एकटे राज ठाकरे नाहीत, हे आहेत मनसेचे टॉप 10 नेते आणि असा आहे त्यांचा इतिहास

राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधल्या भाषणानंतर राज्यातील वातावरण बदललं. अक्षय्यतृतीयेला होणाऱ्या महाआरत्या पुढे ढकलल्या असल्या, तरी राज ट्विटरवरुन काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर राज यांच्या विरोधात औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. तर मनसेच्या नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांना नोटीशी पाठवण्यात आल्या आहेत.     

राज यांना अटक होईल का? अशी चर्चा सुरू झाल्यावरच राज्यभरात मनसे कार्यकर्ते आणि नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात आणि राज यांच्या निवासस्थानाबाहेर गर्दी केली आहे.

मनसे सध्या पुन्हा एकदा फॉर्मात आली असली, तरी आणखी एक प्रश्न अधोरेखित होतोय, तो म्हणजे…

राज ठाकरे सोडून मनसेमध्ये दुसरं आहे तरी कोण?

मनसेला जवळपास १६ वर्षे पूर्ण झालीत…या प्रवासात राज ठाकरेंना अनेक महत्वाचे शिलेदार सोडून गेले पण काही धडाडीचे नेते राज ठाकरेंच्या अजूनही सोबत आहेत, ज्यांना मनसेमधील पहिल्या फळीतील नेते म्हणून ओळखलं जातं असे १० नेते…

१) बाळा नांदगावकर

राज ठाकरेंसोबत शिवसेना सोडणारा नेता म्हणजे बाळा नांदगावकर. प्रत्येक प्रसंगात राज ठाकरे यांच्या सोबत ते सावली बनून राहतात. राज ठाकरे यांच्या अत्यंत मर्जीतले म्हणून बाळा नांदगावकर यांच्या शब्दाला पक्षात खूप मान आहे. राज्यात मनसेचं वारं असताना निवडून आलेल्या पक्षाच्या आमदारांमध्ये बाळा नांदगावकर यांचाही समावेश होता. 

आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये मनसेला किंगमेकर नव्हे तर किंग व्हायचंय, अशी भूमिका नांदगावकर ठेवून आहे त्यामुळे महानगरपालिकेची निवडणूक रंगतदार ठरणार आहे. 

इंग्लंड आणि अमेरिकेच्या धर्तीवर मनसे शॅडो कॅबिनेट संकल्पना राबवते.

२०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर २०२० मध्ये मनसेने शॅडो कॅबिनेटची घोषणा केली. कॅबिनेटमध्ये पक्षाचे महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश आहे.  या कॅबिनेटला प्रतिरुप कॅबिनेट असं नाव दिलं गेलं.  शॅडो कॅबिनेटमध्ये गृह खातं मनसे नेते बाळा नांदगावकर यांना देण्यात आलं.. थोडक्यात राज्याच्या गृह खात्यावर बाळा नांदगावकरांचं लक्ष असणारे.

२) नितीन सरदेसाई

मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई राज ठाकरेंचे कॉलेजपासूनचे मित्र. राज ठाकरे यांच्यासोबत ते   “मातोश्री इन्फ्रास्ट्रक्चर” नावाच्या रिअल इस्टेट एजन्सीमध्ये पार्टनर आहेत.  २००६ मध्ये मनसेच्या स्थापनेनंतर, पक्षाने २००९ मध्ये पहिली विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यात सरदेसाई देखील होते. ते मुंबईतील माहीम मतदारसंघातून निवडून आले होते. 

त्यांच्याकडे सेनेचं सरचिटणीस पद होतं, तसेच ते पक्षाचे मुख्य समन्वयक आहेत आणि सेनेची वाहतूक क्षेत्रातील कामगार संघटना जी हवाई सेवा कर्मचार्‍यांसाठी काम करते त्याचे नितीन सरदेसाई हे अध्यक्ष आहेत. 

२००८ मध्ये जेट एअरवेजने जवळपास २ हजारहून अधिक कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकले होते, तेंव्हा सरदेसाई यांच्या नेतृत्वात मनसेच्या खळ्ळखट्याक आंदोलनामुळे त्या हजारो कर्मचाऱ्यांना  परत घेण्यात आले होतं आणि हे आंदोलन मनसेचं मोठं यश मानलं जातं. 

सद्द्याला मनसेच्या शॅडो कॅबिनेटमध्ये नितीन सरदेसाई यांना वित्त आणि गृहनिर्माण खातं देण्यात आलं आहे.

३) अनिल शिदोरे

मनसेचे नेते व प्रवक्ते म्हणजेच अनिल शिदोरे. पक्षाच्या शॅडो कॅबिनेटमध्ये शिदोरे यांना मराठी भाषा, माहिती तंत्रज्ञान हे खातं देण्यात आलं आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणारे आणि अभ्यासू नेते म्हणून  शिदोरे हे अग्रस्थानी असतात. असं सांगितलं जातं कि राज ठाकरेंच्या भाषणांवर, त्यांच्या वक्तव्यांवर, प्रतिक्रियांवर अनिल शिदोरे यांचं विशेष लक्ष असतं. 

२००८ साली राज ठाकरेंनी ब्लू प्रिन्टची घोषणा केली. या ब्लू प्रिन्टमध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक क्षेत्राची, प्रत्येक विभागाची माहिती आहे. इतिहास आणि भविष्य याची मांडणी आहे. ही ब्लू प्रिन्ट २०१४ साली जाहीर करण्यात आली होती. अनिल शिदोरे यांच्याच नेतृत्वाखाली मनसेची ब्ल्यू प्रिन्ट तयार झाली होती.

४) मनसेचे ‘वन मॅन आर्मी’ आमदार राजू पाटील.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने १०० हुन अधिक जागांवर उमेदवार उभे केले होते मात्र त्यातून फक्त मनसेचे एकमेव उमेदवार निवडून आले ते म्हणजे आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील. 

राजू पाटील यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवत शिवसेनेचे उमेदवार रमेश म्हात्रे यांचा ७ जाहीर मतांनी पराभव केला होता.

कोरोनाकाळात मनसे रस्त्यावर उतरून कामं करीत होती याचं उत्तम उदाहरण म्हणजे राजू पाटील. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी आमदार राजू पाटील यांनी कोरोनाच्या दोन्ही लाटेत  स्वतःचं खाजगी आर. आर. हे खाजगी हॉस्पिटल महापालिकेच्या हवाली केलं होतं. 

५) मनसेची आणखी एक धडाडीचे नेते म्हणजे संदीप देशपांडे

संदीप देशपांडे हे मनसेचे सरचिटणीस आणि प्रवक्ते आहेत. माध्यमांमध्ये मनसेचे कायम बाजू लावून धरणारे, पक्षाचा एक सक्षम सक्रिय नेता म्हणून त्यांना ओळखलं जातं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकंदरीतच महाविकास आघाडीचे कडवे टीकाकार म्हणून संदीप देशपांडे यांचं नाव कायमच पुढे असतं. त्यांनी अनेक मनसे स्टाईल आदोलनं गाजवली आहेत.

२०१७ मध्ये काँग्रेस कार्यालय तोडफोड प्रकरणी संदीप देशपांडे यांना आर्थर रोड कारागृहात ४ दिवसांचा तुरुंगवास देखील भोगावा लागला.

२०१९ मध्ये जेंव्हा राज ठाकरे यांना कोहिनूर मिलप्रकरणी ईडी चौकशीला सामोरं जावं लागलं होतं तेंव्हा मनसैनिक आक्रमक झाले होते. अनेक कार्यकर्त्यांनी देशपांडे यांच्या नेतृत्वात EDiot Hitler’ (इडियट हिटलर) असा उल्लेख असलेला टी शर्ट परिधान करून निषेध व्यक्त केला होता. तेंव्हा देखील पोलिसांनी देशपांडे यांना ताब्यात घेतलं होतं.

ज्येष्ठ लेखिका शोभा देशपांडे यांच्यासोबत मुंबईत मराठी भाषेत बोलण्यास नकार देणाऱ्या सराफाला मनसेने मारहाण केली होती. या घटनेच्या निमित्ताने मराठीच्या मुद्द्यावरून मनसे मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक झाली होती आणि त्यात संदीप देशपांडे यांचा पुढाकार होता..

६) अभिजीत पानसे

मनसे नेते अभिजित पानसे हे राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक आहेत. याशिवाय त्यांची ओळख म्हणजे अभिजित पानसे हे एक भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक आहेत, जे प्रामुख्याने मराठी चित्रपटातील त्यांच्या कामासाठी ओळखले जातात. 

२०१९ मध्ये अभिजित पानसे दिग्दर्शित शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ हा बायोपिक आला. ज्यात नवाजुद्दीन सिद्दीकीने बाळासाहेब ठाकरेंची भूमिका साकारली होती. 

६) अविनाश जाधव

मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव. मनसेतील सक्रिय नेत्यांपैकी एक. अविनाश जाधव यांच्यावर अनेक राजकीय गुन्हे दाखल आहेत.  

करोनाच्या काळात ठाणे महापालिकेने काही परिचारिकांना नियुक्त केले होते. त्यानंतर ठेकेदाराच्या माध्यमातून काम करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात होता. त्याविरोधात अविनाश जाधवमहापालिकेच्या कोव्हिड रुग्णालयासमोर आंदोलन केले होते. त्या आंदोलनानंतर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी जाधव यांना पोलीस कोठडी सुनावली होती..त्यानंतर मनसैनिक आक्रमक झाल्याचं दिसून आलं होतं. 

८) अमेय खोपकर

अमेय खोपकर हे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आहेत….याशिवाय ते मनसेत बरेच ऍक्टिव्ह असतात. अमेय खोपकर मनसेचे उपाध्यक्ष असून मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेचे ते अध्यक्ष आहेत. पक्षाने त्यांना सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार खात्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी दिली.  आतापर्यंत त्यांनी मराठी सिनेमासृष्टीसाठी बरंच काम केलं आहे. 

त्यातीलच एक महत्त्वाच्या कामाचा उल्लेख म्हणजे त्यांनी मराठी चित्रपटाला मल्टिप्लेक्स मध्ये prime time show मिळायला हवा यासाठी आंदोलन केलं. 

९) अविनाश अभ्यंकर

मनसेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक म्हणजे अविनाश अभ्यंकर. त्यांच्यावर पक्षाने आगामी मनगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य मुंबईची जबाबदारी दिली आहे. मनसेच्या शॅडो कॅबिनेट मध्ये अभ्यंकर यांना महसूल आणि परिवहन खातं देण्यात आलं आहे. त्यांनी एसटी युनियन, बेस्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम पहिले आहे. 

१० ) प्रकाश महाजन 

मनसेतील आणखी एक महत्वाचे नेते म्हणजे मनसेचे राज्य राज्य प्रवक्ते प्रकाश महाजन. याशिवाय त्यांची ओळख म्हणजे ते प्रमोद महाजन यांचे बंधू तर  भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे ते मामा आहेत.

 प्रकाश महाजन यांना २००९ मध्ये मनसेतून निलंबित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला मात्र २०११ मध्ये शिवसेना सोडली आणि पुन्हा मनसेतच परत आले.  

“ठाकरे नावात काय जादू असते हे मला कळले आहे. राज ठाकरे हेच हिंदू जननायक आहेत. मी अमित ठाकरे यांच्या मुलांच्या हाताखाली देखील काम करायला तयार आहे”,असं विधान महाजन यांनी अलीकडेच केलं होतं..म्हणूनच ते स्वतःला राजसाहेबांच्या कट्टर सैनिक म्हणवतात.  

तर हे मनसेतील पहिल्या फळीतील १० महत्वाचे नेते आहेत.. ज्यांनी पक्षातील स्वतःचं महत्व टिकवून ठेवलं आहे. आणि याच नेत्यांमुळे फक्त एकच आमदार असुनही “मनसे” भक्कम विरोधक म्हणून उभी आहे..

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.