सैन्यात असणारा माधो सिंह आधी चंबळचा खतरनाक डाकू आणि मग चक्क जादूगार झाला…

आमच्या कॉलेजची ट्रिप दिल्लीला चालली होती, पोरा-पोरींनी कल्ला करुन सगळी ट्रेन डोक्यावर घेतली होती. पण एक टप्पा असा आला की, सगळी जनता गप झाली आणि सगळ्यांचे डोळे खिडकीबाहेर. कारण डोळ्यांना दिसत होतं चंबळ खोरं. ओसाड रान, जिथवर नजर जातीये तिथवर चॉकलेटी आणि काळ्या रंगाच्या छटा, तोंडी लावण्यापुरता हिरवा रंग आणि ट्रेन मधूनही जाणवणारी भयाण शांतता.

कित्येक वर्ष उलटली, तरी चंबळची दहशत आजही कायम आहे. इथल्या मातीत अनेक रहस्य दडलीयेत आणि कित्येक गप्प झालेले आवाजही. फुलनदेवी, पानसिंग तोमर, निर्भय गुज्जर, मोहर सिंह, ददुआ ही चंबळचं खोरं गाजवलेली काही नावं.

चंबळच्या खोऱ्यातून आणखी एक नाव चांगलंच गाजलं, डाकू माधो सिंग. या डाकूची स्टोरी इतकी खतरनाक आहे, की साऊथच्या पिक्चरमध्ये सहज खपून जाईल. स्टोरी भारी आहे म्हणल्यावर टप्प्याटप्यानं पाहिली पाहिजे.

टप्पा क्रमांक एक-

तर उत्तर प्रदेशमधल्या गढिया बघरेना गावातले शेतकरी पोप सिंह भदोरिया यांना जन्माष्टमीच्या दिवशी मुलगा झाला. ज्याचं नाव कृष्णावरुन ठेवण्यात आलं, माधव. सगळी दुनिया त्याला लाडानं ‘माधो’ असा आवाज देऊ लागली. या गड्याला लहानपणापासून एका गोष्टीची लय गोडी होती, ती म्हणजे अभ्यास. याच अभ्यासाच्या गोडीमुळं तो आर्मीकडे ओढला गेला. १९५४ मध्ये त्याची राजपुताना रायफल्सच्या सतराव्या बटालियनमध्ये निवड झाली. तिथं तो कंपाउंडर म्हणून काम करु लागला आणि जखमी सैनिकांना सेवा पुरवू लागला.

टप्पा क्रमांक दोन-

हा विषय डीप आहे, आता सैन्यात गेल्यावर माधोची आर्थिक परिस्थिती सुधारली. पण ही गोष्ट काय गावातल्या लोकांना पचली नाय. त्यांनी माधो सिंहवर शाळा करायला सुरुवात केली. काही वर्षांनी माधो जेव्हा गावात सुट्टीसाठी आला, तेव्हा त्याच्यावर चोरीचा खोटा आरोप करुन त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं. साहजिकच माधोला नोकरीचा राजीनामा द्यावा लागला. जेलमधून बाहेर आल्यावर त्यानं एक छोटासा दवाखाना सुरू करत, गरीबांचे उपचार फुकटमध्ये करायचा. गावात राडे होत असले, तरी त्याची समाजसेवा मात्र सुरू होती.

टप्पा क्रमांक तीन-

गावातली लोकं इतकी जळकी होती, की त्यांनी माधोला त्रास देणं कमी केलं नाही. त्यांच्या एरियामध्ये मोहर सिंह नावाच्या डाकूची दहशत होती. त्याच्या कानावर हे सगळं गेलं आणि त्यानं माधो सिंहला न्याय मिळावा म्हणून पंचायत घ्यायला लावली. त्याच पंचायतीमध्ये माधो सिंहला मारण्याचा प्रयत्न झाला आणि पोलिस तपासात त्यालाच अटक झाली.

टप्पा क्रमांक चार- 

मेरे बदले की आग. अन्यायामुळं डोकं फिरलेला माधो सिंह थेट चंबळच्या खोऱ्यात गेला, तिकडं त्यानं हातात बंदूक घेतली आणि हिंसेचा मार्ग निवडला. एका रात्री तो आपल्या गावात आला आणि त्रास देणाऱ्या तीन शत्रूंना गोळ्या घालून मारलं. काही महिने भाऊ गायब झाला आणि मग परत गावात घुसला आणि चार शत्रूंचा एन्डगेम केला. तिथनं आला ट्विस्ट…

टप्पा क्रमांक पाच-

आता गावात आणि चंबळच्या खोऱ्यात माधो सिंहची दहशत बनली होती. त्यानं त्याच्यासारखेच वाढीव ८०-९० डाकू एकत्र केले आणि पद्धतशीर टोळी बनवली. त्याच्या या टोळीनं जबरदस्त हवा केली. त्यानं कित्येक जणांचं अपहरण केलं, मर्डरचा तर किस्साच वेगळा. कारण त्याच्यावर २३ हत्या आणि ५०० किडनॅपिंगच्या केस चालल्या. सरकारनं त्याच्यावर दीड लाखाचं बक्षीस लावलं. कित्येक वेळा पोलिसांसोबत चकमकी झाल्या. माधो सिंहचे कित्येक सहकारी मारले गेले, पण हा गडी पोलिसांना आणि पोलिसांच्या गोळीला घावयाचाच नाही. ज्या बंदुका पोलिसांकडे असायच्या, त्याच्यापेक्षा भारी शस्त्रं हा गडी आणि त्याची टोळी वापरत होती. या सगळ्यातून त्यानं छापलेल्या पैशाची तर गिनतीच नाही.

टप्पा क्रमांक सहा-

कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आणि हिंसाचार थांबवण्यासाठी जयप्रकाश नारायण यांनी पुढाकार घेतला. त्यांनी चंबळमधल्या डाकूंना शरण येण्यास सांगितलं. त्यांच्या डिप्लोमसीनं काम केलं आणि १९७२ मध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आपली हत्यारं टाकली. विशेष म्हणजे त्यावेळी जवळपास ४००-५०० डाकुंनीही माधोसोबत सरेंडर केलं. हिंसा आणि दहशतीचा एक अध्याय संपला…

टप्पा क्रमांक सात-

परिवाराचं रक्षण व्हावं आणि स्वतःचं पुनर्वसन व्हावं अशी अट माधो सिंहनं ठेवली होती. नियमानुसार त्याला शिक्षा झाली आणि गडी जेलमध्ये जाऊन आला. बाहेर आल्यावर तो काय करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं, पण भावानं मार्ग भलताच निवडला.

टप्प्यात कार्यक्रम-

नाय, भाऊचा गेम नाही झाला. भाऊ जादूचे कार्यक्रम घेऊ लागला. तो जेलमध्ये असताना त्याच्या मुलानं जादू शिकून घेतली. त्यानंतर माधो सिंगनंही जादूच्या प्रयोगांमध्ये रस घेतला. ९० मिनिटांचा त्याचा शो गावागावात हिट होऊ लागला. एवढंच नाही, तर त्याच्या टीममध्ये पाच ‘माजी डाकूं’चाही समावेश होता, पण इथंही म्होरक्या माधो सिंहच होता. त्याचा शो असला की, सगळीकडे पोस्टर लागायचे. ‘चंबळ का शेर सरदार माधो सिंह, दुनिया का सबसे बडा जादूगार.’

पुढं १९९१ मध्ये आजारपणामुळं माधो सिंहचा मृत्यू झाला. तो एका मुलाखतीत बोलला होता, ‘मी आग्र्यात जन्मलो, लोकं जसा ताजमहाल लक्षात ठेवतील… तसंच मलाही!’ आपल्या दहशतीमुळं माधो सिंह जितका लक्षात राहणार नाही, तितका एक डाकू जो जादूगार झाला होता, यामुळं नक्की लक्षात राहील.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.