राजस्थानने आपली गेल्या २५ वर्षांपासूनची परंपरा पाळली !

देशभरातील राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगाना आणि मिझोरम या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जवळपास स्पष्ट होऊ लागलेत. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये सत्ता परिवर्तन घडवून आणताना काँग्रेस सत्तेवर येताना दिसतोय, तर मिझोरममधील आपली सत्ता काँग्रेसच्या हातून गेलीये.

मध्य प्रदेशमधील चित्र मात्र अजूनही धूसरच आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये काट्याची टक्कर बघयला मिळतेय. तेलंगानामध्ये के.चंद्रशेखर राव यांनी आपली सत्ता टिकवताना मोठ्या विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु केलीये.

राजस्थानमधील काँग्रेसच्या संभाव्य विजयात एक गोष्ट मात्र स्पष्टपणे दिसून येते की राजस्थानच्या मतदारांनी गेल्या अडीच दशकांपासून चालत आलेली आपली सत्तापालटाची परंपरा मात्र पाळलीये. राजस्थानच्या गेल्या ५ विधानसभा निवडणुकांच्या निकालांवर एक नजर टाकली तर आपल्या सहजपणे लक्षात येईल की गेल्या प्रत्येक निवडणुकीत राजस्थानी मतदारांनी भाजप आणि काँग्रेसला आलटून पालटून सत्तेत बसवलंय.

राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीत हा पॅटर्न सुरु झाला तो १९९३ साली. १९९३ ते १९९८ या काळात राजस्थानमध्ये भैरोसिंग शेखावत यांच्या नेतृत्वाखालील भाजपचं सरकार होतं. त्यानंतर १९९८ सालच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने विजय मिळवला आणि अशोक गेहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री झाले.

२००३ सालच्या विधानसभा निवडणुकीत परत राजस्थानमध्ये भाजपने पुनरागमन केलं आणि वसुंधरा राजे सिंधीया राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या. २००८ सालच्या निवडणुका परत अतिशय रंजक ठरल्या. वसुंधरा राजेंच्या नेतृत्वाखालील भाजपचा पराभव झाला आणि अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस परत एकदा सत्तेत आली.

२०१४ लोकसभा निवडणुकांची सेमी-फायनल म्हणून बघितल्या गेलेल्या २०१३ सालच्या  विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने दमदार कामगिरी करत काँग्रेसचा दारूण पराभव केला. राजे परत एकदा राजस्थानच्या मुख्यमंत्री झाल्या.

आतायावेळी हातात आलेल्या निकालांनुसार राजस्थानमध्ये काँग्रेस ९५ सीटसह विजयाच्यादिशेने वाटचाल करताना दिसतोय. शेवटचं चित्र काही वेळाने स्पष्ट होईलच. काँग्रेसलास्पष्ट बहुमत मिळालं तर राजस्थानच्या विमानाचे पुढचे ‘पायलट’ कोण हाच आता किमान राजस्थानच्या संदर्भात तरी प्रश्न.

Leave A Reply

Your email address will not be published.