चंबळच्या दरोडेखोराला मीनाकुमारीने खंजीरने ऑटोग्राफ दिला होता…..

बॉलिवूडमध्ये दिसायला सगळ्यात जास्त सुंदर कोण असेल तर ती म्हणजे मीना कुमारी. बॉलिवूडची ट्रॅजेडी क्वीन म्हणून सुद्धा मीना कुमारीला ओळखलं जातं. पाकिजा सिनेमात तिच्यासाठी राजकुमाराने डायलॉग म्हणला होता कि,

आपके पांव बोहोत खूबसूरत हे इन्हे जमीन पर मत उतारियेगा, मैले हो जायेंगे…..

याच पाकिजा सिनेमाच्या शूटिंगचा किस्सा. कमाल अमरोही हे पाकिजा सिनेमाच्या निमित्ताने दोन गाड्यात शूटिंगची लोकं घेऊन दिल्लीच्या दिशेने चालले होते. हा प्रवास मध्यप्रदेशच्या शिवपुरी भागातून चालला होता, पण अचानक पेट्रोल संपल्याने ते सगळे थांबले. तेव्हा टीममधल्या कोणीतरी सांगितलं कि सकाळी इथून एक बस जाते त्यामुळे बसमधून जाऊन कोणतरी पेट्रोल घेऊ  येईल आणि आपल्याला पुढे प्रवास करता येईल.

कमाल अमरोही यांनी त्या रस्त्यातच रात्र काढायची ठरवली. सगळ्यांना सांगितलं कि गाडीच्या काचा वर घ्या. अमरोहीला हे माहिती नव्हतं कि भारतातल्या सगळ्यात खतरनाक खोऱ्यात तो अडकला आहे. रात्र गर्द होऊ लागली होती आणि अचानक १०-१२ दरोडेखोरांनी दोन्ही गाड्याला घेराव घातला. हत्यारं त्यांच्या हातात दिसू लागल्याने सगळेच जण घाबरून गेले. 

त्या दरोडेखोरांनी गाड्या एका ठिकाणी नेल्या आणि पाकिजाच्या टीमला सांगितलं कि खाली उतरा. कमाल अमरोही यांनी सगळ्यांना गाडीतच थांबायला लावलं कारण खाली उतरल्यावर जीवानिशी सगळे जातील याची त्याला कल्पना होती. अमरोहीने तर खाली उतरण्याचा प्रश्नच नव्हता कारण गाडीत मीना कुमारी होती. दरोडेखोरांनी सांगितलं कि आमच्या सरदाराला तुम्हाला भेटायचं आहे.

अमरोहीने सांगितलं कि तुमच्या सरदाराला इकडं घेऊन या. अचानक कुठूनतरी पांढऱ्याशुभ्र सदऱ्यातला एक सरदार पुढे आला. तो होता डाकू अमृतलाल. हा चंबळ खोऱ्यातला सगळ्यात खतरनाक डाकू होता. एकेकाळी तो शिक्षक होता पण वाईट संगतीला लागून तो कुख्यात दरोडेखोर बनला. 

आता सगळ्यांनी हत्यारं परजले होते आणि हल्ला करण्याच्या ते तयारीत होते. पण अचानक त्या दऱोखोरांमधलं एकजण कुजबुजला कि गाडीत मीनाकुमारी आहे. डाकू अमृतलालने तिथे जाहीर केलं कि हि गाडी आपण लुटणार नाही आणि या गाडीला पुढेही जाऊ देणार नाही. अमरोही त्याच्यासोबत वाद घालत होता आणि विनंती करत होता.

पण डाकू अमृतलाल ते चांगल्या अर्थाने सांगत होता कि आम्हाला तुमचा पाहुणचार करायचा आहे. आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या. पण तो इशारा फक्त मीना कुमारीला समजला होता. तिने सगळ्यांना गाडीतून उतरायला सांगितलं. ते सगळे त्या डाकू अमृतलालच्या गुहेत गेले. तिथं सगळ्यांचं स्वागत करण्यात आलं. खाण्यापिण्याच्या वस्तू तिथे होत्या, झोपण्याची सोयसुद्धा तिथे करण्यात आली होती.

डाकू अमृतलालने सगळ्यांना मेजवानी दिली. त्यांना सकाळी गाडीत पेट्रोल पोहचवण्याची सोयसुद्धा केली. मीना कुमारी मात्र गाडीतच बसून राहिली. तिला खाण्यापिण्याचं सामान स्वतः डाकू अमृतलालने गाडीत नेऊन दिलं. डाकू अमृतलालने अगदी घरच्या पाहुण्यांसारखं पाकिजाच्या टीमचं आदरातिथ्य केलं.

सकाळी गाडीमध्ये पेट्रोल भरल्यानंतर सगळे जायला निघाले. त्यावेळी मीना कुमारी ज्या गाडीत बसलेली होती त्या गाडीच्या दिशेने डाकू अमृतलाल खंजीर घेऊन निघाला. सगळी टीम घाबरून गेली कि आता हा डाकू नक्की काय करतो. 

डाकू अमृतलालने मीना कुमारीला विनंती केली मला तुमचा ऑटोग्राफ हवा आहे. मीना कुमारीला ऑटोग्राफ देणं काही नवीन नव्हतं.

पण अचानक अमृतलालने खंजीर काढली आणि सांगितलं कि माझ्या हातावर या खंजिरीने तुमचं नाव काढा. हा प्रकार बघून मीना कुमारी सुद्धा चक्रावली.

तिने त्याला नकार दिला. पण डाकू अमृतलाल काय ऐकायला तयार नव्हता. शेवटी नाईलाजाने मीना कुमारीने त्याच्या हातावर खंजिरीने ऑटोग्राफ दिला.

नंतर त्या सगळ्यांना प्रेमाने डाकू अमृतलालने निरोप दिला. शहरात आल्यावर मीना कुमारी आणि पाकिजाच्या टीमला कळलं कि तो दुसरा तिसरा कुणी नसून खतरनाक डाकू अमृतलाल होता. पुढे काही वर्षानंतर कमाल अमरोही यांनी सांगितलं कि,

एकदा पेपरमध्ये बातमी आली होती कि चंबळच्या खतरनाक दरोडेखोराला एका चकमकीत मारण्यात आलं आणि त्याच्या हातावर मीना कुमारी असं कोरलेलं होतं.

असा हा भयानक किस्सा मीना कुमारीसोबत घडला होता जो डाकू अमृतलाल साठी अविस्मरणीय होता.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.