ट्रॅफिक जॅमला हलक्यात घेऊ नका, इकडं फक्त डायव्होर्स नाही तर लय मोठी सूत्रं हलतात

ऑफिसला जायला, ऑफिसवरुन घरी जायला, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडला भेटायला जाताना किंवा अगदी कुठंही जायला उशीर झाला, तरी एक कारण ठरलेलं असतं… ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. खरंच ट्रॅफिक असो किंवा नसो ट्रॅफिकचं कारण कुठेही बसतं आणि खरंही वाटतं. सध्या ठिकठिकाणी मेट्रोची उड्डाणपुलाची कामं सुरु आहेत, त्यामुळं ट्रॅफिकमध्ये अडकण्याचीही सवय झाली आहे. पण सध्या ट्रॅफिक जॅम हा विषय फुल्ल फॉर्ममध्ये आलाय आणि त्यामागचं कारणही तसंच आहे.

झालं असं महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस माध्यमांशी बोलत होत्या, मुंबईमधल्या ट्रॅफिक विषयी बोलताना त्या म्हणाल्या, ‘मुंबईत इतकं ट्रॅफिक असतं की, लोकांना आपल्या कुटुंबियांना वेळ द्यायला मिळत नाही आणि त्यामुळं मुंबईत होणाऱ्या ३ टक्के डीव्होर्सचं कारण ट्रॅफिक जॅम आहे.’

त्यांच्या या वक्तव्यावर काही लोकांनी टीका केली, तर काही लोकांनी त्यांना पाठिंबा दिला. मुंबईच्या ट्रॅफिकबद्दल अनेक जण आपल्या आठवणी सांगू लागले. आता अमृता फडणवीस म्हणाल्या तसं खरंच ट्रॅफिकमुळं डीव्होर्स होतात का हे बघायला लय संशोधन करावं लागेल. पण एकदा एक संशोधन झालं होतं, त्याची माहिती तर तुम्हाला दिलीच पाहिजे.

डिसेंबर २०२१ मध्ये सिलेक्ट कार लिजिंग या युनायटेड किंगडमच्या कंपनीनं एक सर्व्हे केला होता. त्या सर्व्हेनुसार भारतातल्या ड्रायव्हर्सचा वर्षातल्या दोन दिवसांचा वेळ हा ट्रॅफिकमध्ये जातो. म्हणजे सगळी गणितं जुळवली तर माणूस जवळपास ४८ तास स्टेअरिंगच्या मागं निवांत बसलेली असतात. म्हणजे दोन दिवस टोटल वाया. या सर्व्हेनुसार सौदी अरेबियामधल्या लोकांचे वर्षभरातले १६.९१ दिवस ट्रॅफिकमध्ये जातात. या लिस्टमध्ये त्यांनी टॉप मारलंय… (तिकडे किती डिव्होर्स झाले असतील? बघायला पाहिजे.)

आता दोन दिवसांच्या काळात माणूस काय काय करु शकतो?

लग्न करू शकतो, लागलीच देवदर्शनपण उरकतंय. दोन दिवसात आपल्या महाराष्ट्रातले नेते कित्येक प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकतात, दोन दिवसात तिचं आपल्यावर प्रेम आहे का नाय हे कळू शकतं, दोन दिवसात इकडची दुनिया तिकडं होऊ शकते… पण असं काय होत नाही, कारण आपण दोन दिवस ट्रॅफिकमध्ये घालवतोय.

मुंबई, बँगलोर आणि दिल्ली म्हणजे ट्रॅफिकच्या बाबतीत लय डेंजर. यात पुणेकर कुठे आहेत विचारणाऱ्यांनी सुट्टीच्या दिवशी बोगद्यातून पुण्यात येऊन दाखवावं. पण काहीही म्हणलं तरी, मुंबईच्या ट्रॅफिकचा खरंच नाद नाही. त्यात पाऊस वैगेरे पडला, तर संपलाच विषय.

मुंबई ट्रॅफिक आणि अमित शहांचा एक किस्साय…

ऑगस्ट २०१९ मध्ये काश्मीरमध्ये लागू असलेलं आर्टिकल ३७७ काढण्यात आलं. तेव्हा देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. लेखिका शोभा डे यांनी मात्र शहांकडे एक वेगळीच तक्रार केली. त्यांनी ट्विट केलं की, ‘मुंबईतल्या साकीनाका परिसरात भरपूर ट्रॅफिक होतंय आणि आम्हाला त्याचा त्रास सहन करावा लागतो. भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हापासून म्हणजेच १९४७ पासून ही समस्या सुरू आहे. तुम्ही यावर तोडगा काढाल अशी आशा सगळ्या मुंबईला आहे.’ देशाच्या गृहमंत्र्याला ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सोडवायला लावणाऱ्या त्यांच्या या ट्विटवर लोकांनी चांगलीच टीका केली.

उत्तराखंडचे नेते हरक सिंग रावत तिकिटाच्या वादावरुन दिल्लीत पक्षश्रेष्ठींच्या भेटीला चालले होते, मात्र ते ट्रॅफिक जॅममध्ये अडकले आणि त्यांना पक्षातून बडतर्फ केल्याची बातमी त्यांना मोबाईलवरुन समजली. 

एकदा तर भारत दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाही ट्रॅफिकमध्ये अडकले होते, आता यामुळे मिशेल वहिनी त्यांना काय म्हणल्या हे काय आम्हाला समजु शकलं नाही…

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.