ताज हॉटेल टाटांचे होते, पण राज्य करायचे अजित बाबुराव केरकर…!

मुंबईच भव्य दिव्य ताज हॉटेल. अखंड महाराष्ट्राची आणि भारताची शान. जमशेदजी टाटा यांच्या कष्टातून उभं राहिलेलं हॉटेल. याच हॉटेलमध्ये साधारण १९६१ साली केटरिंग मॅनेजर म्हणून एक एक तरुण दाखल झाला. मॅनेजर म्हणून दाखल झालेल्या याच तरुणाने पुढच्या काहीच वर्षात केवळ एका हॉटेलवर नाही तर टाटांच्या अख्खा हॉटेल इंडस्ट्रीज वर राज्य करायला सुरुवात केली होती. या व्यक्तीच नाव म्हणजे,

अजित बाबुराव केरकर.

जेआरडी टाटा यांच्यावर ईश्वरी देणगी म्हणा किंवा नशिबाचा हात म्हणा पण काहीतरी होतं हे नक्की. कारण त्यांना आपल्या कंपन्यांसाठी वेळोवेळी एका पेक्षा एक कुशल मॅनेजर मिळत गेले. यात टाटा कन्सल्टन्सीसाठी फकीरचंद कोहली, एसीसी सिमेंटसाठी सुप्रसिद्ध कायदेपंडित नानी पालकीवाला, टाटा स्टीलसाठी रुसी मोदी आणि ताज हॉटेलसाठी अजित बाबुराव केरकर.

१९६१ मध्ये केटरिंग मॅनेजर म्हणून ताज हॉटेलात आलेल्या केरकर यांनी एक-एक पायरी चढत १९७० पर्यंत ताज हॉटेलमधील आपलं वजन वाढवलं होतं. त्यावर्षी जेआरडी टाटा यांनी केरकर यांना ताजच्या इंडियन हॉटेल्सचे एम.डी. म्हणून नियुक्त केले. सोबतच त्यांना काम करण्यासाठी हवं असलेलं स्वातंत्र्य देखील देऊ केलं.

भरपूर स्वायत्तता आणि मिळालेले अधिकार, जोडीला जेआरडी टाटा यांना काय हवं आहे यामागचं कळलेलं गमक. यामुळे पुढच्या दोन दशकांमध्ये केरकर यांनी संपूर्ण भारतात आयएचसीएलची छाप सोडली.

एका हॉटेलमधून सुरुवात झालेल्या ताजच्या साम्राज्याचा विस्तार भारतभरात करून दाखवला होता. याचा पहिला विस्तार ताज महल टॉवर होता, ज्याची निर्मिती १९७२ मध्ये मुख्य हॉटेलच्या जवळचं झाला होता. पुढे १९९७ पर्यंत ताज ग्रुपजवळ जवळपास ६० हॉटेल आणि तब्बल ५२५ कोटी रुपयांचा टर्नओव्हर झाला होता. ताज हॉटेल आणि केरकर हे एकमेकांना पूरक शब्द झाले होते.

पण १९९७ मध्ये रतन टाटा यांनी याच केरकर यांच्या साम्राज्याला अवघ्या ११ मिनिटांमध्ये धक्का लावला होता. 

त्यावेळी असं म्हंटलं जायचं कि, आत्मविश्वासी आणि अनुभवी केरकर हे ६ वर्षांपूर्वी टाटा उद्योगाची धुरा हातात घेतलेल्या रतन टाटा यांना हॉटेल व्यवसायात नवखे समजायचे. आणि खरंतर तस होतं देखील. कारण रतन टाटा यांनी आपला जास्तीत जास्त वेळ हा टेल्को, टाटा स्टील्स आणि नेल्को अशा कंपन्यांमध्ये घालवला होता.

पण दुसऱ्या बाजूला कॉर्पोरेट राजकारणात मात्र रतन टाटा केरकर यांच्या पेक्षा किती तरी पावलं पुढे होते. त्यामुळेच केवळ ११ मिनिटांमध्ये त्यांनी अजित केरकर यांच्या साम्राज्याला धक्का लावला होता. यामागे त्यांची अचूक रणनीती आणि ६ वर्षांची मेहनत होती. सोबतच होतं एक पत्र. खरंतर हि चिट्ठीच केरकर यांच्यासाठी सगळ्यात मोठा धक्का होता.

जानेवारी १९९७ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि रतन टाटा यांच्या जवळ एक पत्र आले. यात लिहिलं होतं कि केरकर आणि ताज हॉटेलच्या काही मुख्य कर्मचाऱ्यांनी मिळून बेकायदेशीर पद्धतीने १०० कोटी रुपये देशाबाहेर गुंतवले आहेत. आणि हि गुंतवणूक परदेशी गुंतवणूक नियमन कायदा अर्थात फेराचं उल्लंघन करणारी आहे.

हि गोष्ट जरी अर्थमंत्र्यांच्या लक्षात आली असली तरी त्यांनी त्याचा गवगवा न करता थेट रतन टाटा यांना सांगितल्यामुळे त्यांनी लगेच पावलं उचलायला सुरुवात केली. टाटा यांनी आपल्या टीमला या पत्राबाबत सांगितले. इथं देखील नानी पालखीवाला टाटांच्या मदतीला धावून आले. त्यांनी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या समोर सिद्ध केले कि, अजित केरकर यांनी ट्रॅव्हल्स कंपनी कॉक्स अँड किंग्सच्या भारतीय शाखांमध्ये गुंतवणूक केली आहे, त्यासाठी त्यांनी ताज हॉटेलच्या गुंतवणूक विभागाचा वापर केला.

या माध्यमातून त्यांनी ट्रॅव्हल्स कंपनीचे शेअर्स खरेदी केले आणि पुन्हा आपल्या कुटुंबातील सदस्यांना कमी किंमतीमध्ये विकले. या व्यवहारामधून ताज हॉटेल्सला लाखो रुपयांच नुकसान सहन करावं लागलं आहे. 

यानंतर डोईजड होत असलेल्या केरकर यांना हटवण्यासाठी रतन टाटा यांनी एक मिटिंग बोलावली. २८ ऑगस्ट १९९७ ला झालेल्या या मीटिंगमध्ये ६५ वर्षीय केरकर यांच्या जागी दुसरे एम.डी. निवडले जाणार होते. केरकर या मीटिंगला उपस्थित नव्हते. त्यामुळे पुढची मिटिंग २ सप्टेंबर रोजी बोलावण्यात आली होती.

२ सप्टेंबरच्या या मिटिंगमध्ये सुरुवातीला केरकर यांचा राजीनामा मागण्यात आला. त्यावेळी केरकर यांनी आपलय मर्जीतील लेनी मेनेजेस यांना एम.डी. बनवण्यासाठी प्रस्ताव दिला, पण तो नाकारण्यात आला.

तेव्हा केरकर यांनी बोर्डासमोर ७५ वर्षापर्यंत बिगर-कार्यकारी अध्यक्ष बनून राहण्याच्या नियमाचा हवाला दिला. मात्र बोर्डाने हा प्रस्ताव देखील फेटाळून लावण्यात आला. यानंतर रतन टाटा यांनी ताज हॉटेलची सूत्र हातात घेतली. या सगळ्या घडामोडी अवघ्या ११ मिनिटांमध्ये उरकल्या आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मिटिंग स्थगित करण्यात आली.

पुढे केरकर यांनी रतन टाटा-अजित केरकर या वादाला सार्वजनिक केलं, तेव्हा टाटा यांनी देखील केरकर यांच्यावरील झालेली चौकशी सार्वजनिक केली. त्यामुळे केरकर शांत झाले आणि शेवटी रतन टाटा हे नाव टाटा सन्स आणि ग्रुपचे प्रमुख बनले.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.