भाईजानला साप चावलेलं फार्महाऊस याआधी देखील वादात सापडलं होत..

सलमानला चावल्यानंतर सापच आयसीयूत गेलाय.

असं आम्ही नाही ट्विटरचे यूजर म्हणतायत. त्याच झालं असं होतं की, भाईजान सलमान खानला रविवारी सकाळी साप चावला. ‘नडला की फोडला’ अजेंड्यावर असलेल्या सापानं भाईजानला दंश केला. बातमी वायूवेगानं चाहत्यांपर्यंत पोहोचली. सलमानच्या प्रकृतीच्या सुधारणेसाठी चाहत्यांनी देव पाण्यात ठेवले. एकामागोमाग एक सलमानच्या बातमीचे अपडेट येत राहिले.

नंतर अशीही माहिती समोर आली की, जो साप सलमानला चावला होता, तो विषारी नव्हता. सलमानचं फार्म हाऊस पनवेलमध्ये ज्या ठिकाणी आहे, तिथं सर्रास सरपटणारे प्राणी आढळून येतात. तिथं साप दिसणं, यात नवीन काहीतरी दिसण्यासारखं नव्हतं. 

या सापामुळे भाईजानचं जे फार्महाऊस चर्चेत आलंय ना ते याआधी सुद्धा वादात सापडलं होत. त्या फार्महाऊसचा इतिहास लैच मोठ्ठाय!

तर सलमान खान आणि त्याच्या कुटुंबाचे वजापूर, लोणावळा इथं अर्पिता फार्म्स नावाचे मोठे अलिशान फार्महाऊस आहे. २००३ मध्ये या भागाला पर्यावरणाच्यादृष्टीने संवेदनशील घोषित करून, या क्षेत्रातील बांधकामांवर बंदी लादण्यात आली होती. मात्र अशी बंदी असतानाही सलमान खान आणि कुटुंबाने या फार्म हाऊसवर अनेक प्रकारचं नवं बांधकाम केलं.

यात पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील न राहता अर्पिता फार्म्स सगळीकडे सिमेंटच्या भिंती बांधून ठेवल्या होत्या. पुढं हे काम करताना सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात एका म्हातारा म्हातारीने तक्रार दाखल केली होती. कारण होत जागा बळकावल्याचं.

एका वयोवृद्ध दाम्पत्यानं सलमान व त्याच्या कुटुंबावर बळजबरी करत असल्याचा आरोप केला होता. सलमानच्या पनवेल येथील फार्महाऊसच्या अगदी लागून या वयोवृद्ध दाम्पत्याची जागा होती. या जागेवर त्यांनी बांधकाम करायला घेतल. पण खान कुटुंबाने आपल्या दबावाचा वापर करत, त्यांच्या मार्गात एकापाठोपाठ एक अशा अनेक अडचणी निर्माण केल्या. आणि त्यांची जागा सुद्धा बळकावली.

मग या प्रकरणात २०१७ साली वनविभागाला जाग आली.

महाराष्ट्र वन विभागाने सलमानच्या पनवेलस्थित फार्म हाऊसमधील कथित अवैध बांधकामासंदर्भात नोटीस जारी केली. वन नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला.

पहिल्यांदा वनविभागाने नोटीस पाठवली, पण त्याला सलमान खान आणि त्याच्या कुटुंबियांकडून काहीच रिस्पॉन्स मिळाला नाही. पुढे दुसऱ्यांदा नोटीस पाठवण्यात आले ज्यात पहिल्या नोटिशीचा उल्लेख होता. पण दुसऱ्या नोटिशीला ही काही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी वनविभागाने सलमानचे पप्पा सलीम खान यांना नोटीस पाठवली. त्यावर उत्तर म्हणून सलीम खान म्हंटले की,

सलमान खान, अलवीरा खान, अर्पिता खान, अरबाज आणि और सोहेल खान, हेलन खान यांच्या नावावर ही प्रॉपर्टी आहे. माझ्याशी याचा काही संबंध नाही.

यावर वनविभागाने उत्तर दिले की, मग या सगळ्यांवर सामूहिक रुपात कारवाई का करण्यात येऊ नये ?

सलमानच्या कुटुंबाला नोटीस जारी करणारे वन अधिकारी होते एस. एस. कापसे. पहिल्यांदाच कापसे यांच्या नेतृत्वाखाली वनविभागाने मोठं धाडस केल होत. पण पुढं ह्या प्रकरणात त्यांची बदली करण्यात आल्याचं म्हंटल गेलं. कापसे यांनी आपल्या बदलीवर आक्षेप घेत, ती रोखण्याची मागणी ही केली. पण बदली काही थांबली नाही.

पुढं नेहमीप्रमाणे जशी मोठमोठी प्रकरण शांत होतात तसंच हे प्रकरण ही शांत झाल. कदाचित याचेच उट्टे वन्य प्राणी म्हणून सापाने काढले असण्याची चिन्ह आहेत, अशा चर्चा रंगल्यात. भिडूला असं काही वाटतं नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.