बोली भाषेचा न्यूनगंड बाळगणारे बावळट आहेत

भिडूची एक मराठवाड्याची मैत्रीण करिअरसाठी पुण्याला आली. पोरीचं अकॅडमिक रेकॉर्ड एकदम चांगलं. नोकरी पटकन मिळाली. आता बऱ्यापैकी पगारावर काम करते. पण मूळची मराठवाड्याच्या लातूरची असल्यामुळे तिच्या बोलण्यात लातूरचे शब्द यायचे. 

एखादी गोष्ट तिला मिळाली तर भेटली असं म्हणायची, तिच्या उच्चारांमधला ‘न’ आणि ‘ण’ काढला जायचा, ती मुलगी असून तिच्या काही वाक्यांमध्ये खातो, पितो, जातो, येतो हे शब्द यायचे. तिच्या या बोलीभाषेमुळे कॉलेजमध्ये अन ऑफिसात ती सुरुवातीला मस्करीचा विषय बनली होती. आपण कुठं वेगळ्याच प्रदेशात आल्याचं तिला जाणवायला लागलं. 

त्याचा परिणाम असा झाला की, हुशार असणाऱ्या या मैत्रिणीमध्ये न्यूनगंड वाढायला लागला. आजूबाजूंच्या घोळक्यात वावरणं, बोलणं तिने कमी केलं. आपल्या गावावरून भली मोठी स्वप्नं उराशी बाळगून आलेली हि चुणचुणीत पोरगी आता एकलकोंड्यासारखी वागतेय.

हे फक्त तिच्याच सोबत घडलंय का ? तर नाही. तिची स्टोरी वाचून कित्येक जणांना स्वतःचा भूतकाळ आठवला असेल. जेंव्हा ते पुणे-मुंबई सारख्या मेट्रो सिटीज मध्ये शिकायला, नोकरीला आले होते तेंव्हा त्यांना इथल्या लोकांमध्ये मिसळण्यासाठी बराच काळ गेला. इथलं राहणीमान, आणि सर्वात महत्वाचं आपली बोलीभाषा सोडून पुण्याची, मुंबईची “शुद्ध” भाषा शिकण्यातच एवढी ताकद गेली. 

ग्रामीण भागातून आलेल्या अनेकांना बोलीभाषेवरुन डिवचलं जातं. पण डिवचणाऱ्यांना हे मात्र लक्षात येत नाही का ? की, भाषा कोणतीही असो, आपले मुद्दे त्या भाषेत ठामपणे मांडता येणं जास्त महत्त्वाचं आहे. शेवटी भाषा हे अभिव्यक्तीचं फक्त एक माध्यम आहे. मग शुद्ध, अशुद्ध, प्रमाण भाषेचा एवढा बाऊ कशाला करायचा ? प्रमाण भाषेचा अहंगंड व बोलीभाषेचा न्यूनगंड कधी संपणार ?

थोडक्यात मुद्द्यालाच हात घालायचा तर, याच प्रमाण जास्त कुठं आढळून येतं तर पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये. म्हणजे काही जणांचा अनुभव हा अपवाद असू शकतो.

मुंबई किंव्हा पुण्यासारख्या शहरात बोलली जाणारी भाषा हीच श्रेष्ठ आहे, शुद्ध आहे, प्रमाण आहे आणि  इतर भागात बोलली जाणारी भाषा हि कनिष्ठ असा समज बाळगण्याचं काहीच कारण नाही.

तर हे तर स्पष्ट आहे की, व्यक्त होण्यासाठी, आपलं म्हणणं मांडण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आपल्याकडे भाषा हे एकमेव माध्यम आहे. आपल्याला हेही माहितीये की, आपल्या महाराष्ट्राची मायबोली मराठी असली तरी एकच भाषा राज्यात वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते.

महाराष्ट्रात उगम पावलेल्या कितीतरी बोली भाषा आहेत, अहिराणी, ठाकरी, वऱ्हाडी, चंदगडी, पोवारी, मालवणी, आगरी, कोहळी, लेवा, तावडी, तडवी भिल्ल, झाडी, वाडवळी, सामवेदी, संगमेश्‍वरी, सातारी, कोलाम, देहवाली, गोंडी, कातकरी, ठाकरी, बेलदारी, वडारी, वारली, कैकाडी, दखनी, वैदू, घिसाडी, परधानी, मावची, कोरकू, भटक्‍या विमुक्त, करपल्लवी, अशा शेकडो बोली भाषा आहेत. 

दुर्दैव हे आत्ता ‘ओरिजनल’ बोली भाषा फारशी कुठे बोलली जात नाही. या बोलीभाषांचा ठेवा तितकासा जपला गेलाच नाही.

आपल्या बोलीभाषेला कमी न लेखता, आपल्या आहे तशा बोलीभाषेत आत्मविश्वासाने अनेकांनी करिअर घडवलं. त्यातलं एक यशस्वी उदाहरण म्हणजे, मराठी अभिनेता मकरंद अनासपुरे. अनासपुरे हे मराठवाड्याहून मुंबईत आलेला ज्याने त्यांच्या कलेने आणि भाषेने सर्वांची मने जिंकली.  

मग बोल भिडूने, अशीच आणखी उदाहरणे शोधली आणि त्यांचेच अनुभव मांडलेत. हि काय साधारण  नाहीयेत तर आपल्या बोली भाषेत या व्यक्तींनी आपली कारकीर्द घडवली. 

त्यातील पहिलं नाव म्हणजे, सयाजी शिंदे. 

सयाजी सरांनी मराठी चित्रपट व नाटक तसेच कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू आणि हिंदी भाषेतील अनेक चित्रपटात अभिनय केला आहे. अभिनय क्षेत्र सोडलं तर त्यांचे सह्याद्री देवराई या संस्थेमार्फतचे वृक्षारोपणाचे मोठे अभियान राबिवले आहे. 

बोल भिडूशी बोलतांना ते म्हणाले की, ” पहिली गोष्ट म्हणजे बोली भाषा हि उच्च भाषा आहे याचं ज्ञान स्वतःला पाहिजे. प्रमाण भाषा, काव्य भाषा, साहित्यिक भाषा, गद्य-पद्य पेक्षा बोलीभाषा हि वरच्या दर्जाची असते हे आपल्याला माहित पाहिजे.

बोली भाषेमध्ये देहबोली असते त्यामुळे हि थेट भाषा असते. खरं तर न्यूनगंड बाळगणं हा आपला दोष आहे. जेंव्हा मी पानी बोलतो आणि समोरचा म्हणतो अरे पाणी म्हण तेंव्हा लग्गेच समोरच्याला असं उत्तर दिलं पाहिजे की, अरे पानीच ते काय तुला दूध वाटतंय का ? थोडक्यात आपल्याला समोरच्याला न्यूनगंड देता आला पाहिजे.

जगात प्रमाण भाषा वैगेरे काहीही नसतेय तर भाषा हि विचार आदान-प्रदान करण्याचं माध्यम असते”.

सयाजी सरांनी देखील त्यांना आलेले अनुभव सांगितले ते म्हणजे त्यांना चादर या शब्दाच्या उच्चरावरून हिणवलं गेलं होतं. त्यांचा ‘च’ चा उच्चार काढला गेला. ते सांगतात की, ” झुलवा नावाचं माझं पहिलं नाटक मी केलं तेंव्हा मी बोली भाषा बोलत होतो. वन रूम किचन नाटकाच्या वेळेस देखील मी बोली भाषा बोलत होतो.

मुळात मी भाषेचा अभ्यास केला होता. एक नट म्हणून मला माहिती असली पाहिजे. त्यामुळे कुणाला घाबरण्याचा आणि न्यूनगंड बाळगण्याचा प्रश्नच येत नाही. जगातली उत्तम भाषा म्हणजे आईने शिकवलेली भाषा म्हणजेच बोली भाषा आणि याच भाषेबाबत आपण न्यूनगंड बाळगला तर तो बावळट व्यक्ती इतकी साधी हि गोष्ट आहे”, असंही यावेळी संगितले.

प्रसिद्ध लेखक आणि उद्योजक शरद तांदळे यांनी बोल भिडू शी बोलतांना आपला अनुभव सांगितला, तसेच बोलीभाषेच्या महत्वाबद्दल देखील त्यांची मतं व्यक्त केली. 

तांदळे सर हे मुळचे बीड मधील वंजारवाडी या गावचे. ते बोल भिडूशी बोलतांना म्हणाले की, ” मी बोली भाषा अजूनही सोडली नाही. माझी भाषा हि मराठवाड्यातील बीड शहरातील आहे. माझी आई बोलती तीच भाषा माझी आहे. स्टार्टिंगला जेव्हा पुण्यात आलो तेव्हा असं कळालं की, पुण्यातील लोकं जास्त शुद्ध बोलतात असं सांगण्यात आलं. शुद्ध बोलतात म्हणजे कुठं तर गव्हर्मेंट ऑफिस, कुठल्या सप्लायरकडे  गेलो, कुठल्या कार्यक्रमात गेलो तर खूप लोक चांगली भाषा बोलतांना दिसायचे. पण त्यातील दोन-तीन लोकांनी मला डिवचलं. 

अशी काय भाषा बोलतो तू. भाषणात बोली भाषा बोलल्याबद्दलही  काही लोक येऊन बोलले होते.  

तांदळे सर असंही सांगतात की, “भाषणाचा जास्त संबंध आला तो लंडनमध्ये अवॉर्ड मिळाल्यानंतर. लंडन जाण्यापूर्वी आगोदर दिल्लीला गेलो होतो. त्यांनी तर माझ्या भाषेकडे दुर्लक्षच केलं आणि महत्वाचं म्हणजे माझ्या कर्तृत्वाकडे पाहिलं. लंडनला एवढा मोठा अवार्ड मिळाला पण पुण्यात वापस आल्यानंतर एका कार्यक्रमात म्हणाले की, तुम्ही एवढी गावरान भाषा का बोलता. 

मुद्दामून बोलतोय का? त्यावेळी मी सांगितलं की, ती माझ्या आईची भाषा आहे. त्यात मला काय लाज नाही. आईच्या भाषेची ज्याला लाज वाटते त्याला आईचीच लाज वाटते असा माझा समज आहे. यानंतर माझी बोली भाषा आहे तिलाच मी प्रमाण भाषा समजायला लागलो. 

पुण्यातील भाषा ‘प्रमाण भाषा’ असं म्हटलं जात. त्यावर अनेक प्रश्न आहेत. हि भाषा प्रमाण भाषा आहे हे म्हणलं कोण?   

एवढ्या लोकांना भेटल्यावर समजलं की, प्रमाण भाषा अशी कोणतीही भाषा नाही. कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येक भाषा असेल तिचा एक वेगळा टोन आणि गोडवा आहे. मला फार शुद्ध बोलता येत म्हणजे मी फार हुशार आहे असं काही लोक समजायला लागले आहेत. मलाही भाषेवरून डावलण्याचा प्रयत्न केला मात्र माझा स्ट्रॉंग पॉईंट भाषाच आहे. 

आपली भाषा सोडू नये. भाषणात सुद्धा मी माझी भाषा सोडत नाही. अनेकजण मला म्हणतात कि, तुझ्या भाषेवर पुण्याचा काही परिणाम झाला नाही का ?

अनेकजण आपली ओरिजनल भाषा सोडून ‘न’ ‘ण’ फरक सांगून कृत्रिम भाषा वापरतात. परिपेक्ष,अनुषंगाने असे शब्द वापरून अनेकजण थाट करण्याचा प्रयत्न करतात. हि बेगडी लोक आहेत. आपला ग्रामीण लहेजा आपणच गिळून टाकतो काय असं वाटायला लागलं आहे. याला आपणच जबाबदार आहे. आपणच त्यांना कॉपी करण्याचा प्रयत्न करतोय. आपली भाषा सोडली नाही पाहिजे. भाषेमुळे मला दुय्यम समजले गेले. तोच माझा स्ट्रॉंग पॉंईंट आहे. अभिजात भाषा म्हणजे कुठली भाषा हा पण एक प्रश्नच आहे. लहेज्या बदलला की आपण कृत्रिम होत जातो असं देखील त्यांनी मत व्यक्त केलं.

त्यानंतर आम्ही लोकप्रिय मराठी कलाकार भारत गणेशपुरे यांच्याशी संपर्क केला त्यांनी देखील बोली भाषेच्या मुद्द्यावरून त्यांचे मतं सांगितली. 

“बोली भाषा इथं आम्ही बोलतो त्या भाषेवरून अनेकदा आम्हाला हिणवण्यात आलं. आम्ही ‘काय करून राहील बे’ असं बोलतो. त्यावर पुण्याचा तज्ञ् मित्र म्हणाला, हे काय आहे, करून राहिलं हि काय भाषा आहे का ? मी त्याला सांगितले, अरे ती आमची बोली भाषा आहे.

तर तो म्हणाला हि, कोणती बोली भाषा आहे. काय करून राहिला असं कसं बोलता? पुण्यात पंगतीत बसल्यावर चपाती घालू का, वरण घालू का भात घालू का असं बोलतात ते चालतं तुम्हाला अन आम्ही राहिलं का हे बोललं तर चालत नाही असं मी त्या मित्राला उत्तर दिल. खरं तर हा हा वाद बऱ्याच दिवसापासून आला आहे. आता थोडं मोठं नाव झालं म्ह्णून त्यांना बोलू शकतो.

 पहिले हे सगळं ऐकूनच घ्यावं लागायचं. आम्हाला ते आणि-पाणी म्हणायचे. हे आले आणि पाणी असं बोलायचे. माझा जन्म खेड्याचा आहे त्यामुळे हि भाषा लहानपणापासून आली आहे. त्यातला त्यात चांगला मार्ग काढून मराठी बोलण्याचा प्रयत्न करतात लोकं”. असं मत भारत गणेशपुरे यांनी व्यक्त केलं.

मराठी कलाकार योगेश सिरसाट.

मराठी रिऍलिटी शो मध्ये आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना हसवणारे योगेश सिरसाट. त्यांनी खासकरून खान्देश म्हणजेच अहिराणी भाषेबाबत मत व्यक्त केलं, अहिराणी भाषेत ळ ला ड म्हणलं जातं. आणि मेन म्हणजे खान्देशात ळ शब्द असणारी अनेक गावं आहेत. भुसावळ, जळगाव, धुळे, चाळीसगाव, अमळनेर, पण खान्देश लोकं या गावांना, जडगाव, धुडे असं म्हणतात. तेथील शिक्षक सुद्धा शिकवतांना ळ म्हणत नाहीत तर ड असाच उच्चार करतात. 

बोली भाषेच्या न्यूनगंडाबाबत त्यांनी सांगितलं कि, “काही वर्षांपूर्वी असं व्हायचं कि, प्रमाण भाषा येत नाही म्हणून हिणवायचे, टवाळकी करायचे. आणि यामुळे न्यूनगंड तयार झाला होता. पण आता तितकं याच प्रमाण नाही राहिलं. तर याच भाषेच्या जोरावर कामं मिळतात आम्हाला. थोडक्यात तुमची कमकुवत बाजू समजली जात होती तेच तुमचं बलस्थान होतं असच काहीसं आमच्यासोबत झालं. 

आमच्याकडे अजूनही माणसं भेटतात आणि वस्तू मिळतात यावरच अडकले आहेत. मग यांना माझा प्रश्न आहे कि, भेटवस्तू मिळते कि भेटते ?” अशा शबदात सिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 

तर हि उदाहरणे म्हणजे आपल्या बोलीभाषेला कमी न लेखता, आपल्या आहे तशा बोलीभाषेत आत्मविश्वासाने अनेकांनी करिअर घडवलं. 

हे हि वाच भिडू:

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.