन डिझाईन अशा सगळ्याच बाजूंवर चित्रपट उत्तम आहे. चित्रपटाची कथा ही ‘ story in the story ‘ या फॉरमॅट मध्ये आहे. एकीकडे मंटो चं आयुष्य तर दुसरीकडे त्याच्या कथा असं गुंफण या सिनेमात दिसतं. नवाझुद्दीन सिद्दीकी हाच नव्हे तर त्याच्या सोबत असलेली रसिका दुग्गल, ताहीर राज, राजश्री देशपांडे असे सगळेच ते ते पात्र जगले आहेत असं वाटावं इतकं उत्तम पात्र प्रत्येकानं वठवलं आहे. अगदी त्या त्या कथेनुसार येणारे परेश रावल, दिव्य दत्ता, रणवीर शौरी किंवा मग नीरज काबी आणि ऋषी कपूर सारखे पाहुणे कलाकार सुद्धा चोख दिसतात. कास्टींग साठी हा सिनेमा एक उत्तम नमुना आहे असं म्हणण्यास काहीही हरकत नाही. मंटो एका ठिकाणी लिहितो,

‘आखिर में इंसान तो नही रहते, रहते हैं तो सिर्फ अफसाने औंर उसके किरदार.

अगदी तसच मंटो मधलं एकेक पात्र आणि त्याला रांगवणारे कलाकार लक्षात राहतात. चित्रपटाची दृश्य कथा अर्थात पटकथा सुद्धा उत्तम आहे. सिनेमात अशी बरीच दृश्य आहेत जी लक्षात राहतात. पटकथेसाठी विशेष क्रेडिट कुणाला नसलं तरी लेखक म्हणून ते नंदिता दासचं आहे.

चित्रपटाचे संवाद हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्या काळात मुळात हिंदी आणि उर्दू असा नसलेला भेदभाव आणि उर्दू मिश्रित हिंदीचा असलेला प्रभाव असलेली भाषा ही संवाद अजुन खुलवते. पूर्वार्धात म्हणजे मुंबईत असणारं उर्दू मिश्रित हिंदी आणि पाकिस्तानात गेल्यानंतरच उर्दू हा बारकावा संवाद लेखकानं उत्तम पद्धतीने सांभाळला आहे. एकापेक्षा एक सरस आणि दमदार संवाद म्हणणारी पात्र विशेषतः नवाज मनात घर करतो.

संगीत ही अजुन एक जमेची बाजू. स्नेहा खानवलकर हा एक जेम आहे. तिचं काम दिवसेंदिवस अधिकाधिक उत्तम होत चाललंय. चित्रपटाच्या काळाला साजेल असं रेट्रो असं संगीत पर्यायानं शास्त्रीय बाजाचं असं असावं ही मूळ कथेची गरज होती. स्नेहाच संगीत ती गरज पूर्ण करतं. स्नेहाने केलेले प्रयोग बघता भविष्यात तिच्याकडून फार आशा ठेवण्यात हरकत नाही हे नक्की. प्रोडक्शन डिझाईन साठी हा सिनेमा जरूर पाहावा. फाळणी चा काळ ज्या पद्धतीनं उभा केलाय त्याला तोड नाही. किंवा अगदी गल्ल्या मधलं उभं केलेलं दृश्य आणि त्यातले बारकावे यासाठी pd टीम चं कौतुक नक्की करावं.

Film transition अशी एक संज्ञा सिने तंत्रज्ञानात वापरली जाते. एका दृष्यातून दुसऱ्या दृष्यामध्ये किती सफाईदारपणे जाता येऊ शकतं यावर ही संज्ञा आहे विशेषतः संकलनासाठी, पण यासाठी मुळात कथेतच त्याची प्रोविजन केली नसेल तर मात्र संकलनाच्या वेळी त्याचा उपयोग होत नाही आणि सिनेमाचा एकूण परिणाम कमी होतो. मंटो हा इथेच आपल्याला थोडासा का होईना पण निरस वाटतो. एकाच 

वेळी मंटो चं आयुष्य आणि त्याच्या कथा यांची गुंफण घालताना नंदिता दास दिग्दर्शक म्हणून असं म्हणण्यापेक्षा लेखक म्हणून नक्की कमी पडते. कथामधलं प्रवाहीपण कुठेतरी मध्येच या गुंफण साकारण्याचा नादात हरवतं. श्रीकर प्रसाद सारखा संकलक असल्यामुळे चित्रपटातला प्रवाह बऱ्यापैकी स्थिर राहतो पण तो टिकत नाही. अर्थात हे चूक लेखक म्हणून आहे का दिग्दर्शक म्हणून हा ज्याच्या त्याच्या नजरेचा किंवा बघण्याचा दृष्टिकोनाचा भाग आहे.

चित्रपटगृहातून बाहेर पडताना आपण सुन्न असतो.

‘बोल कि लब आझाद हैं तेरे’ कानात गुंजत असतं. सिनेमातल्या अनेक फ्रेम्स, अनेक संवाद आपल्या लक्षात राहतात. पण संपूर्ण सिनेमा म्हणून जर विचार केला तर मात्र आपण काहीच आपल्यापाशी ठेवत नाही. नंदिता दास चा हा सिनेमा छान ठरतो पण उत्तम नाही. मंटो निदान आपापल्या हार्ड डिस्क ठेवता येईल ही सोय तरी नंदिता दासनं केली याबाबत तिला धन्यवाद द्यायला हवेत.

  • अनिरुद्ध प्रभू
Leave A Reply

Your email address will not be published.