कितीही भांडा, पण मराठमोळ्या मिसळीला ‘इंटरनॅशनल’ बनवलं ते मुंबईच्या ‘आस्वाद’नेच

दादरच्या गडकरी चौकाला लागलं की थालीपिठाचा खमंग वास तुमच्या नाकात शिरला नाही तर तुम्ही,  रस्ता चुकलेला असणारायत, फिक्स.

तो सेनाभवनावर लागलेला बाळासाहेबांचा भला मोठ्ठा फोटो आणि रस्त्यातून चालताना येणारा हा मराठमोळ्या पदार्थांचा खमंग वास म्हणजे, अजूनही मराठी संस्कृती मुंबईत जिवंत असल्याची साक्ष देत असतो.

आणि आपसूकच आपली पाऊलं ह्या खमंग वासाच्या दिशेने वळू लागतात. समोर एक मोठ्ठी पाटी लावलेली दिसते..

आस्वाद, उपहार व मिठाई गृह.

‘स्वादिष्ट सेवेची सात्विक परंपरा’ चालवत शिवाजी पार्क सारख्या मोक्याच्या ठिकाणी मराठमोळं आस्वाद हॉटेल गेली ३५ हून अधिक वर्ष ग्राहकांना खरोखर स्वादिष्ट आणि सात्विक जेवणाचा आस्वाद देतंय.

ह्या उपहार गृहाची स्थापना झाली ३ जानेवारी १९८६ साली. स्थापना केली श्रीकृष्ण सरजोशी यांनी. श्रीकृष्ण सरजोशी हे उपहार गृह सुरू करण्याआधी एका दुसऱ्या उपहारगृहात नोकरी करत होते. फूड सेक्टर कशा पद्धतीने चालतं हे त्यांनी खूप जवळून अभ्यासलं आणि अनुभवलं होतं.

तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं, की विशिष्ठ दर्जाचं आणि टिपिकल मराठमोळ्या पद्धतीचं जेवण लोकांना सहज उपलब्ध होत नाहीये.

आपल्या देशात लोकांना कायमच वेस्टर्न कल्चरची ओढ लागलेली असते आणि त्यात लोकांना आपली संस्कृती, आपली खाद्यसंस्कृती, आपलं कल्चर थोडक्यात, जे ‘आपलं’ आहे त्याचा विसर पडलेला असतो, आणि आपण, जे आपलं नाही त्यामागे पळत असतो.

पण असं असताना, समाजात काही अशीही ठराविक मंडळी आपल्या आजू बाजूला असतात ज्यांना ह्या आपलेपणातच जास्त इंट्रेस्ट वाटतो आणि अशांसाठी सरजोशी यांनी ‘आस्वाद’ उपहार गृहाची स्थापना केली.

उपहार गृहाचं उद्घाटन हे खुद्द हिंदूहृदयसम्राट आणि प्रत्येक मराठी मनावर राज्य करणाऱ्या माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झालं होतं.

आता तुम्ही आस्वादला भेट दिलीत, आणि तिकडे मिळणारे पदार्थ चाखलेत तर तुमच्या असं लक्षात येईल की हे पदार्थ अगदी घरी बनवले असल्याचा फील देतात. आणि त्या मागेही एक महत्वाचं कारण आहे.

या पदार्थांच्या सगळ्या रेसिपीज् ह्या सरजोशी कुटुंबातल्या गृहीणींच्या हाताने बनवलेल्या असतात. एखादा विशिष्ठ पदार्थ, एका विशिष्ठ प्रकारे आणि पारंपारिक पद्धतीने कसा बनवायचा ह्याचं ट्रेनिंग हॉटेलच्या शेफ्सना दिलं जातं. आणि मग तो पदार्थ हॉटेलच्या मेनूकार्डवर आणला जातो.

श्रीकृष्ण सरजोशी यांनी आपला हॉटेलचा डोलारा पुढे आपल्या मुलाला म्हणजेच सूर्यकांत सरजोशी यांना सांभाळायला दिला.

त्यानंतर सूर्यकांत सरजोशी यांनी हॉटेलच्या स्वरूपात अनेक वेगवेगळे बदल केले, नवनवीन उपक्रम राबवले. ह्यातला मोठा बदल होता तो म्हणजे हॉटेलच्या नूतनीकरणाचा.

आधी साधसंच असणारं फर्निचर बदलून सूर्यकांत सरजोशी यांनी हॉटेलला रॉयल मराठी लुक दिला आणि हॉटेलचं रूपच पालटून टाकलं. तुम्ही हॉटेलमध्ये एंट्री केल्या केल्या तुम्हाला जागोजागी फेटे, पगड्या, जिरेटोप लावलेले दिसतात, मराठमोळी नथ दिसते, मोठ्ठं सरस्वतीचं चिन्ह दिसतं आणि सगळी मराठी मनं तिथेच प्रसन्न होतात.

शिवाय खायचा प्यायचा तर काय विषयच नाय. मेनूकार्ड हातात घ्यायचा अवकाश… पोहे, उपमा, थालीपीठ, साबूदाणा वडा यापासून सुरवात होते ती पार… मिसळ, पिठलं भाकरी, डाळिंबी उसळ, भरीत, मराठमोळ्या भाज्यांपर्यंत लिस्ट संपत नसतेय. वाचाल तेवढं कमी.

सोबतीला पापड कुरडया, कोथिंबीर वडी, आंबेडाळ, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, उपवासाचे पदार्थ हेही आलेच.

हे सगळं खाऊन पोट भरत असतं तोच समोर थंडगार पीयूष, कोकम सरबत, श्रीखंड, आम्रखंड, पुरणपोळी, नारळी भात, खीर, बासुंदी, गुलाबजाम हे असे मन भरून खाण्याचे पदार्थ समोर दिसायला लागतात.

थोडक्यात काय, आस्वादला गेलं की पोटाला आणि नंतर येणाऱ्या सुस्तीला सुट्टी नाय.

हॉटेलची एक खासियत म्हणजे, हे हॉटेल फक्त हॉटेल पुरतं मर्यादित राहिलं नाहीये. म्हणजे ते तसं मर्यादित ठेवलं नाहीये. इथे अनेक वेगवेगळे उपक्रम सतत राबवले जात असतात. इथे सेलिब्रेट करता येण्यासारखी प्रत्येक गोष्ट सेलिब्रेट केली जाते. मग तो दिवाळी मोहोत्सव की धुंदुर मास.

धुंदुर मास हा सण अतिशय उत्साहात साजरा करण्याची पार पूर्वीची पद्धत आस्वाद हॉटेलनेच पुन्हा सुरू केली. तेही थाटात. हा सण साजरा करताना हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचं स्वागत अगदी थाटात केलं जातं. सनई चौघडे वाजत असतात, ग्राहकांना ओवाळलं जातं आणि त्यांच्यासमोर उत्तमोत्तम पदार्थांची मेजवानी ठेवली जाते. शिवाय धुंदुर मास हा सण, का साजरा करावा किंवा त्याचं शास्त्रीय महत्व काय हेही आलेल्या ग्राहकांना सांगितलं जातं.

अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता सूर्यकांत सरजोशी यांनी आस्वाद हॉटेलच्या विस्तारीकरणावरही भर दिलाय. आस्वाद ह्या हॉटेलच्या आता घाटकोपर आणि मुंबई एयरपोर्ट इथेही शाखा आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एयरपोर्ट, टर्मिनल २ ला बोर्डिंग गेट जवळ ही शाखा सुरु आहे.

२०१५ साली सगळ्या मराठी लोकांना अभिमान वाटावा अशीही एक गोष्ट घडली. लंडनचा The FoodieHub Global Awards हा फूड इंडस्ट्रीत मानाचा समजला जाणारा पुरस्कार, मास्टरपीस असलेल्या आस्वादच्या मिसळीला मिळाला होता.

The World’s Tastiest Vegetarian Dish

ह्या कॅटेगरी अंडर, आस्वादला हा अवॉर्ड मिळालाय.

फक्त मराठीच नाही तर इतर नॉन महाराष्ट्रियन लोकं आणि त्यातही भारता बाहेरचे लोकंही आस्वादच्या मिसळीवर फिदा असतात. त्यामुळे कोणाची आणि कुठली मिसळ जास्त भारी ह्यावर कितीही भांडणं केली तरी मिसळीला ग्लोबल केलं ते मुंबईच्या आस्वाद हॉटेलनेच.

आणि गेली ३५ वर्ष आस्वाद हॉटेल आपली अनेक वर्षांची मराठी संस्कृती, परंपरा आणि जिभेवरची मराठमोळ्या पदार्थांची चव, कायम टिकवून आहे आणि कायम टिकवत राहील हे नक्की.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.