‘पटाखा’मधून  तुम्हाला ‘जरा हटके’ असं बघायला मिळू शकतं ?

विशाल भारद्वाज हा प्रचंड प्रतिभावान दिग्दर्शक आहे. त्याचं कॅलीबर त्याची कामाची यादी जरी पहिली तरी सहज लक्षात येऊ शकतं. त्याच्या कामातला अस्सल देसीपणा ही त्याची ओळख आहे. तो नेहमी कुठल्या ना कुठल्या साहित्यिकाच्या रचनेवरच आपला सिनेमा बनवतो. त्यातली पात्र एक्स्ट्रिम टोकाची असू शकतात, त्यांच्यातला विचित्रपणा हा त्या त्या मातीतला असतो असे अनेक स्वभावगुण त्याच्या कामाचा भाग आहेत. आता आलेला ‘पटाखा’ त्याच्या या सगळ्यांपेक्षा काही वेगळा नाही.

पण तरीही हा सिनेमा पाहिल्यानंतर एक प्रश्न मनात तसाच राहतो तो म्हणजे ‘मकबूल’ असेल किंवा ‘हैदर’ असेल असे उत्तम सिनेमा देणारा विशाल भारद्वाज हरवलाय का?

शेक्सपियर, रस्किन बॉड यांच्या सारख्या बड्या लेखकांच्या कथेवर सिनेमा करून झाल्यानंतर यावेळी राजस्थान साहित्य अकादमी विजेत्या चरणसिंह पथिक यांच्या ‘दो बहने’ या लघुकथेवर विशालने त्याचा हा सिनेमा केलाय.

‘बडकी’ आणि ‘छुटकी’ या  दोन सख्ख्या बहिणींना केंद्रस्थानी ठेऊन ही कथा पुढे पुढे सरकत राहते. या दोघींमधील भांडणं ही कथेची मुख्यधार आहे.

दोघींमधील ही भांडणं ‘बिडी’ असेल किंवा मग ‘बॉयफ्रेंड’ कशावरूनही असू शकतात. बऱ्याच वेळा या भांडणाची परिणीती अगदी फ्रीस्टाइल हाणामारीमध्येही होते. पुढे जेव्हा या दोघींच्या लग्नाचा विषय जोर धरू लागतो तेव्हा या दोघी घरातून पळून जातात. पुढे कथेत एक ट्विस्ट येतो आणि मग कधीच एकमेकींचं तोंड न बघण्याची इच्छा असणाऱ्या या बहिणी एकमेकींसमोर येतात. तो ट्विस्ट काय हे थिएटरमध्ये जावून पाहिलेलंच बरं.

बऱ्याच वेळा ज्या मातीत सिनेमाची कथा घडते तिथल्या स्थानिक भाषेचा प्रभाव वाक्यामागे २-३ शब्द टाकून अर्धवट पद्धतीने उभा केला जातो. मात्र  या सिनेमातील  राजस्थानी भाषेच्या लहेजावर कलाकारांनी घेतलेली मेहनत आपल्याला  पडद्यावर दिसते. राजस्थानमधल्या करोली गावात घडणारी ही कथा चित्रित करताना  तिथला रणजित पलीत यांचा कॅमेरा तो भाग आणि गावव्यवहार उत्तम पद्धतीने टिपतो.

‘बडकी’च्या भूमिकेतली राधिका मदन आणि ‘छुटकी’च्या भूमिकेतली सन्या मल्होत्रा यांचा अभिनय ही या सिनेमाची जमेची बाजू आहे. राजस्थानी दिसण्यासाठी असं म्हणण्यापेक्षा तसं असण्यासाठी या दोघींनी घेतलेली मेहनत आपल्याला पडद्यावर दिसते. विजय राजने या दोन मुलींचे साकारलेले वडीलसुद्धा आपलं काम चोख बजावतात. कथेच्या प्रवाहानुसार दास, अभिषेक गुहन असेल किंवा मग सानंद वर्मा यानी आपापल्या वाट्याला येणाऱ्या भूमिका नीटपणे वठवतात.

या सिनेमाचा खरा फलंदाज जर कोण असेल तर तो डीपर नारद भूमिका करणारा सुनील ग्रोवर आहे. त्याचा परफॉर्मन्स फक्कड झालाय. सूनिलचं कॅलिबर या सिनेमामध्ये अजून लक्षात येतं.

विशाल भारद्वाज हा तितक्याच ताकदीचा संगीतकार आहे यात दुमत नाही. गुलजार साहेबांबरोबर त्याची असलेली केमिस्ट्री आणि त्यातून निघालेली अप्रतिम गाणी हा वेगळ्या लेखाचा विषय आहे. ही केमिस्ट्री आपल्याला इथेही पाहायला मिळते पण कमी प्रमाणात. सिनेमातल्या एकूण ५ गाण्यांपैकी फक्त ‘नैनाबंजारे’ हे एकच गाणं काही काळ कानात गुंजत राहतं. पण या साऊंडट्रकमध्ये विशालपेक्षा गुलजार हेच त्यांच्या शब्दांमुळे अधिक लक्षात राहतात. त्यांनी ‘हॅलो हॅलो’ या गाण्यात लिहिलेले शब्द त्यांचा प्रभाव आणि प्रतिभा अजुन गडद करतात.

चरणसिंह पथिक यांच्या लघुकथेच संपूर्ण लांबीच्या सिनेमात रूपांतर करताना विशाल त्यात बरेच बदल करतो. बरेच ‘अॅड-ऑन’ करतो. पण ते सहजपणे कथेच्या प्रवाहात मिसळत नाहीत. बहुदा याचमुळेच सिनेमा वेळ खाऊ वाटू लागतो. त्यामुळे सिनेमाच्या लांबीवर आपली कात्री चालवताना श्रीकर प्रसाद ती थोडी सैल सोडली असती तर सिनेमा अधिक परिणामकारक होऊ शकला असता असंही वाटत राहतं.

तुम्ही जर विशालच्या कामाचे चाहते असाल तर ही फिल्म नक्कीच तुमच्यासाठी आहे. पण जर तुम्ही सामान्य चित्रपट रसिक म्हणून सिनेमाला जाणार असाल तरीही  ‘पटाखा’मधून तुम्हाला ‘जरा हटके’ असं काही बघायला मिळू शकतं. त्यामुळे ग्लॅमरस अशा सिनेमाच्या जगात अस्सल राजस्थानी बाजाच्या लघुकथेवर सिनेमा बनवण्याचा विशाल भारद्वाजचा प्रयोग मात्र नक्कीच कौतुकास्पद आहे.

अनिरुद्ध प्रभू 

हे ही वाच भिडू