ट्विटरच्या एका डावात गड्यानं अख्ख क्रिप्टो मार्केट, सरकारं, कंपन्या खिश्यात घातलेत

लिंबू १० रुपयांना एक झालाय, पेट्रोल १२० रुपय लिटर झालय अन् मस्कने काल रात्री ट्विट करुन सांगितलय मी ट्विटर विकत घेतलय. ट्विटर विकत घेण्याची किंमत किती आहे तर ४३.३९ बिलीयन डॉलर. आत्ता एक बिलीयन म्हणजे किती तर १०० कोटी. ४३ बिलीयन म्हणजे किती तर ४३ गुणीले १०० म्हणजे ४,३०० कोटी डॉलर आत्ता रुपयात गुणाकार करायचा असेल तर याच ४ हजार ३०० कोटींना ७६.५२ नी गुणा..

उत्तर येतं,

३ लाख २९ हजार ३६ कोटी रुपये..

इलॉन मस्कने एका रात्रीत मी ३ लाख २९ हजार ३६ कोटी रुपये देवून ट्विटर विकत घेतलं अस ट्विटरवरून सांगून टाकलं. आपल्याकडे ही बातमी आली आणि मग लोकांनी ट्रोलिंग वगैरे सुरू केलं. काही दिवसांपूर्वी मस्कने एक ट्विट करुन सांगितलेलं की ट्विटरला इडिट करायचं बटणं हवय की नको. आत्ता लोकं म्हणायला लागलेत की मस्कने एक बटण बदलण्यासाठी इतके पैसे लावलेत.

पण खेळ आपल्याला वाटतो तितका छोटा आणि सोप्पा नाहीय. हाच आपण या लेखातून समजून घेवूया. त्यापूर्वी संपूर्ण टाईमलाईन पाहूया…  

  • ३१ जानेवारी २०२२ पासून, इलॉन मस्कने ट्विटरचे शेअर्स खरेदी करायला सुरुवात केली.
  • १४ मार्चपर्यंत इलॉन मस्कने ट्विटरचे ५ टक्क्यांपेक्षा जास्त शेअर्स विकत घेतले.  
  • अमेरिकेतला नियम असा की, तसा तर आपल्याकडेही असाच नियम आहे की, कोणत्याही सूचिबद्ध कंपनीत एखाद्याने ५ पेक्षा टक्के मालकी विकत घेतली तर त्याची माहिती त्याच वेळी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनला द्यावी लागते.
  • म्हणजे इथे प्रत्यक्षात १४ मार्च रोजीच मस्कने एसईसीला रीतसर ट्विटरमधल्या आपल्या मालकीविषयी कळवायला हवं होतं. पण हा नियम इलॉन मस्कने पाळला नाही. याबाबत इलॉन मस्कवर अमेरिकेत केस देखील चालू आहे. 
  • मग २४ मार्चला इलॉन मस्कने ट्विट करत ट्विटरवर टीका करायला सुरुवात केली. पण तेंव्हा मस्कने  लपवून ठेवलं कि ते हळूहळू ट्विटरचे शेअर्स विकत घेत होते.
  • २४ मार्चला मस्कने ट्विट केलं कि, ट्विटरच्या अल्गोरिदममधील पूर्वाग्रहामुळे सोशल मीडिया युजर्सवर त्याचा प्रभाव पडतो, त्याची मला काळजी वाटते.
  • मग दुसऱ्याच दिवशी २५ मार्च रोजी असं ट्विट केलं की, लोकशाहीसाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आवश्यक आहे. ट्विटर या तत्त्वाचे काटेकोरपणे पालन करतं असं तुम्हाला वाटतं का? 
  • परत मग २६ मार्चला ट्विट केलेलं की, “नवीन प्लॅटफॉर्म आवश्यक आहे का?”

या सर्व टीकेनंतर ४ एप्रिल रोजी मस्कने ट्विटरचे शेअर्स विकत घेतले हे जाहीर झालं.

त्याच दिवशी त्याने ट्विट करत प्रश्न विचारला की, ट्विटरवर एडिट हे बटण हवंय का ? त्यावर चांगला रिस्पॉन्स आला होता. 

मग ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनी ट्विटरच्या युजर्सला विचार करून उत्तर द्या अशी सूचना केली. याच दिवशी पराग अग्रवाल यांनी इलॉन मस्क यांना ट्विटरच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मेंबरशीपची ऑफर दिली. 

९ एप्रिल रोजी मस्क यांनी ट्विटरच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मेंबरशीपची ऑफर नाकारली.

पण कंपनीने ही बातमी दाबून ठेवली आणि १० एप्रिल रोजी जाहीर केली. 

१४ एप्रिलला इलॉन मस्कने मोठाच बॉम्ब टाकला तो म्हणजे त्याने थेट ट्विटर कंपनीच खरेदी करण्याची ऑफर दिली. ट्विटरची १०० टक्के मालकी त्याला हवी होती. मस्कने ट्विटर विकत घेऊ नये म्हणून कंपनीने बराच प्रयत्न केला. पण इलॉन मस्क देखील हात धुवून ट्विटरच्या मागे लागला आणि शेवटी कंपनीने हात टेकले आणि इलॉन ट्विटरचा मालक बनला. मस्कने रात्री उशिरा ट्विट करून याची घोषणा केली.

आता प्रश्न येतो तो म्हणजे, ट्विटरमध्ये असं काय आहे कि, इलॉन मस्क कोणत्याही परिस्थितीत ट्विटरला विकत घ्यायच्या मागे लागला होता ?

हे जाणून घेणं गरजेचं झालं कारण, हे प्रकरण वाटतंय तितकं सोपं नाहीये.

आता ट्विटरचे युजर्स भलेही फेसबुक, युट्युब, व्हाट्सअँप, इंस्टाग्रामच्या तुलनेने खूप कमी आहेत. पण तरी ट्विटरचे युजर्स जे आहेत ते प्रॉमिनंट पर्सनॅलिटीज मध्ये काउन्ट केले जातात. म्हणजेच ज्यांना सोशली ऍक्टिव्ह राहायला आवडतं, स्वतःची मतं सांगायला आवडतं. 

थोडक्यात ट्विटर वापरणारी मंडळी हुशार समजली जातात त्यामुळे अर्थातच ट्विटरला मोठा मान आहे.   

हीच ट्विटरची ताकद इलॉन मस्कला समजली. पण इलॉन मस्कची श्रीमंती सोडली तर त्याची सोशल मीडियावरची ताकद काय कमी नाहीये. इलॉन स्वतः ट्विटरचा मोठ्या प्रमाणावर वापर करतो त्याला  ट्विटरवर जवळपास ९ कोटी फॉलोअर्स आहेत.

त्याच्या एका ट्विटमुळे क्रिप्टोकरन्सीच्या किंमती खाली वर होतात. Dogecoin आणि Shiba Inu सारख्या Mime cryptocurrencies ही याची उदाहरणे आहेत.

आता इलॉन मस्क ट्विटरचे मालक बनलेत, त्यानंतर ट्विटरमध्ये काय बदल होतील ? 

मस्क यांनी ट्विटमध्ये असं आश्वासन दिलंय की, ट्विटरमध्ये आणखी नवीन फिचर्स आणले जातील. स्पॅम बोट्स, सर्व व्यक्तींचं ऑथेंटिकेशन अशी बरीच कामं त्यांच्या डोक्यात आहेत काय बदल होणं अपेक्षित आहे त्यामध्ये महत्वाचं म्हणजे, ट्विटरवरून फेक न्यूज हटवल्या जातील.  दुसरं म्हणजे ट्विटर हे आता पोलिटिकल अजेंड्यासाठी वापरलं जाणार नाही.

ट्विटर, फेसबुक सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इतके शक्तिशाली आहेत की ते अनेक देशांच्या सरकारांवर प्रभाव टाकतात.

विशेषतः निवडणुकीच्या काळात ही प्रचाराची साधने बनतात. त्यात ट्विटरवर तर बायस्ड असल्याचे आरोप होत असतात. सत्ताधारी पक्षांशी त्यांच्या व्यावसायिक हितसंबंधांसाठी विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम करतं. असाही आरोप ट्विटरवर होत असतो. 

जेव्हा जेव्हा Twitter सारखे प्लॅटफॉर्म ओपन स्पिचकडे जाण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांचे व्यावसायिक हित आडवे येतात. पण इलॉन मस्क ज्या प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करत असतात त्यानुसार ते आता सरकारच्या दबावाला बळी पडणार नाहीत अशीही एक अपेक्षा व्यक्त केली जातेय.

तर आता दुसरीकडे असाही प्रश्न उपस्थित केला जातोय की, इतकं पॉवरफुल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एका व्यक्तीच्या इच्छेनुसार चालवायचे का?

काहीजण ट्विटर इलॉन मस्क यांच्याकडे गेल्यावर संभाव्य तोटे सांगतायत ते म्हणजे, इलॉन मस्क आता क्रिप्टोकरन्सीला प्रोत्साहन देण्यासाठी ट्विटरचा वापर करू शकतात. कारण ट्विटर हा प्लॅटफॉर्म क्रिप्टोकरन्सीला आणि विशेषतः बिटकॉइनला लॉन्चपॅड ठरणार आहे. हे तर जगजाहीर आहे की, क्रिप्टो मार्केट हे इलॉन मस्क यांचं टार्गेट राहिलेलं आहे.

आता इलॉन मस्क ट्विटरमध्ये हे अपेक्षित असलेले बदल करतील का ? त्याचे काय फायदे -तोटे होतील ते हळूहळू कळेलच… पण ट्विटर घेवून मस्कने लय मोठ्ठा खेळ केला आहे हे नक्की.. 

 हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.