सुप्रिया सुळे लोकसभेत म्हणाल्या होत्या, माझे वडील नास्तिक तर आई श्रद्धाळू आहे…

”शरद पवार नास्तिक आहेत हे मी म्हणालो ते त्यांना झोबलं. परंतु, सुप्रिया सुळे यांनीच लोकसभेत शरद पवार हे नास्तिक होते असं सांगितलं होतं. आता पुजेचे फोटो टाकून नाटकं करत आहेत.”

असं म्हणत शरद पवार नास्तिकच आहेत याचा पुनरूच्चार राज ठाकरे यांनी औरंगाबादेतील १ मे च्या सभेत केला.

“शरद पवारांचा मंदिरात हात जोडतांना फोटो मिळणार नाहीत. ते धर्म देव वेगैरे मानत नाहीत. शरद  पवार हे स्वतः नास्तिक असल्यामुळे ते नास्तिकतेच्याच दृष्टिकोनातून धर्माकडे पाहतात”

अशी टीका याआधी राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर ठाण्यातील उत्तर सभेत केली होती.

उत्तर सभेतील टीकेनंतर स्वतः शरद पवार यांनी राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिले होते. 

“मी माझा धर्म आणि देव याचं प्रदर्शन करत नाही. मी आजपर्यंत १३-१४ वेळा निवडणुकीला उभा राहिलो तेंव्हा प्रत्येक निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ कोणत्या मंदिरातून फुटतो हे बारामतीच्या लोकांना जाऊन विचारा. आम्ही कधीही त्याचा गाजावाजा केला नाही” 

असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. 

मात्र यावेळी शरद पवार यांनी ते नास्तिक की आस्तिक या मुद्याला पद्धतशीरपणे बगल दिली होती. 

राज ठाकरेंनी औरंगाबादेतील सभेत जेव्हा शरद पवार यांच्या नास्तिकेबद्दल उल्लेख केला तेव्हा सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत  शरद पवार हे नास्तिक असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळं मग हे सगळी विधाने लक्षात घेऊन आम्ही शरद पवार हे नास्तिक की आस्तिक याचा शोध सुरु केला आणि आम्हाला हे पुरावे मिळाले.

पहिला पुरावा सुप्रिया सुळे यांचे संसदेतील भाषण.

३१ जुलै २०१७ला संसदेमध्ये पावसाळी अधिवेशनादरम्यान सुप्रिया सुळे यांनी देशात वाढलेल्या मॉब लिंचिंगच्या घटना आणि असहिष्णुता यावर आसूड ओढले होते. याचवेळी  त्यांनी 

”मी अशा घरातून येते जिथे वडील नास्तिक आहेत आणि आई देवावर प्रेम करणारी  आहे ”

असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलं होतं.

त्यांनतर १३ जानेवारी २०१८च्या THE WEEK च्या अंकामध्ये सुप्रिया सुळे यांनी शरद पवार नास्तिक आहेत याचा पुनरोच्चार केलेला सापडतो.

”मी देवाला मानणारी आणि देवाला घाबरणारी आहे. माझे वडील नास्तिक आहेत, पण माझी आई नाही.”

असं सुप्रिया सुळेंचं स्टेटमेन्ट THE WEEK च्या आर्टिकलमध्ये आहे.त्यामुळं सुप्रिया सुळे यांनी शरद पवार नास्तिक असल्याचे पुरावे मिळतात. 

याच्या पुढे जाऊन मग आम्ही शरद पवार यांनी स्वतःच्या नास्तिकतेचा कधी उल्लेख केला आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचे हे पुरावे मिळाले.

शरद पवार हे देवाला मनात नाही असा आरोप करताना सर्वात पाहिलं कारण सांगण्यात येतं ते म्हणजे मंत्रिपदाची किंवा संसदेच्या सदस्यत्वाची शपथ घेताना ते देवाच्या नावाने शपथ  घेत नाहीत.

त्याऐवजी गांभीर्यपूर्वक किंवा सत्यनिष्ठेने प्रतीज्ञा घेतो असे शब्द शरद पवार वापरतात. मात्र यामुळे त्यांचे देवाबद्दल असलेलं स्पष्ट मत कळत नाही.

मात्र याचा क्लिअर पुरावा मिळतो हिंदूस्तान टाइम्सच्या एका मुलाखतीत. यामध्ये शरद पवार आस्तिक कि नास्तिक याचं क्लियर उत्तर सापडतं. १४ डिसेंबर २०१५ च्या लेखात शरद पवार यांची एक मुलाखत छापण्यात आली होती.

त्यामध्ये तुमचा देवावर विश्वास आहे का? असं प्रश्न पवारांना विचारण्यात आला होता. त्यावर शरद पवारांनी सरळ ‘नाही’ असं उत्तर दिलं होतं. 

पण मी मंदिरात जातो. माझ्या सहकाऱ्यांच्या आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या श्रद्धांचा आदर करण्यासाठी मी  मंदिरांना भेटी देतो अशी पुष्टी ही शरद पवारांनी जोडली होती.

एकंदरीतच राज ठाकरे म्हटलं तसे शरद पवार हे नास्तिक आहेत हे स्वतः शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी देखील मान्य केल्याचं दिसून येतं.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.