२ वेळचे  मंत्री, ४ वेळचे आमदार पण अखेरपर्यंत भाड्याच्या घरात राहिले !

उत्तर प्रदेशातील कानपूरपासून साधारणतः १२५ किलोमीटर अंतरावरील बांदा जिल्हा.

तिथं एका भाड्याच्या घरात एक बुजुर्ग व्यक्ती राहायचे. आता तुम्ही म्हणाल मग त्यात एवढं सांगण्यासारखं काय विशेष..? आमच्या आजूबाजूला कितीतरी जन भाड्याच्याच घरात राहतात.

या प्रकरणात सांगण्यासारखं विशेष असं आहे की ही बुजुर्ग व्यक्ती ४ वेळा आमदार राहिलेली होती आणि २ वेळा तर उत्तर प्रदेश राज्य सरकारमध्ये मंत्री देखील. जमुना प्रसाद बोस असं त्याचं नाव. विशेष म्हणजे त्यांना बोस हे आडनाव देखील महान भारतीय स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस यांच्या नावावरून मिळालेलं होत.

जमुना प्रसाद यांनी  गोर-गरिबांसाठी आणि सामान्यांसाठी दिलेल्या लढ्यामुळे लोकांनीच त्यांना बोस हे आडनाव दिलं.

राज्य सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या या मंत्र्याच्या इमानदारीचे किस्से फक्त बांदा जिल्ह्यातच नाही, तर संपूर्ण उत्तर प्रदेशात चर्चिले जातात. त्यांच्या प्रामाणिकपणासाठीच संपूर्ण राज्यभरात त्यांची ओळख होती.

आजच्या भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीच्या काळात केवळ पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे समीकरण बनलेलं आहे. एक वेळा नगरसेवक बनलेला माणूस आपल्या पुढच्या पिढीची सोय करून ठेवतो अशी परिस्थिती. याकाळात गांधीजींना बघितलेल्या या माणसाने सर्वच राजकारण्यांसाठी एक आदर्श घालून दिला.

१९७४ साली ते सर्वप्रथम प्रजा समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडून आले आणि आमदार झाले. त्यानंतर पुन्हा १९७७ साली देखील ते निवडून आले आणि उत्तर प्रदेश सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री बनले. त्यानंतर १९८५ आणि १९८९ साली ते परत उत्तर प्रदेश विधानसभेवर निवडून गेले आणि १९८९ साली मुलायम सिंह यांनी त्यांना आपल्या कॅबिनेटमध्ये समाविष्ट करून घेतलं.

बांदा जिल्ह्यातील खिन्नी नाका इथला जन्म असलेल्या जमुना प्रसाद यांचे वडील क्लर्क होते. त्यांच्याकडून जे घर जमुना प्रसाद यांना मिळालं होतं, ते त्यांना १९५५ साली आपल्या बहिणीच्या लग्नासाठी विकावं लागलं. त्यानंतर ते स्वतःसाठी एक घर सुद्धा उभारू शकले नाहीत.

जमुना प्रसाद यांना जे काही पेन्शन मिळतं, त्यातूनच त्यांचा घराच्या भाड्याचा खर्च निघायचा. घराचं भाडं जाऊन जे काही उरतं, त्यातले बहुतेक पैसे त्यांच्या आजारपणावर खर्च व्हायचे. त्यांना ३ मुले होती, पण कुणीही त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नव्हतं. जमुना प्रसाद मात्र याबद्दल आपल्याला कुठलाही खेद आणि खंत नसल्याचं सांगायचे.

गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत २ सप्टेंबरमध्ये त्यांचं निधन झालं. तेव्हा ते ९५ वर्षांचे होते.

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.