या एका शिक्षकामुळे अलिगढ मुस्लिम विद्यापीठात २५० च्या वर मुले मराठी भाषा शिकत आहेत

अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे शताब्दी वर्ष सोहळा सध्या सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे संवाद देखील साधला. बरोबर १०० वर्षापूर्वी त्यावेळचे समाज सुधारक सर सैयद अहमद खान यांनी मुस्लिम समाजासाठी आधुनिक शिक्षण मिळावे म्हणून स्थापन केलेल्या एका कॉलेजचे रुपातंर १९२० मध्ये अलिगढ मुस्लिम विद्यापीठामध्ये झाले होते.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशातील चार केंद्रीय विद्यापीठांमध्ये एक अलिगढ मुस्लिम विदयापीठ होते.

पुढे स्वातंत्र्यानंतर देखील विद्यापीठाने आपला शैक्षणिक दर्जा कायम ठेवला. नवनवीन व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु केले. सोबतच देशातील विविध भाषांचे विभाग देखील चालू केले. १९५९ साली तेलगू, मल्याळम, तामिळ, बंगाली अशा भाषांचे विभाग तर १९८५ पासून मराठी, पंजाबी आणि काश्मिरी भाषांचे विभाग सुरु केले. 

मात्र इतर भाषांच्या तुलनेत मराठी मिळणारा प्रतिसाद अगदीच थोडा होता. दोन आकडी संख्या देखील कशी तरी पूर्ण व्हायची. पण आज २५ वर्षानंतर याच मराठी विभागामध्ये महाराष्ट्रातील एका माणसामुळे २५० पेक्षा जास्त विद्यार्थी मराठी भाषा शिकत आहेत.

डॉ. ताहीर पठाण

डॉ. पठाण यांचा जन्म जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्‍यातील मार्डी गावचा. कुटुंबाची परिस्थिती मोठी हालाखीची असल्याने डॉ. पठाण यांच चौथीपर्यंतच शिक्षण मामाच्या गावी पैठण तालुक्यातील विहामांडवामध्ये झालं. तर पाचवी ते पदवी हे शिक्षण अंबडमध्ये झालं.

बी.ए.ला ते मत्स्योदरी महाविद्यालयात ते प्रथम आले. तर एम.ए. ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळविल्याबद्दल कुलपतीचे सुवर्णपदक डॉ. पठाण यांनी पटकावलं.

ऑक्‍टोबर २०११ मध्ये मध्ययुगीन मराठी साहित्याचे प्रसिद्ध समीक्षक डॉ सतीश बडवे यांच्या मार्गदर्शनाखाली “संत एकनाथ व संत तुकाराम यांचा अनुबंध – एक अभ्यास” या विषयावर डॉ. पठाण यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पीएच.डी मिळविली.

याच काळात तासिका तत्त्वावर एका महाविद्यालयात काम केले. तेथून अलिगढ मुस्लिम विद्यापीठात काम करण्याची संधी मिळाली.

या नावाजलेल्या मुस्लिम विद्यापिठात १९८५ पासून मराठी विभागाची सुरुवात झाली होती. मात्र तेव्हा पासून विभागातील विद्यार्थी संख्या २०१५ पर्यंत कधीच दोन आकडीच्या पलीकडे गेली नव्हती. २०१५ मध्ये तर एकही विद्यार्थी नव्हता. त्यावेळी अखेरची घटक मोजत असलेला हा विभाग बंद पडण्याची वेळ आली होती.

पण अशातच ५ फेब्रुवारी २०१५ जालन्याच्या डॉ. ताहेर पठाण यांची इथे नेमणूक झाली. आणि पुन्हा एका आशेचा किरण दिसू लागला.

या विद्यापीठात उर्दू आणि हिंदी भाषेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ३८ पैकी कोणतीही एक भारतीय भाषा शिकणं बंधनकारक आहे. याच बंधनाचा फायदा डॉ. पठाण यांनी उचलण्याच ठरवलं. त्यासाठी त्यांनी प्रयत्न देखील चालू केले.

ते विविध विभागांमध्ये जाऊन मराठी भाषा इतर भाषांच्या तुलनेत शिकण्यास किती सोपी आहे, हे पटवून देऊ लागले. तर अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मराठी सर्टिफिकेट शिक्षणक्रम पूर्ण केल्यास महाराष्ट्रात नोकऱ्याही मिळतील, अशी ही संधी ओळख त्यांनी मुलांना करून दिली.

त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यावर्षीच्या शैक्षणिक वर्षात मराठीसाठी ६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, आणि डॉ. पठाण यांनी या विद्यार्थ्यांच्या मदतीने बंद पडत आलेला मराठी विभाग पुन्हा सुरू केला. त्यानंतर देखील संख्या वाढू लागली.

२०१५ च्या मध्यापर्यंत हि संख्या १३, २०१६ मध्ये १३७, तर २०१७ मध्ये तब्बल २३७ वर जाऊन पोहोचली. २०१९ पर्यंत एकूण विद्यार्थ्यांची संख्या २५० च्यावर गेली.

२०१५ मध्येच जालिंदर येवले, मदन जाधव, बाबासाहेब जाधव या तीन विद्यार्थ्यांनी डॉ. पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन सुरु केले होते. जालिंदर येवले हे डिसेंबर २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या नेट परिक्षेत मराठी विषयात जेआरएफ मिळवून भारतातून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांना विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे मराठी विषयात संशोधन करण्यासाठी दरमहा २५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जात होती.

२०१७-१८ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी संख्या २७५ वर पोहोचली होती. तेव्हा हा विभाग सगळ्यांच्या नजरेत आला. यामुळे भाषा संकुलाचे संचालक, अधिष्ठाता विभागाच्या विरोधात गेले. कुलगुरूंचे सहकार्य मिळेना झाले. काही अभ्यासक्रम बंद पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले. २०१८-१९ च्या प्रवेशावेळी अनेक अडचणी निर्माण केल्या गेल्या.

या सर्व गोंधळामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर परिणाम झाला. त्यानंतर हे सगळ प्रकरण केंद्रीय मनुष्यबळ विभागासह उत्तर प्रदेशचे तत्कालीन राज्यपाल राम नाईक यांच्यापर्यंत पोहोचले. त्यांनी यात हस्तक्षेप करत मराठी विभाग वाचवण्यासाठी मदत केली.

सध्या विद्यापिठात बी.ए. (ओपन इलेक्‍टिव) आणि (ओपन इलेक्‍टिव) मध्ये, मराठी भाषेचा उदय, विकास व वाटचाल, मध्ययुगीन कालखंडातील विविध सांप्रदाय, महानुभाव, वारकरी, संत ज्ञानेश्‍वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम यांचे संत वाङ्मय, तसेच आधुनिक काळातील केशवसुत, वि.स.खांडेकर, वि.वा. शिरवाडकर, बहिणाबाई चौधरी, बाबुराव बागुल इत्यादी विविध कवी आणि लेखकांचे साहित्य शिकवल जात.

तर सर्टिफिकेट, डिप्लोमामध्ये मराठी व्याकरणाचा सखोल परिचय करून दिला जातो.

ज्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही मातृभाषा आहे तिथेच ‘मराठीचा विकास होतोय, की ती धोक्यात आहे अशा उलटसुलट चर्चा अधूनमधून सुरू असतात, महाराष्ट्रातील तरूण पिढी इंग्रजीकडे वळली असून, मराठी वाचन, लिखाण कमी होतय, असाही सूर असतो. काही वर्षांपूर्वी दिल्ली विद्यापिठात असलेला मराठी भाषा विभाग बंद झाला.

अशा काहीश्या वातावरणात देखील बाहेरच्या राज्यात मराठी भाषेचा विद्यार्थी अभ्यास करतात, संशोधन करतात यावर कोणाचा सहसा विश्वास बसत नाही. त्यातही उत्तरप्रदेश म्हंटले की नाहीच. मात्र, याच उत्तर प्रदेशातील हे अलिगढ मुस्लिम विद्यापीठ त्यासाठी अपवाद ठरले आहे. त्यास डॉ. पठाण यांचं देखील यश तेवढंच मोठं आहे.

हे हि वाच भिडू. 

1 Comment
  1. डाॅ. ताहेर पठाण सर हे एक अभ्यासू प्राध्यापक आहेत. अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील त्यांचे कार्य खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. अमराठी प्रदेशात मराठीचा झेंडा डौलाने फडकवण्याच्या त्यांच्या कार्याला खूप खूप हार्दिक शुभेच्छा..!!🇮🇳

Leave A Reply

Your email address will not be published.