इलॉन मस्क गेट्सपेक्षा श्रीमंत कुणाच्या जीवावर झाला?

जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस बनायला काय लागतं? आमचे राइजिंग स्टार आणि प्रातः स्मरणीय अभियंते आणि आधुनिक काळातील चाणक्य इलॉन मस्क हे नुकतेच जगातील दोन नंबरचे श्रीमंत झालेत. दोन नंबरचे म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचे म्हणायचं… मागच्या पिढीसाठी बिल गेट्स हा जसा आदर्श होता त्याच्यासारखं आता आम्हाला इलॉन मस्कच्या नावाने दवंड्या मारायला लागणारेत.

पण तरीही बिल गेट्सने दर कॉम्प्युटरमध्ये आपली सिस्टीम आणली. शाळेपासून ते नासापर्यंत कोणताही कॉम्प्युटर सुरु केला की ‘टूरुरुहुं…’ वाजून चार रंगाचे मायक्रोसॉफ्टचे लोगो दिसायचे. वाटायचं, बरोबरय. या माणसानं एवढं तंत्रज्ञान आपल्या हातात दिलं.  हा जगातला श्रीमंत माणूस असलाच पाहिजे.

इलॉन मस्कचं काय? इंजिनीरिंग करताना दर मास्तरनी त्याचं नाव सांगून बघा-बघा असं म्हणत आम्हाला चांगली गिल्ट दिलेली.

त्याची मंगळावर गाड्या चालवणे किंवा चंद्रावर शेती करणे अशा टूमा आम्ही ऐकून होतो. विजेवर चालणाऱ्या भल्या थोरल्या गाड्या आणि याने बनवण्याच्या त्याच्या गोष्टी फेमस. पण श्रीमंत व्हायला माणसाला जगासाठी कायतरी घेऊन यायला लागतं ना ? काहीतरी ?

म्हणजे बघा, मस्क जर दोन नंबरचा असल तर पहिला आहे अमॅझॉनचा संस्थापक जेफ बेझोस. त्याच्या कंपनीकडून घड्याळापासून शिमग्याच्या गौऱ्या सगळं आम्ही घेतलेलं आहे. कुठं भेटत नाहीत असले नादभरी शर्ट आणि घड्याळं स्वस्तात देतो म्हणून या माणसाचा आपल्याला अभिमानय.

त्याच श्रीमंत माणसांच्या यादीत वरखाली आलेला मार्क झुकरबर्ग दररोज न चुकता आमच्या आयुष्याचे चार तास मारत असतो. या माणसामुळं आम्ही नाय नाय त्या लोकांना भेटलोय. कित्येक लोकांना रोज ‘झालं का जेवण’ विचारायची सोय त्यानं करून दिलीय.

पण इलॉन मस्कने असं काय दिलं की तो जगातला सगळ्यांत मोठा दोन नंबरचा माणूस झालाय?

त्याच्या स्वतःचा स्ट्रगल मोठा होता. १९७१ साली आफ्रिकन बापाच्या आणि कॅनडियन आईच्या पोटी साऊथ आफ्रिकेत त्याचा जन्म झाला. काही दिवस प्रेटोरिया विद्यापीठात काढल्यानंतर तो वयाच्या १७ व्या वर्षी अमेरिकेच्या प्रसिद्ध क्वीन्स विद्यापीठात आला.

तिथं त्यानं २ वर्ष काढली ना काढली ते विद्यापीठ बदलून घेतलं. १९९५ साली पीएचडी केली. पण ती पूर्ण करायच्या आतच बिझनेस करायचा म्हणून त्यानं झिप-टू हि कंपनी सुरु केली. हि कंपनी त्या काळी वेब डेव्हलपमेंटची कामं करायची. वस्तू कशा दिसाव्यात म्हणजे लोकं त्याला घेतील याची चांगली अक्कल मस्कला होती. त्यामुळं त्याला मोठमोठी कामं भेटली.

त्याची प्रगती बघून १९९९ साली कॉम्पॅक या मोठ्या कंपनीने त्याची कंपनी ३०७ मिलियन डॉलर्सला घेतली. इथून त्याच्या जीवनात पाण्यासारखा पैसा यायला सुरुवात झाली.

एक्स डॉट कॉम ही ऑनलाईन बँक त्याने सुरु केली. त्या काळात लोकं ऑनलाईन व्यवहार करायला घाबरायचे. पण त्याने याची रचना लोकांना विश्वासू वाटेल अशी केली. इबेने २००२ च्या ऑकटोबरमध्ये हि कंपनी विकत घेतली.

२००२ च्या मी मध्ये लगेच त्याने स्पेस एक्स संस्था स्थापन केली. तो त्याचा सीइओ आणि मेन डिझायनर होता. त्याच काळात त्यानं टेस्ला कंपनी जॉईन केली. २००८ मध्ये तो या कंपनीच्या सीइओ पदापर्यंत आला. त्याच्यात क्षमता होती हे खरंच…

आता आमच्या अक्ख्या वर्षाचा पगार कमवायला या माणसाला १५ सेकंदसुद्धा लागत नाहीत.

जगातल्या कितीतरी देशांमधली सरकारे मिळून जेवढं कमावतात त्याहून जास्त या एकट्या माणसाची एका वर्षाची कमाई आहे.

अजून काही देशांचा जीडीपी नाही एवढं तो एका महिन्यात छापतो. हे येतं कुठून? जर ‘जिद्द आणि परिश्रम, कठोर मेहनत’ याचं उत्तर असेल तर तुमच्याइतके भोळे तुम्हीच ….

बाकीच्या नाही त्या प्रकरणात त्याची मते सोडून द्या. त्याचं ट्विटर हे ट्रम्प तात्यांच्या विनोदांची वही दिसते. पण २०१८ मध्ये ४२० डॉलर्स प्रतिशेयर या दराने टेस्ला कंपनीचा खरेदीदार शोधला आहे असं ट्विट केलं होतं.

अमेरिकेच्या सिक्युरिटी आणि एक्सचेंज कमिशनने लगेच याचे पुरावे मागितले. वास्तविक त्याला एवढी रक्कम कुणीच दिली नव्हती.

आपल्या कंपनीचे शेयर खपावेत म्हणून त्याने सोडलेला हा जुमला होता.

त्याला तेव्हा काही काळासाठी राजीनामा द्यावा लागला होता. त्याने लगेच सरकारशी सेटलमेंट केली. (अमेरिकेत कायदेशीररित्या पैसे भरून गुन्हे मागे घ्यायला लावता येतात!)

पण तेव्हापासून ट्विटरने त्याच्या ट्विट्सवर काही काळ मर्यादा आणल्या होत्या. 

आज हा पठ्ठ्या ४९ वर्षांचा आहे. तो ४८ वर्षांचा होता तोपर्यंत त्याच्याकडं एवढा पैसे नव्हता. एका वर्षात त्यानं १०० बिलियन डॉलर्स छापले आहेत. १००० अब्ज रुप्यांच्याहून जास्त! कोरोना काळात अख्ख जग बंद असताना. फक्त मागच्या एका आठवड्यात त्याच्या टेस्ला कंपनीच्या शेयर्सची किंमत तब्बल ३३ टक्क्यांनी वाढली आहे. याचे तब्बल २० टक्के शेयर्स त्याने स्वतःकडे ठेवले आहेत.

या कंपनीवर २०१६ पासून कामगारांची पिळवणूक होत असल्याचे आरोप आहेत. अनेकदा कामगारांचा मृत्यूही झाला आहे. एवढं करूनही टेस्लाकडून फार कमी प्रमाणात गाड्यांचे उत्पादन केले जाते.

इतर अनेक कंपन्या याहून चांगल्या इलेकट्रीक गाड्या विकत आहेत. पण त्यांच्याकडे कमी पडते ती मार्केटिंगच्या कल्पकतेची.

जगातील पेट्रोलचे कमी होणारे साठे वाचवू म्हणून त्याने टेस्लाचे मार्केटिंग केले. ही कंपनी आज दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांकडून लूट करण्याचे आरोप होत आहेत. बोलिव्हियाच्या राष्ट्रपती इवो बोरालेस यांनी टेस्ला कंपनी त्यांच्या देशातून लिथियमचे साठे उकरून नेट असल्याचा आरोप केला होता.

“इंडियन आहोत म्हणून टेसलाच्या कंपनीचा माणूस आम्हाला कवडीमोल समजतो.”

अशी उद्विग्नता त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळं निवडून आल्याल्या त्यांनी इलॉन मस्कचा डोळा असणाऱ्या लिथियमचे राष्ट्रीयीकरण केले होते.

दर मिनिटाला साडेचार हजार डॉलर्स कमावणारा हा माणूस – त्याचे अकाउंट्स तो झोपलेला असतानाही सुरु असतात. त्याच्या कंपन्यांची संपत्ती एकाच वर्षात सहा पटीने वाढली आहे. तेही डोक्यात चिप असणारे डुक्कर बनवायच्या किंवा गरीब देशांना फुकट व्हेंटिलेटर देण्याच्या बाता सोडून. अनेक गरीब देशांच्या प्रमुखांनी त्याचा यासाठी पाठपुरावा केला होता. पण या योजना कधीच प्रत्यक्षात आल्या नाहीत.

साहजिक आहे, त्याचा उपयोग फक्त जुमला म्हणून असतो. त्याने अशी कुठलीही घोषणा केली ती टेस्ला कंपनीचे शेयर्स गगनाला भिडतात. सामान्य लोक आपल्या कष्टाचा पैसा त्यात ओततात.

या पैशाने जगात कोणतीही नवी वस्तू बनत नाही. पण यामुळं या कंपनीच्या नावे मोठा सट्टाबाजार खेळला जातो.

म्हणूनच काहीही उत्पादने मार्केटमध्ये न आणता अशा लोकांची संपत्ती सदोदित वाढत राहते. आपली उत्पादने चांगली असतील याच्यापेक्षा चांगली दिसतील यावरच त्यांचा भर असतो हे त्यांच्या वरिष्ठ संचालकाने कबूल केलं होतं.

Profiting Without Producing: How Finance Exploits Us All हे एक पुस्तक आहे. मराठीत म्हणायचं तर “बिनाउत्पादनाचा नफा: आपला बाजार कसा उठवतो” हे कोस्टास लॅपवित्सास यांनी लिहिलेलं पुस्तक. त्यात या धंद्याचं मस्त वर्णन केलंय.

त्यामुळं आपला रोल मॉडेल इलॉन मस्क लिहिताना थोडं जपून …!

हे हि वाच भिडू:

 

1 Comment
  1. Akshay Pujari says

    भिडू, Elon Musk च्या केसाची (डोक्यावरच्या) सर तरी आहे का तुमच्या साईट ला हे बघा आधी, आणि मग लिहा! लिहिण्याआधी माहिती तरी घ्या किमान..त्याचं कर्तृत्व समजून घ्या मग असं फालतू लिहा. उचलली जीभ, लावली टाळ्याला.
    असो—

Leave A Reply

Your email address will not be published.